विलीन

A youngster gets stucked into few surprising events which he was not able to correlate with his daily routine. He is assigned by a villager who actually feeds him and took utmost care ! Read what happened next....

विलीन:-(भयकथा)

आज त्याची त्या रस्त्यावरून जायची पहिलीच वेळ नव्हती . या पूर्वीही अनेक वेळा त्याने शॉर्ट कट म्हणून हा रस्ता अवलंबला होता . पण का कोण जाणे , आज त्याच्या मनात एक अनामिक भीती का वाटत होती माहीत नव्हते. रस्त्यावर साधे चिटपाखरूही नव्हते.
लांबून कुठेतरी फक्त कुत्रा भुंकल्याचा आवाज येत होता , तेवढं सोडला तर तर त्या रस्त्याला कोणाचीच साथ नव्हती . रात्रीच्या 11 वाजता लाईट नसताना त्या रस्त्यावरून कसे पुढे जायचे त्याचे त्यालाच कळत नव्हते.
भित्रा वगैरे नव्हता तो , पण  त्याचं मन आज  धडधडत होते. म्हणजे हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट पणे ऐकू येत होते. अंदाजे एक किलोमीटर चा पॅच त्याला अजून चालून जायचं होतं तेव्हा तो हमरसत्यावर पोचला असता. तिथून त्याच घर 5 मिनिटावर होते, पण आज पाऊल सुद्धा पडत नव्हतं ,किंवा प्रत्येक पाऊल पडताना इतकं जड झालं होतं की त्याला पाऊल टाकायचीच इच्छा होत नव्हती.
अचानक मागून हळूच काहीतरी आवाज आला. त्याने ताडकन मान मागे वळवली तर मागे कोणीच नव्हते.  थोडी पावले भराभर टाकायला लागला तर त्याच्या कानाला थंडगार हवेचा स्पर्श झाला. त्याने कानाला हात लावला तर तिथे पण काही जाणवले नाही. तसाच पुढे चालत असताना वाऱ्याचा एकदम जोराचा झोक आला जो त्याला अंगावर पूर्णपणे शहारे देऊन गेला. आज काय होतंय काही कळत नाही असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मोबाईल मध्ये कालनिर्णय च्या अँप्लिकेशन ला चेक करून आज कुठला दिवस आहे हे त्याने पाहिलं आणि नेमकं ठळकपणे आज अमावस्या आहे हे त्याला कळले. त्याचे पाय लटपटायला लागले , आज काहीतरी वेगळे घडतंय याची जाणीव त्याला व्हायला लागली. आज घरी लवकर जायचंय अस मनात आलं आणि तो भराभर चालायला लागला आणि तेवढ्यात त्याला हळूच आवाज आला "आकाशsss " आणि तो थबकला. 
इकडे टिकडे बघितले आणि  मनातल्या मनात आपल्या मनाचा भ्रम च की काय असा विचार त्याने केला. पुढे पाऊल टाकणार तर त्याला पुन्हा आवाज आला "आकाशS" , मनात उरल सुरल जेवढं धैर्य होत ते मनात घेऊन त्याने मान मागे वळवली. 
मान मागे वळल्या वरती त्याच्या अगदी मागे धूसर असे त्याला काहीतरी जाणवलं. जे जाणवलं ते दिसत काही नव्हतं आणि त्यातूनच पुन्हा आवाज आला "आकाशsssssss" . त्या क्षणाला त्याला भोवळ आली आणि तो खालती कोसळला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो एका वेगळ्याच अनोळखी घरात होता. वरती पत्र्यावरती एक पंखा हळूहळू फिरत होता ,बाजूला पाण्याचा माठ होता आणि तो ज्यावर झोपला होता तो एक लोखंडी छोटासा पलंग होता.
घरात कोणीच नव्हत पण एक चटई खाली अंथरलेली होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण अंग खूप जड झाल्यासारखे वाटल मग त्याने आवाज दिला " कोणी आहे का?" 
