विसर पडलेली सप्तपदी अंतिम

संसाराचा गाडा हाकताना ....

विसर पडलेली सप्तपदी 

भाग 3

             नम्रता विकासच्या संसाररूपी वलिवर दोन गोंडस फुले उमलली होती. त्यांना जुळी मुलं झाली होती, एक मुलगा, एक मुलगी. घरात आनंद दुपटीने वाढला होता.

      नम्रताच्या ऑफिसच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. आता तिला ऑफिसला जावे लागणार होते. पण प्रश्न होता मुलांचा, मुलांना दिवसभर ती नसतांना कोण सांभाळणार?

"माझ्याच्याने मुलं सांभाळने होणार नाही. त्यांचे शी सू काढणं मला जमायचे नाही. तुम्ही घरात कितीही कामाला बाई लावली तरी घरच्या बाईलाच सगळं बघावं लागते, जे मला आता झेपणार नाही. आणि मला मुलं पाळणा घरात ठेवायला अजिबात चालणार नाही." ....सासूबाईंनी घरात फर्मान सोडले. 

             एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यावर नम्रता विकासने तोड काढत मुलांना नम्रताच्या आईजवळ मुलांना सांभाळायला ठेवायचे ठरवले. सकाळी ऑफिसला जातांना मुलांना नम्रयच्या घरी सोडायचे, संध्याकाळी ऑफिसमधून परत येताना त्यांना सोबत घेऊन यायचे, असा नित्यक्रम सुरू झाला होता. 

            पुढले सात आठ महिने ठीक गेले. मुलं चाळीतल्या गोष्टी शिकत आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार होत नाही आहेत, अशी काही बाही कारणं काढत परत सासूबाईंनी घरात कुरबुर सुरू केली. विकास मुलांसाठी थोडा जास्त हळवा आहे, मुलांना काही झालेले त्याला अजिबात जमायचे नाही, हेच कारण साधत सासूबाईंनी मुलांचे विषय काढत विकासचे मन पालटवायला सुरुवात केली. आईचे मुलांसाठी त्यांच्या सोबत असणे किती गरजेचे असते हे त्याला पटवून देऊ लागल्या. आणि काही प्रमाणात त्यांचे पटण्यासारखे पण असायचे. लहान मुलांना आईची खरंच गरज असते, मुलांना चांगले संस्कार आईच देऊ शकते असे त्या सांगत असे. आता विकासला सुद्धा ते पटायला लागले होते. 

"नमू, मी काय म्हणतोय, तू आता नोकरी सोडून दे. तू खूप थकते आहे ग, तुझ्या तब्बेतीकडे पण तुझं दुर्लक्ष होते आहे. बघ स्वतःकडे कशी झाली आहे?" .. ...विकास तिच्या केसातून हात फिरवत तिला कुरवाळत बोलत होता. 

          त्याचे अचानक असे बोलणे ऐकून झोपलेली ती ताडकन उठून बसली. 

"काय रे, काही प्रोब्लेम झाला आहे काय? मी काही करण्यात कमी पडते आहे काय?" ...नम्रता. 

"तू सगळं सांभाळायचा प्रयत्न करते आहे, पण मला असे वाटते आता मुलांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. लहानपणीच त्यांना आईची गरज असते. आताच त्यांना सगळे संस्कार देण्याची गरज आहे. ऑफिसमुळे तुला घरात, मुलांना वेळ नाही देता येत आहे. माझ्यासोबत सुद्धा किती कमी वेळ घालवते तू. आपल्याला तशी पण आता पैशांची गरज नाही आहे. तर मला वाटते तू आता जॉब सोडून द्यावा."

"अरे असे काय म्हणतो विकी, तुला तर माहिती आहे मला आधीपासूनच नोकरी करायची होती, माझे स्वप्न माझे पॅशन आहे ते. माझ्या वडिलांनी सुद्धा खूप कष्टानं शिकवले आहे रे मला. माझ्या पगाराची आपल्या घरात गरज नसली तरी, माझी नोकरी मला स्वाभिमानाने जगायला शिकवते. कधी आई बाबांना गरज पडली तर मला त्यांना मदत करता येईल आणि घर संभालाळण्याचा प्रयत्न करते आहे ना मी. बस काहीच वर्ष, थोडा त्रास होईल, मुलं आता मोठी होत आहेत, मग सगळं सुरुळीत होईल." ..... नम्रता.

