विळखा

Marathi Katha

कथेचे नाव : " विळखा "

विषय : "आणि ती हसली. "

फेरी : " राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा "



प्रसंग - १


संध्याकाळचे बहुदा साडेपाच-सहा वाजले असतील. आज अगदी सकाळपासून मनाला ठाम समजावून सांगत होतो, दारूला हातही लावायचा नाही. पण हा निश्चय जशी संध्याकाळ होईल तसा ढळू लागला. दिवस मावळतीला लागला होता, शेताकडून गाई, म्हैशी, शेतकरी परतीच्या वाटेवर होते. जनावरांच्या खुरांमुळे जमिनीवरची माती हलकीशी वरती उडत होती. पश्चिमेकडच्या डोंगरातल्या साखर कारखान्याच धुराडं धूर ओकत होतं, मनाची घालमेल सुरूच होती .. मनाचा ठिय्या करून गाव देवीच्या मंदिराकडे पळत सुटलो, देवीला नमस्कार केला, माफी मागितली. देवीचा अंगारा मुठीत घेतला आणि साऱ्या अंगाला फासून घेतला. तडक बाहेर पडलो पण का जाणे कोण पाय खालच्या गल्लीतील दारूच्या गुत्त्याकडे वळायला लागले. स्वतःला थोबाडीत मारून घेतली तरी काही फरक पडला नाही. सकाळी एकाच्या हाता-पाया पडून घेतलेले २० रुपये खिशातून काढले आणि राम्याकडून प्लास्टिकचा दारूचा पाऊच हिसकावून घेतला आणि क्षणात घशाखाली रीचवला. सगळ्या शपथा, गावदेवीचा अंगारा ह्यांचा जणू विसरच पडला. तडक घराकडे निघालो. रस्त्यात बरीच लोकं "च्यायला हे कधी सुधारणार नाही" असं काहीतरी बडबडत होते. माझं लक्ष मात्र पैशासाठी दुसरं सावज शोधण्यात मग्न होतं.


प्रसंग - २

सकाळी सातची वेळ असेल, रात्री खूप जास्त प्यायल्यामुळे आणि काहीच न खाल्यामुळे पोटात जोराची कळ आली. डोळे कसेतरी अर्धवट उघडलं, उठायचा कसातरी प्रयत्न केला पण अंगात त्राणच नव्हता. कसा असणार मागच्या चार दिवसापासून दारू शिवाय काहीच पोटात गेलं नव्हतं. तसाच पडून राहिलो ... बाहेर नजर गेली तर तर बायको परड्यात तुळशीला पाणी घालत होती. पोरगं बाजूला निपचित पडलं होतं. मोट्ठी पोरगी पाणी गरम करण्यासाठी चुलीत जाळ घालत होती. मी जमीनीवर जोरात हात आपटला तशी बायको तुळशीला पाणी घालायचं सोडून पळत माझ्याजवळ आली. मला कसबसं उठवलं आणि चहा दिला. चहा पिऊन थोडी तरतरी आली. फाटलेल्या वाकळतंन पोरग्यांचं अर्धवट शरीर दिसत होतं. घरच्या भिंतीला पडलेल्या भेगा आणि छपरावरची बरीच कौलं निघून गेली होती. स्वतःलाच स्वतःची लाज वाटायला लागली, ओक्साबोक्सी रडायला लागलो जणू चांगला विचार करायची कुवतच विसरून गेलो होतो. दारूचा विळखा माझ्या शरीराला आणि कुटुंबाला घट्ट बसत चालला होता. बायकोनं राब-राब राबावं आणि तिच्या कष्ठाचे पैसे मी चोरून दारू प्यावी हे नित्याचे झालेले.


प्रसंग - ३

नेहमीची मुंबई गाडी आज आठ वाजले तरी आली नव्हती. काल गावभर फिरून कुणी पैसे दिले नव्हते. पाया पडलो, कळवळलो, रडलो, पाय धरले एका-दोघांचे सोडलेच नाहीत. त्यांनी लाथा घातल्या. एकानं घालतलेल्या लाथेनं अजूनही उजवा कान सुजला होता. मुंबईच्या गाडीतून कुणीतरी मुंबईकर उतरावा, त्याचे पाय धरावेत, दहा-वीस रुपये पदरात पाडून घ्यावेत आणि आजचा दिवस सुकर करून घ्यावा. मुंबईहून लहानपणीचा मित्रच आला, त्यानं २० रुपये हातावर टेकवलं आणि सुधर लेका असा सल्ला देउन निघून गेला. त्याच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं ... पावलं आपोआप गुत्त्याकडे वळायला लागली. तिच आस, तीच ओढ आणि घशाखाली दारू गेल्यानंतरची समाधानाची लहर ....