तेवढ्यात कोणाचीतरी बाहेर पावले वाजली. एक माणूस दरवाजा उघडून आत आला आणि म्हणाला, "आहे की मी , म्या कुठे जाणार! तुम्हीच रात्री चक्कर येऊन पडला होतात!  काय झालं होतं तुम्हासनी?"
त्याच्या कपड्यावरून तर तो एक गरीब मजूर वाटत होता आणि त्याच्याकडे पाहता त्याच्याकडे काहीच नसेल हे कळत होते.
आकाश म्हणाला " काय झाले होते मला माहीत नाही पण मला एकदम चक्कर आली. बहुतेक मला कुठलेतरी भास होत होते किंवा मनाचे भ्रम होत होते."
"अहो साहेब , फकस्त चक्कर न्हाय ,तुमच्या तोंडाला फेस भी आला होता , मी तुमसनी घरी आणलं पाणी पाजलं तरी भी तुम्ही शुद्धीत आलं नाय तर मी तुमासनी तसाच झोपवलं बगा."
"काय नाव तुमचे, दादा?"
"म्या हिरक".
"हिरक भाऊ , कालची आठवण आणून देऊ नका ,कालची रात्र काही वेगळीच होती बघा.
"आवं, काय व्हत काल?"
"काही कळायला मार्ग नाही पण होते काहीतरी नक्की".
"बरं, असो , तुम्ही घ्या इश्रांती जराक मी जाऊन येतो."आणि तो गेला
आकाश इतका थकलेला होता की त्याला परत झोप लागली आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा दुपारचे चार वाजले होते.
 त्याला पोटात भुकेची कडकडून जाणीव झाली. तोपर्यंत हिरक त्याला जाग यायची वाट बघत होता.
जसा तो उठला तर त्याला एक तांब्याभारून पाणी दिले आणि म्हणाला" घ्या जर चूळ भरून घ्या आणि थोडं खाऊन घ्या."
त्याने ताटात बघितले तर कांद्याच्या 2 फोडी , अर्धी भाकरी आणि थोडासा झुणका तर बाजूला एक हिरवी मिरची होती.
त्या बिचाऱ्या हिरक ने आपल्यासाठी इतके केले हे पाहून आकाश मनातून भारावला .
"इतकं काय करायची गरज होती दादा".
"आवं,  खाल्लं पाहीजेल , तुमचा जीव बारा न्ह्याय."
इतकं बोलून झाल्यावर आकाश ने तोंड धुतले आणि खायला बसला , थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आकाश म्हणाला " दादा मला आज घरी जावं लागेल."
"तुम्ही कुठं राहत?"
"मटशिखांच्या चाळीत"
"कुठं आलं ते?"
"बंदराच्या जवळ"
"कुठला बंदर?"
आता आकाश  आश्चर्याने म्हणाला "इथं किती बंदर आहेत?"
"कुठलाच नाही."
आकाश म्हणाला"तुम्ही काय बोलताय , हे बंदर नाही आहे का जिथे आपण राहतो?"
हिरक त्याच्याकडे चक्रावून पहात होता.
आकाश म्हणाला "हे कुठलं गाव आहे?"
हिरक म्हणाला " हे लोधीपूर".
हे नाव तर आकाश ने कधीच ऐकले नव्हते."
"तुम्ही कुठल्या गावचे?"
आकाश म्हणाला " आमचं गाव तिकडे लांब, आमच्या गावचे नाव ,निवबाव."
हिरकसुद्धा हे नाव पहिल्यांदा ऐकत होता.
आकाश ला प्रश्न पडला आपण आपल्या घरी जात असताना अशी कुठली जागा आली कि जिथे आपण चक्कर येऊन पडलो आणि इथे आलो. आकाश ला काही सुचेना. संध्याकाळ व्हायला आली होती तशी त्याला पुन्हा थोडी झोप येत होती.
पण आज झोपायचे नाही या बेताने तो म्हणाला "चला मला इथला एसटी स्टँड दाखवा".
"एसटी स्टँड ला जाऊ पण एसटी तर रात्री 12ला असते."
"काही हरकत नाही आपण जाऊ."