"मग तू असे कर, सद्ध्या चार पाच वर्ष जॉब सोडून दे. मुलं मोठी झाली की परत सुरू कर." ..विकास.

"असे कसे म्हणतोय तू, मार्केटची हालत तर तुला माहिती आहे. एकदा गॅप गेली की नंतर नवीन जॉब सहजासहजी नाही मिळणार." .... नम्रता. 

"तुला तर माझे काही ऐकायचे नाहीच आहे. काही तरी चांगलं सांगावं तर तुझे आपले भलतेच सुरू होते. काय त्या दोन पैशांसाठी घराची हेळसांड करून ठेवली आहे तू?" .... विकास चिडत बोलत होता. 

"अरे तू असा चिडतो का? आई सांभाळते आहे ना मुलांना. मुलं थोडी मोठी झाली की मग सगळे प्रश्नच मिटतील." ...नम्रता. 

"तेच तर नकोय. तिकडून ते काय काय शिकून येतात आहेत. सगळ्या वाईट गोष्टी शिकून झाल्यावर काय संस्कार करणार आहेस तू?" ... विकास.

"तू असा का बोलतोय? माझ्यावर पण माझ्या आईचेच संस्कार आहेत. तुला तर नेहमी आवडायच्या ना माझ्या गोष्टी. नेहमी म्हणायचा किती छान संस्कार झाले आहेत तुझ्यावर. आई मुलांना चांगल्याच गोष्टी शिकवते आहे रे. " ... नम्रताचा डोळ्यात आता पाणी साचायला लागले होते. 

"हे बरं असते तुम्हा बायकांचे, दोन अश्रू गाळायचे की संपले सगळं." .... विकास वैतागून तिथून उठून चालला गेला. 

          आता नम्रता आणि विकासमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरींनी डोकं वर काढले होते. त्याचे ऑफिसमध्ये काम वाढले होते. घरी आले की घरची गाऱ्हाणी सुरू होत. आईचं वेगळं तर नम्रताचं वेगळं त्याचा जवळ येऊन गाऱ्हाणी सांगणं सुरू झाली होती. त्याची चिडचिड खूप वाढायला लागली होती. आईला तर काही म्हणू नाही शकत, म्हणून आता त्याचा सगळा राग नम्रतावर निघायला लागला होता. आता नम्रताचे सुद्धा लक्ष विचलित व्हायला लागले होते. विकासची साथ होती तोपर्यंत तिला सगळं सांभाळणे कठीण नव्हते वाटत. कितीही थकली असली तरी त्याच्या प्रेमाने, त्याच्या मिठीत ती विसावयाची. पण आता त्या दोघांमधील प्रेमाचे क्षण खूप कमी व्हायला लागले होते. विकास दूर जातो आहे तिला जाणवायला लागले होते. विकासपूढे तिला दुसरे काहीच महवाचे नव्हते, तो खूश तर ती खुश हेच तिचे एकमेव समीकरण होते. शेवटी सगळा विचार करत तिने जॉब सोडला होता. आता ती पूर्णवेळ गृहिणीची भूमिका बजावत होती.  

*****

"काय ग वसू, जॉब सोडला म्हणे तुझ्या सुनेने?" ..

"हो, तिला सगळं करायची सवय नव्हती, तिला कामाचे प्लॅनिंग नाही जमले. सगळ्याच बायका काही आमच्या विशाखा सारख्या सुपरवुमन नसतात.".. वसू 

"काय ग, विशाखा सासू सासऱ्यांपासून वेगळी राहते म्हणे??" .... 

"हो, तिच्या सासूबाईंनीच तिला वेगळं राहायला सांगितले. ऑफिसपासून दोघांनाही घर खूप दूर पडायचे, येण्याजाण्यातच खूप वेळ जायचा. मुलांकडे लक्ष द्यायला पण वेळ मिळायचा नाही, मग त्याच म्हणाल्या ऑफिस जवळ घर घ्या. मोठ्या नातवाला आजी आजोबंचे खूप आहे त्यामुळे तो त्यांच्याजवळच राहतो, माझ्या विशुचे दिलेले संस्कारच आहे मुलांवर तसे. तसेही घरी नोकरचाकर खूप आहेत. जावई पण आमचे खूप छान आहेत. विशूला खूप मदत करतात. नवरा बायकोने कसे एकमेकांचे मन राखत सगळं केले ना तर सगळं सोपी होते, आणि आमची विशू त्यांच्या म्हण्यात आहे हो." .... वसु तिच्या मुलीचे कौतुक करत थांबत नव्हत्या. 

