विरजण 3

फसलेला नैवेद्य
एके दिवशी मोठ्या दिरांनी फर्मान सोडलं, उद्या पहाटे 7 वाजता मंदिरात जाऊन नैवेद्य द्यायचा आहे. तेव्हा मेथीची भाजी, भरीत, भाकर, भात हे सगळं तयार असुद्या 7 च्या आत. सासूबाई आणि जाउबाईनी ठरवलं की उद्या लवकर उठायचं आणि नेवैद्य बनवायचा. केतकीला मात्र हे जबाबदारी स्वतःवर हवी होती.

"दादा हा नैवेद्य मी बनवला तर चालेल का??"

"कुणीही बनवा पण वेळेत बनवा.."

जाउबाईनी समजावलं, की तू धावपळ करू नकोस मी करून घेईन पवन केतकी ऐकेना. अखेर केतकी सकाळी लवकर उठून सगळं बनवणार यावर शिक्कामोर्तब झालं. तिने रात्रीच तयारी करून ठेवली, लसूण सोलला..मेथी धुवून ठेवली.

केतकीने साडेपाच चा अलार्म लावला होता. अलार्म वाजला तसं snooze करत करत उठायला 6 वाजले. ती घाईघाईने किचनमध्ये गेली. मोठे दिर तिला विचारत होते, "अंघोळ झाली असेल तरच बनव".

ती अंघोळ न करताच घाईघाईने किचनमध्ये आलेली. ती पटकन अंघोळीला पळाली. बाहेर येत तिला 6:20 झाले. किचनमध्ये येताच तिच्या लक्षात आलं की रात्रीचा लसूण आणि मेथी तशीच उघडी पडली होती. झाकायचं विसरली होती. त्यामुळे मुंग्या, झुरळं त्याच्या आजूबाजूला फिरायला लागलेले. तिने ते तसंच टाकून दिलं आणि दुसरं करायला घेतलं.

नवीन मेथीची जुडी घेतली, ती तर अजून निवडलेली नव्हती. तिने निवडायला घेतली आणि दुसरीकडे वांगी भाजायची म्हणून तेल लावून गॅसवर ठेवली. मेथी निवडतच 6:45 झाले. घाईघाईने कढईत तेल टाकलं आणि फुल गॅस केला. तिच्या लक्षात आलं की भाजायला वांगी गॅसवर ठेवली पण गॅस सुरू केलाच नव्हता. मग गॅस सुरू केला आणि दुसरीकडे मेथी शिजत टाकली. मग लक्षात आलं की लसूण टाकायचा राहिला..पटकन निवडून दोन पाकळ्या टाकल्या आणि भरीत करायला घेतलं. भरीत करत असतानाच मेथीचा गॅस फुल असल्याने मेथी करपली..भरीत साठी लसूण वेगळा...भात शिजत टाकायला गॅस रिकामा नव्हता..भाकर साठी पीठ परातीत काढलं नव्हतं.. तिचं लक्ष बाहेर गेलं तेव्हा मोठे दिर गाडी काढत होते... ते निघून गेले...

केतकीची प्रचंड चिडचिड झाली. सगळं अर्धवट, करपलेलं...सासूबाई किचनमध्ये आल्या

"काय गं सुधीर गेला आत्ताच...नैवेद्याची पिशवी नाही दिसली मला.."

त्यांचं लक्ष करपलेल्या भाजीकडे आणि अर्धवट भरताकडे गेलं...

त्यांचा संयम सुटला आणि त्या तिला खूप बोलल्या..

"आम्हाला माहीत होतं तुला जमणार नाही म्हणून सांगत होतो की आम्ही करतो..फाजील आत्मविश्वास का दाखवतेस तू दरवेळी? प्रत्येकवेळी असा फाजील आत्मविश्वास दाखवून फसतेस तरी तुला अक्कल येत नाही का?"

सासूबाईंचा आवाज ऐकून जाऊबाई पटकन किचनमध्ये येतात आणि त्यांना सगळं समजतं. त्या सासूबाईंना शांत करतात.

केतकी मात्र स्वतःची चूक मान्य करतच नव्हती.

"आता अलार्मनंतर मला झोप लागली त्याला मी काय करू..अंघोळीत वेळ गेला माझा...तुम्ही मला सांगायचं ना आधी.."
****

🎭 Series Post

View all