प्रसंग - ४

पाचवी-सहावीला असेन, नेहमीप्रमाणे मित्रांबरोबर ओढ्याला अंघोळीला गेलो. वरच्या गल्लीतला एक आडदांड दादा पोरांचं मुंडक काखेत घालून पाण्याखाली बुडवत होता. पोरं जीवाच्या आकांताने ओरडत पळत होती आणि तो एका राक्षसासारखा हसत होता. पाठीमागून हळूच येऊन त्यानं मला पकडलं आणि माझं डोकं काखेत मारून पाण्यात उडी मारली. दहा सेकंद, वीस सेकंद, मी कसा तरी तग धरला नंतर मग घुटमळायला लागलो, श्वास थांबला, पाय जोर-जोरात पाण्यात आपटू लागलो. वाटलं संपलं सगळं आणि तेवढ्यात त्यानं आपला विळखा सैल केला... कसंतरी काठावर येऊन निपचित पडलो. हे सर्व आठवायचं कारण काल रात्रीचा प्रकार. मित्राने कुठून तरी चोरून आणलेल्या दोनशे रुपयाची दारू रात्री प्याली ... नेहमीप्रमाणे काही न खाताच झोपलो. मध्यांन रात्री कधी तरी जाग आली ... अंगाला प्रचंड खाज सुरु झाली ... दरदरून घाम सुटला. उशाला असलेला तांब्या कसातरी हातात धरला आणि भिंतीवर आपटला, तशी बायको आणि पोरं उठून बसली. माझी अवस्था बघून बायको घाबरली, पोरं रडायला लागली. बायकोनं शेजाऱ्यापाजाऱ्यांना उठवायचा व्यर्थ प्रयत्न केला. च्यायाला ह्यांचं दरोजचंच आहे म्हणून कुणीही दरवाजा उघडला नाही. बायकोला वाटलं हे आता हाताबाहेर जाईल म्हणून ती पळत डॉक्टरला बोलवायला गेली. मोठ्या पोरगीन येऊन घट्ट मिठी मारली ... रडायला लागली. म्हणाली बाबा मी शेतात जाऊन काम करेन, पैसे कमवेन आणि तुला जगवेन पण तू आम्हाला हवास. अचानक प्रचंड ऊर्जा आली ... खुप जगावंसं वाटलं, क्षणार्धात डोळे पाणावले. मागची पाच-सहा वर्षे आठवली, दोस्तांच्या इच्छेखातर घेतलेले दोन घोट आठवले आणि आताचा हा विळखा. आत्ता जगायलाच हवं अशी कुठूनतरी प्रचंड ऊर्जा मनात भरून आली. पुढचे दोन-तीन दिवस त्या पाण्यातल्या वीस सेकंदासारखा तळमळत राहिलो आणि मग थोडी पक्कड ढिली झाली. बायका-पोरांना जवळ बोलावून घेतले, सगळ्यांचे पाय धरले, माफी मागितली. संध्याकाळी बायकोबरोबर गेलो गावच्या विठ्ठलाच्या मंदिरात … गळ्यात माळ घातली. निश्चय एकच, आत्ता कुटूंब सुखी ठेवायचे. देवळातून बाहेर पडताना न जाणे कोण असं वाटलं की विठ्ठलानं माझ्या पाठीवर थाप मारलीय आणि रखुमाईनं बायकोच्या पदरात सुख-समाधानाची लयलूट केलीय...


प्रसंग - ५

दारात मांडव, सनई चौघडे, बँड, स्पीकरवर लग्न सराईला शोभतील अशी गाणी. आज माझ्या पोरगीच लग्न, लग्न दारातच करून देणार असा माझा अट्टाहास. सगळीकडे गडबड घाई, पाहुण्यांची प्रतिक्षा. छोटे पण दोन मजली घर, पोरांनी लायटींगने सजवलेले. गळ्यातल्या माळेकडे हात गेला ... दहा वर्षे झाली दारूला स्पर्श नाही, प्रचंड मेहनत केली, दारूच्या नादात विकलेले शेत परत मिळवले, दोन मजली घर बांधलं, पोरगीला बारावी पर्यंत शिकवलं. बायको फार कष्ठाळू, माझ्या खांद्याला खांदा लावून राबली. मनासारखा जावई मिळाल्यामुळे तीही आज खूश होती. केलेल्या कष्ठाचे चीज झाल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सासरी जाताना पोरगी अगदी घट्ट बिलगली. आज तिच्या डोळ्यात अश्रु नव्हते ... एक विश्वास होता बाप मृत्युच्या दाढेतून बाहेर आलेल्याचा आणि त्याचं बापानं मागच्या दहा वर्षांच्या केलेल्या कष्टाचा.


प्रसंग - ६

आज गावातल्या नशा निर्मूलन केंद्राचं उद्घाटन ... मुक्तांगण असं साजेसं नाव, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण. ध्येय एकच विस्कटलेले, विळखेत सापडलेले संसार रुळावर आणायचे. दोन शब्द म्हणता-म्हणता चांगले पंधरा मिनिटे बोललो. निश्चय केला की प्रत्येकाने एक तरी संसार रुळावर आणायचा. आपण वाचलो तसं बऱ्याच जणांनी वाचावं, ती वीस सेकंदाची घुसमट कुणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून ह्यात ऊडी घायची ठरवली. गळ्यातल्या माळेवर आणि विठ्ठलाने मारलेल्या पाठीवरच्या थापेवर माझा प्रचंड विश्वास. मी आता सावज शोधायला लागलो पण ते जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ...



व्यासपीठावर मोठी पोरगी आणि बायको बसली होती .. भाषण संपता-संपता एक नजर त्यांच्याकडे गेली .. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर हसू .....



लेखन - अरविंद राजिगरे