"हो, घरून सपोर्ट असला की मुलींना सगळं जमतं." ....

"पण काही काही लोकांना ते सुद्धा जमत नाही.".... वसु नम्रताकडे तिरकस नजरेने बघत म्हणाली. 

         वसु आणि मैत्रिणींची पार्टी सुरू होती, नम्रता त्यांच्या आवभगातीमध्ये लागली होती. वसुचे बोलणे नम्रताच्या मनाला खूप टोचत होते. 

****

             दोन जुळी मुलं आता ती सात वर्षाची झाली होती. त्यात आता विकासच्या आजीची तब्बेत खराब व्हायला लागली होती, त्यांनी अंथरून पकडले होते. त्यांचे सगळं अंथरुणावर करायला लागत होते. त्याचे औषधपाणी करतांना थोडे काही चुकले की सासूबाई नम्रतला बोलायला कमी करत नव्हत्या. मुलांकडे दुर्लक्ष झाले की विकासला अजिबात खपायचे नाही. तो सरळ बोलून दाखवत असे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम नम्रताच्या तब्बेतीवर व्हायला लागला होता. कधी पोट दुख तर कधी पाठ दुख असे काही काही सुरू झाले होते. पण सगळ्यांचे करता करता तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. घरी सांगितले तर बाळंतपणमुळे होतात कधी असे त्रास सांगण्यात आले त्यामुळे तिने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले. विकासचे प्रमोशन झाले होते, त्याचे काम वाढले होते. कामानिमित्त त्याला कधी कधी देशा बाहेर सुद्धा जावे लागायचे. त्यामुळे घरातल्या किंवा तब्बेतीच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून तिला त्याला त्रास द्यावा नाही वाटायचा. तसेही आजकाल त्यांच्यात वादाचे प्रमाण वाढले होते. सासूबाई खूप गाऱ्हाणे सांगायच्या, तिला घालून पाडून बोलायच्या, तिला ते कधी सहन व्हायचे नाही तर ती सुद्धा सासूबाईंना कधी कधी उत्तर द्यायला लागली होती. त्यामुळे आता सासूबाई खूप भडकायला लागल्या होत्या. विकास घरी आला की सासूबाईंचे त्याच्या जवळ नम्रताच्या चुकांचा पाढा वाचला जायचा आणि नम्रता तिने काही केले नाही आहे त्याचे स्पष्टीकरण देत बसायची. कधी कधी तर विकासला घरात यायला सुद्धा नको नकोसे वाटत असायचे. दोघांमध्ये आता शारीरिक संबंध सुद्धा कमी होत चालले होते. नम्रता सुद्धा मानसिकरीत्या थकत चालली होती. 

*******

"काय आज उठायचे नाही काय राणी सरकारांना? मुलांची शाळेला जायची वेळ झालीय, तिकडे विकासची आजी माझा जीव खात आहे." ... नम्रता आज लवकर उठली नव्हती, म्हणून सासूबाईंचे बोलणे सुरू झाले होते. 

"तिचं पोट दुखते आहे, करू दे आराम. आज मुलांना असू दे घरीच." ....विकास त्याची ऑफिसला जाण्याची तयारी करत बोलत होता. 

"काही नाही, काम करायचा नेट लागतो आहे, म्हणून ही अशी तब्बेतीची कारणं सांगायची असतात." ... विकासची आई

"आई, थोड्या वेळ करू दे आराम, बरे वाटेल तिला." .... विकास. विकास आपलं आवरत ऑफिसमध्ये निघून गेला. 

           संध्याकाळी विकास ऑफिस मधून घरी आला तर घरात खूप शांतता होती. 

" चिऊ, आई कुठे आहे?" ...विकास त्याच्या मुलीला विचारात होता. 

"आई झोपली आहे, तिचं खूप पोट दुखत आहे. ती रडत होती, आजी खूप रागावली तिला." ...चिऊ 

"सांगा, आणखी आजीची कंप्लेंट करा. बिघडवून ठेवले आहे मुलीला. सतत आजीच्या विरोधात शिकवायचे, त्याचेच हे परिणाम. आईने काय केले ते सांगायचे नाही?" ... वसू आई.

