Feb 28, 2024
जलद लेखन

वीण.. घट्ट नात्याची! भाग -२

Read Later
वीण.. घट्ट नात्याची! भाग -२

विषय - सांग कधी कळणार तुला.

जलद कथालेखन स्पर्धा.


वीण.. घट्ट नात्याची!

भाग -दोन.


"मेघा, तू उगाच विषयाला ताणते आहेस हं. तुमचा संवाद मी ऐकलाय. तू म्हणतेस तसं आपल्या पिहूचं काही नाहीये गं. माझ्याच मोबाईलवरून तिचे मेसेज असतात सो माहितीये मला. आणि फक्त चौदा वर्षांची तर आहे ती." तो.


"म्हणूनच तर काळीज तुटतंय ना सुजय? अडनिड्या वयात माझी पोर आहे. तिला तर काहीच कळत नाही. पुढे दोन चार वर्षांनी तिच्या कडून काही चुकीचं पाऊल पडलं तर? सांग ना कधी कळणार तुला?" तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हातावर विसावला तसा सुजित धडकन उठून बसला.


"ए वेडाबाई, अगं तसं खरंच काही नाहीये. तो कोण रक्षित तिचा केवळ मित्र आहे गं. त्यांचा ग्रुप आहे आणि नीती सुद्धा त्यांच्याच ग्रुपमध्ये आहे. त्यांचं असं काही वेगळं चॅटिंग सुरू नसते गं. उगाच टेन्शन घेतेस तू." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.


"माझ्या मनाची घालमेल तुला अजूनही कळत नाहीये सुजित. अरे आपली पिहू.."


"श्श! एकदम शांत हो बघू. आता हा विषय बंद. डोळे मिटून खोल श्वास घे म्हणजे निद्रादेवी तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि तुला वाटते तसे काही असेल तर मी आहे ना? मी बोलेन तिच्याशी. ठीक आहे? आता झोप बघू." तिला मिठीत घेत तो बेडवर पहुडला. त्याचे बोट तिच्या केसातून हळूवार फिरत होते.


"सुजित.. "


"मेघा, या विषयावर सकाळी बोलूया ना गं. प्लीज."


'याला कसं काहीच कळत नाही?' मनातील विचार तसेच ठेवून तिने डोळे मिटले.

******


"मम्मा, आज टिफिनला काय आहे?" सकाळी शाळेची तयारी करताना पिहूने प्रश्न केला.


"भेंडीची भाजी आणि चपाती." मेघा थंडपणे उत्तरली.


"ईय मम्मा, अगं मागच्या महिन्यात तर दिली होतीस ना गं ही भाजी? हे काय रोज रोज भाजीपोळी देतेस गं? ते नीती आणि रक्षित बघ, त्यांच्या टिफिनमध्ये कधी सॅन्डव्हीच तर कधी मॅगी तर कधी असंच काहीतरी असतं आणि तू?" नाक फुगवून तिने दूध प्यायला घेतले.


"परत रक्षित? त्याचे जास्त नाव नाही घ्यायचे हं माझ्या पुढयात." मेघाचा रात्रीचा राग पुन्हा उचंबळून आला.

ती रागातच तिचा डबा पॅक करायला लागली.

इकडे पिहूने वडिलांकडे बघून 'ही अशी विचित्र का वागते?' म्हणून नजरेनेच विचारले. त्यावर त्याने तिला 'गप्प बस' म्हणून खुण केली.


"खाणाखुणा संपल्या असतील तर केस विंचारायला या." मेघाचा आवाज ऐकून पिहू कंगवा घेऊन तिच्या समोर जाऊन बसली. तिच्या वेण्या गुंफुन दिल्यावर धुसफुसत मेघा दुसऱ्या कामाला लागली.


"पिहू, अगं या वयात असे फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ जास्त खाणे चांगले नाही गं. तुझी मम्मा तर तुला महिण्याभराने भाज्या रिपीट करते. माझी आई मला डबा द्यायची तेव्हा दर दोन दिवसांनी भाजी रिपीट व्हायची. सुगरण आहे गं तुझी मम्मा. प्रत्येक भाजीत आणि पदार्थात किती वेरीएशन्स असतात. आठवड्यातून दोन दिवस वेगवेगळे पराठे, कधी थालीपीठ अन काय काय तुला देत असते. असं दुसऱ्यांसोबत तिला कंपेअर नको करत जाऊस बाळा." मेघा जवळ नाही हे बघून सुजित पिहूला समजावून सांगत होता.


"हं. आय नो द्याट. माझ्या फ्रेंड्सना पण तिच्या हातच्या भाज्या आवडतात." टिफिन बॅगमध्ये भरत ती म्हणाली.

तेवढ्यात रिक्शावाल्या काकाने हॉर्न दिला आणि ती 'बाय पप्पा' म्हणून पळतच बाहेर गेली.


"अगं, मम्माला पण बाय म्हण ना." तिच्या मागे येत तो.


"ती सारखी माझ्यावर चिडत असते. तुच तिला माझ्यावतीने बाय म्हटलं म्हणून सांग." नाकाचा शेंडा उडवत ती रिक्शामध्ये बसली.


कसली नजर लागलीय मायलेकीच्या नात्याला? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//