वीण.. घट्ट नात्याची! भाग -३

आई आणि मुलीच्या नात्याची कथा.

विषय - सांग कधी कळणार तुला.

जलद कथालेखन स्पर्धा.



वीण.. घट्ट नात्याची!

भाग -तीन.



"अगं, मम्माला पण बाय म्हण ना." तिच्या मागे येत तो.


"ती सारखी माझ्यावर चिडत असते. तुच तिला माझ्यावतीने बाय म्हटलं म्हणून सांग." नाकाचा शेंडा उडवत ती रिक्शामध्ये बसली.


'पिहू,तू ही तर अगदी तुझ्या मम्मासारखीच आहेस. मम्मा तुझ्या बाबतीत ओव्हर पजेसीव्ह होतेय, हे कधी कळेल रे पिल्ल्या तुला? सांग ना.' एक दीर्घ श्वास घेऊन तो घरात परतला.


"बघितलंस? तुझ्या लेकीने साधं बाय देखील केलं नाही ना मला?" त्याने घरात पाऊल टाकले तशी मुसमुसत मेघा म्हणाली.


"अरे? ती का फक्त माझीच लेक का? आणि सकाळी सकाळी का तिचा मूड ऑफ केलास?" तो हसून 


"हो, तुझीच लेक. कारण तुम्हा दोघांचं भारी गुळपीठ जमतं. आणि मूड घालवला म्हणतोस तर मग ती का सारखं त्या रक्षितचे गुणगान गात असते? मघाशी मला बोलली ना की तो कसा टिफिनमध्ये सॅण्डव्हीच, मॅगी वगैरे आणतो म्हणून?" तिच्या डोळ्यात पाणी तराळले.


"आता ना मेघा तू मला तिच्याहून लहान वाटते आहेस. तिने केवळ त्याचे नाव नव्हते गं घेतले. नितीचे नाव देखील घेतले होते, ते बरे तुझ्या कानावर नाही आले?" तो हसून म्हणाला.


"बघ, तिचीच बाजू घेतोस तू. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये." ती उठत म्हणाली तसे त्याने तिचे हात पकडून तिला खाली बसवले.


"पण मला बोलायचे आहे ना तुझ्याशी. बोला राणीसाहेब, काय म्हणणं आहे तुमचं? का असा जीव सारखा वरखाली होतोय?"


"सुजित, मला भीती वाटते रे." ती त्याच्याकडे बघून म्हणाली.


"ते तर तुझ्या डोळ्यात मला दिसतेय. पण कसली भीती ते सांगशील का?" तिचा हात तसाच पकडून तो म्हणाला.


"आपली पिहू भोळी आहे रे. काय चूक काय वाईट ते नाही कळत तिला. ती अशी सारखी मुलांशी बोलत राहिली आणि उद्या काही चूकीचे घडले म्हणजे? एखाद्या मुलाच्या प्रेमात वगैरे पडली तर? तुला का कळत नाहीये?" ती थोडी पॅनिक झाली होती.


"ही भीती तुला आत्ताच का वाटतेय? ती तर पूर्वीपासून तिच्या वर्गातील, शाळेतील मुलांशी बोलते ना?"

तिच्या हाताला हळुवार कुरवाळत तो म्हणाला.


"हम्म. ते खरे आहे. पण तेव्हा ती लहान होती. आता मोठी होत आहे. तिच्यात हार्मोनल चेंजेस होत आहेत. तेव्हा तिला कोणाबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक असू शकते ना? मला तर खात्रीच आहे ती त्या रक्षितच्या जाळ्यात अडकत चालली आहे. सारखं त्याच्याबद्दल सांगत असते." मेघा.


"मग चांगलंच आहे की." तो.


"काय चांगलं आहे? ती त्याच्या जाळ्यात अडकतेय हे?" ती जरा रागानेच म्हणाली.


"नाही गं राणी. ती तिच्या मनात जे आहे ते सारखं आणि सर्वच आपल्याला सांगते हे चांगलं आहे. तिला कधी लपवाछपवी करावी लागत नाही हे चांगलं आहे. इतर मुलांसारखी ती आपल्याशी खोटं बोलत नाही हे चांगलं आहे. जे तिला वाटते ते ती पटकन आपल्याला सांगून मोकळी होते. आणि त्यामुळेच जर तिला कोणाबद्दल काही वाटलं तर ती आपल्याला नक्की सांगेल. त्यावेळी आपण तिच्याशी या वयात वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल मनमोकळे बोलू शकतो. हेही चांगलंच आहे की." तो तिला समजावत म्हणाला.


"आणि काय गं हे सगळे खुळ कुठून डोक्यात भरलेस? कधीपासून तुला अशी भीती वगैरे वाटायला लागली?" तिच्याकडे रोखून बघत त्याने विचारले.


"असा नको ना बघू. ते टीव्ही, पेपर, सोशल मीडिया वर सारखं आफताब आणि श्रद्धाची न्यूज फिरतेय म्हणून डोक्यात नाही नाही ते येतंय." तिने नजर खाली करत म्हटले.

मेघाच्या बोलण्यावर सुजित कसा रिऍक्ट होईल? मेघा आणि पिहूचे नाते पूर्ववत होईल का? वाचा पुढील अंतिम भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all