"आता काय झाले? आणि नमूला अजूनही ठीक वाटत नाहीये? हल्ली तिचे पोट दुखायचे प्रमाण वाढले आहे. तिला डॉक्टरकडे घेऊन जायला हवे." ...विकास.

"हो, तुझ्यासमोर तब्बेत खराब असते तिची, तुझा पाठीमागे मात्र ती चांगलं गाव फिरून येते. आणि मुलं माझ्या माथी सांभाळायला ठेऊन जाते. खेळता खेळता पडला आज सोनू, गुडघ्याला लागलंय."... वसु आई. 

"काय...? कुठे गेली होती ती?" ...विकास सोनू जवळ जात त्याचा पाय बघत जास्ती लागलं नाही ना, ते चेक करत होता. गुडघा थोडा फुटला होता, थोडे रक्त निघाले होते. 

"अजून कुठे, तिच्या माहेरी. आईला बरे नाही म्हणून सांगून गेली होती, फिरून आल्या बाईसाहेब. तेव्हा कुठे गेले होते पोटाचे दुखणे? घरी परत स्वयंपाक करावा लागेल म्हणून आता परत पोट दुखणं सुरू झाले." ... आई. 

        आता मात्र विकासचा रागाचा पाढा चांगलाच चढला. तो उठत तरतर त्याच्या रूममध्ये गेला. 

"काय ग, काय नाटकं आहेत तुझी? बरं नाही वाटत तर डॉक्टरकडे तरी जाऊन यायचे? काय हे रोज रोज पोट दुखायचे घेऊन बसते?" ... विकास थोडा ओरडतच बोलत होता. 

"अरे वेळ नाही मिळाला, डॉक्टरकडे उद्या जाऊन येते." ... नम्रता झोपल्या झोपल्याच बोलली.  

"हो? तुला बाकी सगळ्या ठिकाणी जायला वेळ मिळतो? तुला मुलांकडे सुद्धा लक्ष नीट देता येत नाही? तेवढे एक काम सुद्धा जमत नाही?" ....तो चिडत बोलत होता. 

"आईला बरं नव्हते, तिची शुगर खूप डाऊन झाली होती. तिच्याजवळ कोणी नव्हतं म्हणून गेले होते." .... नम्रता.

          असेच शब्दाला शब्द वाढत गेले आणि दोघांचा चांगलाच वाद झाला होता.

          रात्री दोघाही एकमेकांकडे पाठ करून झोपले होते. त्याचा रागाचा पारा वाढला होता. रागातच का होईना त्याने नम्रतावर अविश्वास दाखवला होता, त्यामुळे तिचे मन खूप दुःखी झाले होते. इकडे पोट दुखणे सुद्धा असह्य झाले होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू सुरू होते, ती रडत होती. 

"आता घरात शांततेने झोपता पण येणार नाही. काय कटकट आहे ही?" ....तो वैतागत म्हणाला. तसे तिने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि आपलं रडू कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती. रात्रीचे बारा एक वाजत आले असावे, दोघांनाही झोप येत नव्हती. 

"विकी sss ..." ...तिच्या तोंडून त्याचे नाव बाहेर तिच्या पोटातून एक असह्य अशी कळ गेली. 

"नम्रता, झोपू दे आता, जे काही बोलायचे ते उद्या बोलू." .....तो पाठमोराच म्हणाला. 

        त्याच्या तोंडून नम्रता ऐकले आणि तिने तिचे डोळे बंद केलं. 

****** 

"मी तुला वचन देते की मी घरात अन्नपूर्णा बनून येईल." .... नम्रता 

" मी वचन देतो की मी घरात तुला कधीच अन्नधान्याची कमतरता पडू देणार नाही." ... विकास

"मी वचन देते की, मी तुझे आई वडील, तुझ्या परिवाराला आपला परिवार मानेल, आणि माझी सगळी कर्तव्ये करेल." ...नम्रता. 

"मी तुला वचन देतो की माझ्या आईवडीलांप्रमाणेच मी तुझ्या आईवडिलांचा सन्मान करेल." ...विकास. 

"मी तुला वचन देते की, घरादारचे स्वास्थ्य जपेल." .. नम्रता. 

"मी तुला वचन देतो की, मी तुला माझ्या प्राणापलिकडे जपेल." ...विकास. 

"मी वचन देते की, या घराची वंशवेल वाढवेल." ... नम्रता. 

