विरजण 2

मी म्हणेल ती पूर्व दिशा
सगळं माझ्या मनाप्रमाणेच व्हायला हवं, मी म्हणेल ती पूर्व दिशा असा तिचा दृष्टिकोन असायचा, पण एकत्र कुटुंबात या गोष्टींना बाजूला ठेवावं लागतं याची तिला जाणीव नव्हती.

एकदा घरात सत्यनारायण पूजा होती. जाऊ बाईंनी पुजेचं सगळं सामान एका मोठया बॉक्स मध्ये भरून ठेवलं होतं जेणेकरून वेळेवर धावपळ नको. रविवारचा दिवस होता, केतकीला सुट्टी होती. सासूबाई आणि जाऊबाई दोघीजणी खरेदीसाठी बाहेर गेल्या आणि केतकीला घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेसाठी गुरुजी आले, जाऊ बाईंनी धावत जाऊन पुजेचं बॉक्स आणलं आणि बघतो तर काय..त्यातलं अर्धं सामान गायब होतं. त्यांनी लागलीच केतकीला आवाज दिला..

"केतकी...यातलं सामान कुठे गेलं??"

"अहो त्यात किती वस्तू वेड्यासारख्या कोंबून ठेवल्या होत्या..मी काढलं सगळं आणि जागच्या जागी ठेवलं.."

जाऊबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला. तिकडे गुरुजी एकेक साहित्य आणायला वेळ जातोय म्हणून चिडचिड करू लागले.पूजेला बराच उशीर झाला.

पूजा झाल्यानंतर सासूबाईंनी केतकीला सुनावलं..

"असं न विचारता काहीही उद्योग करत जाऊ नकोस..तुझ्या जावेने पूजेसाठी लागणारं सामान एकत्र आणून ठेवलेलं जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व वस्तू सापडतील..पण तू असला आगाऊपणा केला आणि सगळं गणित बिघडलं..हे बघ, तू नवीन आहेस..आधी घरातलं समजून घे, इथल्या गोष्टी समजून घे आणि मग तुला निर्णयस्वातंत्र्य मिळेल..."

केतकीला या बोलण्याचा प्रचंड राग आला...तिची धुसफूस सुरूच असायची. जाऊ बाई नेहमीच्या ठिकाणी सवयीने वस्तू ठेवत, मात्र केतकीला ते सहन न झाल्याने ती परत सर्व वस्तूंच्या जागा बदले. कुणालाही न विचारता घरातल्या वस्तूंची जागा बदल, इकडंच तिकडे कर हे प्रकार ती करत असे. तिचा अति आत्मविश्वास तिला नडत असे. एखादा पदार्थ चुकला तर त्यातुन शिकून, मोठ्यांना विचारून पुढच्या वेळी करण्याऐवजी ती पहिले पाढे पंचावन्न गिरवत असे. तिच्या या वागण्याचा सर्वांनाच त्रास होऊ लागलेला.

तिच्या या स्वभावामुळे तिचा नवराही कंटाळून जाई. आपल्या नवऱ्याने आपण संगीतलेलं रुटीन फॉलो करावं, आपण सांगू तसंच करावं या हट्टापायी त्यांच्यातही वाद होऊ लागलेले. काहीही झालं तरी केतकी बदलायला तयार नव्हती.
****

🎭 Series Post

View all