वीण.. घट्ट नात्याची! भाग -१

आई आणि मुलीच्या नात्याची कथा.

विषय - सांग कधी कळणार तुला.

जलद कथालेखन स्पर्धा.


वीण.. घट्ट नात्याची!

भाग -एक.


"पिहू, काय सुरू आहे? होमवर्क झालाय ना? दहा वाजत आलेत. झोपायला ये. सकाळी शाळेत जायचे आहे ना?"


"हो मम्मा. आलेच पाच मिनिटात." पिहू जागेवरूनच ओरडली आणि मेघा किचनमधून बेड आवरायला गेली.


पाच मिनिटांचे पंधरा मिनिटे होत आली तरी पिहूची काही चाहूल लागेना म्हणून दबक्या पावलांनी ती काय करतेय हे बघायला मेघा परत तिच्या स्टडी रूम मध्ये डोकावली. मॅडम सगळी पुस्तकं बाजूला सारून मोबाईल मध्ये डुबल्या होत्या. क्षणाक्षणाला तिच्या ओठावर हसू फुलत होते. इकडे मेघाच्या मनात रागाचा नुसता डोंब उसळला होता.


"पिहू काय करतेस तू?" तो उद्रेक तेवढ्याच जोराने बाहेर पडला.

"आँ, मम्मा घाबरले ना मी. केवढ्याने ओरडलीस? भीतीने मोबाईल खाली पडला असता ना?" हातातील मोबाईल सावरत पिहू दचकून म्हणाली.


"तेच विचारतेय मी? काय सुरू आहे तुझं? इतका वेळ मोबाईल घेऊन बसली आहेस ते? किती वाजले कळत नाही का? वेळेच काही बंधन असते की नाही? झोपायला येणार होतीस ना? मग केव्हाची इथेच चिपकून आहेस?" मेघाच्या प्रश्नांचा नुसता भडीमार चालला होता.


"मम्मा, येतच होते ना गं. जस्ट रक्षितला गुडनाईटचा मेसेज करून निघणारच होते तर तू येऊन घाबरवलंस."


"रक्षित? इतक्या रात्रीची मुलांशी बोलतेस? चल गुमान झोपायला." तिच्या हातातील मोबाईल हिसकावून मेघा म्हणाली.


"मॉम, यू कॅन्ट डू धिस. असा कोण मोबाईल घेतो यार?" पिहू तणतणतच तिच्या मागे गेली.


"ढील देतेय ना म्हणून जास्तच डोक्यावर चढत चालली आहेस. पप्पांनी लाड करून डोक्यावर चढवून ठेवलीये म्हणून अशी वागतेस. यापुढे तुला अजिबात मोबाईल मिळणार नाही. इतक्या रात्रीचे मुलांशी बोलायचे असते का?" मेघाचा आवाज अजूनही वाढला होता.


"मम्मा, रक्षित माझा फ्रेंड आहे आणि आमचा ग्रुप आहे. नीती पण आहेच ना त्या ग्रुपमध्ये. ती आत्ताच झोपायला गेली. म्हणून आम्ही दोघेच चॅटिंग करत होतो. तू मात्र उगाचच बात का बतंगड करत आहेस. जा आता बोलणारच नाही मी तुझ्याशी."

तोंड फुगवून पिहू अंगावर पांघरून घेऊन बेडवर पडली आणि लगेच झोपूनही गेली.


रात्रीचे जेवण, अभ्यास आटोपले की पिहू, नीती आणि रक्षित चांगले अर्धातास तरी चॅटिंग द्वारा एकमेकांशी बोलत असत आणि मेघाने यावर कधी आक्षेप घेतला नव्हता. आज मात्र मेघाचे मन मात्र अस्वस्थ झाले होते. आजवर ती अशी कधी वागली नव्हती पण गेल्या दोन दिवसांपासून तिच्यात बदल जाणवत होता.


"सुजित, ऊठ ना. खरंच झोपला आहेस का?" आपल्या रूममध्ये आल्यावर न राहवून शेवटी मेघाने नवऱ्याला हलवून उठवले.


"काय झाले मेघा? झोपू दे ना अगं." आळसावलेल्या आवाजात तो म्हणाला.


"अरे, इकडे माझी झोप उडालीय आणि तुला काय झोपायचे आहे? ती पिहू बघ ना कशी वागतेय." हुंदका देत तिने झालेला प्रकार त्याला सांगितला.


"मेघा, तू उगाच विषयाला ताणते आहेस हं. तुमचा संवाद मी ऐकलाय. तू म्हणतेस तसं आपल्या पिहूचं काही नाहीये गं. माझ्याच मोबाईलवरून तिचे मेसेज असतात सो माहितीये मला. आणि फक्त चौदा वर्षांची तर आहे ती." तो.


काय झालेय मेघाला? तिची झोप कशाने उडाली? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all