"मी वचन देतो की, माझ्या मुलांना मी उत्तम आयुष्य देईल."...विकास. 

"मी वचन देते की, मी तुझा माझ्यावर असलेला विश्वास कधी तुटू देणार नाही." ..नम्रता.

"मी तुला वचन देतो की, तुझ्याप्रती माझा विश्वास, प्रेम कधीच कमी होणार नाही. मी तुझा घरात, समाजात सगळीकडे सन्मान करेल. तुझा मान ठेवेल. सुख दुख्खात तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील." ...विकास. 

"आपण दोघे मिळून आपल्या घराचा भार, आपली जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून ती नेटाने पूर्ण करू."

          एका पडक्या मंदिराच्या मागे, गमतीचे अंग्निकुंड बनवत नम्रता विकासचा हात हातात घेत सप्तपदी चालत होती. विकास पण तिच्या या बालिश वागण्याला साथ देत होता. 

"चला, झालं लग्न. आता तोंड गोड करूया.." .... विकास.

"विकी, तुम्हा मुलांना हेच सुचते ना?" नम्रता 

"नमू डारलिंग, याला प्रेम म्हणतात ग." ...विकास तिची मस्करी करत होता. 

"विकास मला तुझ्याकडून आणखी एक वचन हवे आहे."... नम्रता 

"Everything is yours my sweetheart!" .... विकास. 

"मस्करी नको ना, ऐक ना …?" ... नम्रता. 

"बरं, बोला आमच्या राणीसाहेबा .." ..विकास. 

"तू मला प्रॉमिस कर की जेव्हा मी माझा शेवटचा श्वास घेईल, तेव्हा तू मला तुझ्या कुशीत घेशील." ... नम्रता. 

"नमू sss, असे काय काही काही बोलते आहे. अजून तर आपलं सोबत आयुष्य पण सुरू व्हायचे आहे. हे असे काही बोलू नकोस." .... विकास थोडा भावूक झाला होता. 

"मला माझा प्राण तुझ्या मिठीत सोडायचा आहे. मी तुला कधीच काही मागणार नाही. हवे तर हिच माझी शेवटची इच्छा समज." ....नम्रता. 

"नमू ....", त्याने तिला आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडून घेतले. 

              तो गुलाबाचा हार घातलेल्या एका फोटो पुढे उभा होता. त्याला लग्नाआधीचा तो दिवस आठवत होता, ज्या दिवशी तो तिच्यासोबत गमतीचीच का होईना सप्तपदी चालला होता. दोघांनीही एकमेकांना काही प्रॉमिस दिले होते.

           त्या रात्री नम्रताच्या पोटात खूप असह्य असे दुखले होते, अपेंडिक्स फुटले होते. आणि त्याचेच विष तिच्या शरीरात पसरले होते. त्यातच तिची प्राणज्योत मालवली होती. 

"नमू, माफ कर ग मला, तुझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण नाही करू शकलो. रागाच्या भरात तुझी ती आर्त हाक सुद्धा नाही ऐकू शकलो. तुला दिलेले कुठलेच वाचन मी पूर्ण नाही करू शकलो. किती विश्वासाने तूने माझ्यासोबत सप्तपदी चालली होती. पण मी तुझा विश्वास नाही बनू शकलो. तू तुझी सगळीच वचन पूर्ण केली ग, जे बोलली होती त्याला जगली. माझ्या सुखदुःखात सोबतीने उभी राहिली. मीच माझ्या शब्दांप्रमाने नाही वागू शकलो. कशी विसरलो मी ती सात वचणं, जी अग्नीच्या साक्षीने तुला दिली होती. मला पण तुझ्या मिठीत यायचे होते ग...मला तुझ्या जवळ यायचे होते....तुझ्याशिवाय अपुरा आहो ग मी, तुझ्याशिवाय अपुरा आहो. " ....त्याचा कंठ दाटून आला होता.कोणीतरी त्याचा गळा दाबून धरला आहे असे वाटत होते, त्याचा श्वास कोंडला होता…. त्याच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते कधीही न थांबण्यासाठी. 

"सूनबाई खूप छान होती. तिने खूप सेवा केली. खूप गोड मुलगी होती." .....असेच काही आईचे बोलणे त्याच्या कानावर पडत होते. 

******

           खरंच नाती सांभाळणं इतकं कठीण का असतं?

******

समाप्त 

🎭 Series Post

View all