हिरक म्हणाला " ठीक आहे ,थोडा आराम करा आपण 11 वाजता जाऊ, ST पुण्यासनी जाईल मग तुम्ही तिथून पुढे जा."
"बर" म्हणून आकाश तसाच मागे पडला.
१०.३० वाजल्या पासून हिरक ने आकाश ला गदागदा हलवायला सुरवात केली
"ओ सायबानू , एसटी पकडायची न?  जायचा न तुमसनी?"
आकाश लगबगीने उठला , सामान तर काहीच नव्हते , तोंडावर पाणी मारले आणि निघाला.
हिरक जाताना बराच बोलत होता ,आकाश च लक्ष नव्हते. एसटी स्टँड ला पोचायच्या आधी 10 मिनिटे  एका ठिकाणी रस्ता वळला. आकाश ला तो रस्ता दिसल्यावर त्याने हिरक ला थांबवले ." बघ परत तोच रास्ता."
"कुठला रस्ता."
आकाश म्हणाला " बघ परत तोच रस्ता , ज्या रस्त्याने मी काल आलो होतो आणि मला चक्कर आली होती. हीच वेळ होती."
हिरक म्हणाला "अहो साहेब वर्षे न वर्षे हाच रास्ता आहे, रास्ता कुठे जाणार आहे.माणसे जातात रास्ता कुठे जाणार आहे."
आकाश म्हणाला " हाच तो रस्ता , हीच 11ची वेळ होती जिथे मला चक्कर अली."
हिरक म्हणाला"अहो साहेब , तुम्ही कुठल्या गावचे , इथे कसे आलात मी तुम्हाला उचलून आणले ते खरं.  तुम्ही कुठल्या रस्त्याबद्दल बोलत आहेत?"
"अरे नाही रे हाच रस्ता होता."
"अहो साहेब रात्रीच्या वेळी सगळे रस्ते सारखेच दिसतात."
"ठीक आहे , चल लवकरात लवकर एसटी स्टँड ला" आणि तो चालू लागला.
तो निघाल्यावर पुन्हा कालच्यासारखी त्याची पाऊले जड व्हायला लागली , मनात भीती वाटायला लागली. परत धडधडायला लागले, त्याच्या कपाळावर घर्मबिंदू उमटायला लागले , त्याला कळेना हे काय होतंय आणि हे होत असताना तो पूर्णपणे एसटी स्टँड कडे जायचा प्रयत्न करत होता.
बाजूला हिरक चा आवाज कमी येत होता , किंवा येतच नव्हता म्हणा ना . त्याचे हिरक कडे लक्षच नव्हते. तो तसाच पुढे जाणार तर त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला "आकाशssss" हा थबकला , पण याची आज मागे बघायची अजिबात इच्छा नव्हती.
पुढे पाऊल टाकणार तर पुन्हा आवाज आला "आकाशsssss" हा प्रचंड घाबरला. याने हाक मारली " हिरक, हिरक कुठे आहेस तू?" काहीच आवाज आला नाही. 
तेवढ्यात  पुन्हा आवाज आला "आकाशsss" याच्या मनाची धडधड याला स्पष्ट ऐकू येत होती आता छातीचा भाता फुटून काही होईल की काय याची भीती वाटत होती ".
मागे वळून न पाहताच कोण आहे असे त्याने विचारले , तर मागून हसण्याचा आवाज आला.
याने पाय उचलण्याचा प्रयत्न केला , पण पाऊल जड झाले होते आवाज येतच होता.
मन घट्ट करून याने मान वळवली , याच्या मागे एकदम जवळ एक धूसर पांढरी आकृती होती , त्या आकृती कडे बघत हळूहळू त्याचे डोळे मोठे होत होते.
ती आकृती हसत होती आणि  हळू हळू आकाश त्या आकृतीत विलीन होत होता.
ज्या 'हिरक' ने आपल्याला खायला घातले त्याच्याच थंडगार धूसर आकृतीत आपण विलीन होत आहोत हाच त्याचा शेवटचा अनुभव होता. 
©®अमित मेढेकर