विरजण 4 अंतिम

चूक समजली
उलट ती दुसऱ्यांवर खापर फोडत होती.

बराच वेळ वाद झाला. केतकीला राग आला..माहेरी जाण्याचं निमित्त करून ती माहेरी पळाली.

तिने आईला सगळं सत्यकथन केलं. आईला समजलं की चूक केतकीची आहे आणि ती मान्य ही करत नाहीये. तिला समजवायला गेलं तर ती ऐकणार नाही. आईने दिन दिवस तिला शांत केलं, काहीही समजावण्याचा मागे लागली नाही.

तिसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती, साधारण दुपारचे 2 वाजले होते. आईने केतकीला सांगितलं..

"जा बाळा ओट्यावर मी विरजण ठेवलं आहे आणि पातेल्यात थोडंस दूध आहे, दही लावून दे.."

केतकीने आईने सांगितल्याप्रमाणे केलं आणि ती जागेवर येऊन बसली. 15 मिनिटं झाले आणि आई म्हणाली दही बनली असेल जा बघून ये..

"इतक्या लवकर कशी बनेल आई??"

"मी सांगते ना झाली असेल...जा तू.."

केतकी उठली पाहिलं..दही तयार नव्हती..

"सांगितलं होतं ना नसेल तयार म्हणून.."

"असं कसं होईल? तयार व्हायलाच हवी होती...तूच काहीतरी चुकीचं केलं असणार.."

"असं कसं चुकीचं करेन मी?? दही बनायला ते मुरू तर दे..इतक्या आत्मविश्वासाने सांगतेस झाली असेल म्हणून...असं कधी होतं का?"

"समजतंय ना तुला?"

"म्हणजे??"

"तू विरजण आहेस..दुधात म्हणजेच कुटुंबात गेल्यावर त्याचं लगेच दही बनणार नाही..तुला मुरावं लागेल, वेळ जाऊ द्यावा लागेल... मग तू चमचाभर विरजण पासून पूर्ण दुधावर आपला हक्क सांगू शकशील...हे बघ बाळा, नवीन घरात तुझ्या जाऊ बाई आणि सासूबाई वर्षानुवर्ष राबल्या आहेत, घराला उभं केलं आहे...वर्षानुवर्षे त्यांनी केलेलं सगळं एका क्षणात कुणी बदललं तर त्यांना कसं आवडेल?? काल आलेली मुलगी सर्व गोष्टींवर आपला ताबा घेतेय हे कुणालाही सहन होणार नाही..तुला वेळ द्यावा लागेल, मोठ्यांच्या आज्ञेत राहावं लागेल..एकदा त्यांचं मन जिंकलं की तुझा शब्द खाली पडू देणार नाही हे लक्षात असुदे.."

आईने सांगितल्यावर केतकीला आपली चूक समजली.

"आई मग मी काय करायला हवं??"

"तू नवीन आहेस घरात, एकत्र कुटुंबात आहेस, तेव्हा सुरवातीला अनुभवी सासू आणि जावेच्या सांगण्यानुसार काम करत जा..त्यांचा सल्ला घेत जा, त्यांचं मत विचारत जा...तुला कदाचित हे अवघड जाईल पण कालांतराने त्याच तुझा सल्ला घेतील हे मी लिहून देऊ शकते.."

आईने सांगितल्याप्रमाणे केतकीने आपल्यात बदल केला...

(5 वर्षानंतर)

"मोठया सुनबाई, उद्या घरी सत्यनारायण आहे...केतकीला विचार तिला काय काय सामान लागेल..."

"हो सासूबाई, पण ती आहे कुठे? मला ढोकळे बनवायचे आहेत तर त्याचं प्रमाण तिला विचारायचं आहे, उद्याचा प्रसाद तिलाच सांगूया बनवायला...तिच्या हाताला चव आहे.."

"हो पण गेली कुठे ही मुलगी? तासभर घरात नसली तर काही सुचत नाही बघ.."

समाप्त

🎭 Series Post

View all