Login

विळखा भाग ९

Suspense Story

विळखा भाग ९


मागील भागाचा सारांश: विकीच्या अकाऊंट मधील पैसे गायब झाल्याने सुरज व विकीला राग आला होता. हे सगळं कोणी केलं असेल? याचा शोध घेण्यासाठी सुरज व विकी चेतनला घेऊन घराबाहेर पडले.


आता बघूया पुढे….


चेतनने हळूच डोळे उघडले तर त्याला एका खुर्चीला बांधण्यात आले होते. चेतनचे हात व पाय बांधून ठेवलेले होते. चेतनने आजूबाजूला बघितले, तर विकी व सुरजलाही खुर्चीला बांधून ठेवण्यात आलेले होते. तिघेही एकमेकांपासून ठराविक अंतरावर होते. खोलीचा दरवाजा बंद होता.


"सुरज भय्या, विकी भय्या, आपण इथे कसे आलो?" चेतन रडक्या आवाजात ओरडत होता. 


चेतनच्या आवाजाने सुरज व विकीने डोळे उघडून इकडे तिकडे आपली नजर फिरवली.


सुरज जोरात ओरडून म्हणाला,

"सुरजच्या वाकड्यात शिरण्याची कोणामध्ये ताकद आहे? जो कोणी यामागे असेल त्याने माझ्यासमोर त्वरित यावे. हिंमत असेल तर माझा सामना करा. भित्र्यासारखे कुठे जाऊन बसला आहात?"


"भय्या, आपण त्या पत्र्याच्या शेडमधून इकडे कसे काय आलो?" विकीला प्रश्न पडला होता.


"पत्र्याच्या शेडमध्ये गुंगी येणार औषध असेल, आपण त्याचा वास घेतला आणि बेशुद्ध झालो." सुरजने उत्तर दिले.


तेवढ्यात एक माणूस तोंडावर रुमाल बांधलेला दरवाजा उघडून आत आला.


"तुम्हाला जादा चरबी चढली आहे का? आमच्या मॅडमला आरडाओरडा केलेला अजिबात आवडत नाही."


"कोण मॅडम? त्यांच्यात हिंमत असेल, तर आमच्या समोर बोलवा." विकी म्हणाला.


तो माणूस विकी जवळ आला, विकीच्या जखमी पायावर आपला बूट घातलेल्या पायाने जोरात मारले. विकी वेदनेने विव्हळून उठला.


"तुला शांत बसायला लावलं ना. तुम्ही स्वतःला स्वतःच्या क्षेत्राचे राजे म्हणणारे आज इथं नाक घासत आला आहात, तेव्हा तुम्हाला आमच्या मॅडमची हिंमत कळली असेलचं." तो माणूस हसून म्हणाला.


आता तो माणूस चेतन जवळ गेला.


"तू चांगल्या घरचा मुलगा दिसतो आहेस, मग या चोर लोकांच्या टोळीत सहभागी कसा झालास? आता त्यांच्या कर्माची फळं तुला भोगावी लागणार आहे." त्या माणसाने चेतनच्या कानाखाली जोरात लगावली. 


चेतनच्या कानातून रक्त यायला लागलं होतं. तो माणूस सुरज जवळ गेला.


"तुझी ओपनिंग आमच्या मॅडमचं करतील." तो माणूस जोरात हसून दरवाजा बाहेर निघून गेला.


"विकी, आपल्या शत्रूंच्या यादीत कोणी बाई आहे का?" सुरजने विचारले.


"भय्या, मी तेच आठवण्याचा प्रयत्न करत आहे. आजवर मी अनेक लोकांशी पंगे घेतले, पण कोणत्याच बाईशी पंगा घेतला नाही." विकीने सांगितले.


"तुम्ही दोघांनी मला कशात अडकवलं आहे? माझा काही दोष नाहीये. मी पैश्यांसाठी तुमच्याकडे नोकरी करत होतो. तुम्ही कोणता बिजनेस करतात? हेही मला ठाऊक नाही." चेतन रडायला लागला होता.


"चेतन, रडायला तू बाई आहेस का? अरे एकदा विकीकडे बघ. इतकं लागून सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी नाहीये. असली मर्द हा असतो." सुरज म्हणाला.


"अरे, किती बडबड करत आहात? थोड्यावेळ शांत बसता येत नाही का?" दरवाजातून एक मुलगी बडबड करत आत आली. त्या मुलीने चेहरा स्कार्फने गुंडाळलेला होता.


सुरज जोरात हसून म्हणाला,

"ह्या सगळ्यामागे तू आहेस तर… तुझ्यात तुझा चेहरा दाखवण्याची हिंमत नाहीये आणि तू आम्हाला गप्प बसवणार."


"माझ्यात हिंमत नाहीये असं तुला वाटतंय का? मूर्ख माणसा, तुला स्वतःच्या ताकदीवर प्रचंड विश्वास होता ना. तुला काय वाटलं होतं? तू आणि तुझा हा चोम्या काही पाप कराल आणि त्यातून तुमची सुटका होईल. तुझ्या एकेक पापाचा हिशोब आज चुकता करावा लागणार आहे." ती मुलगी एकदम त्वेषाने बोलत होती. 


स्कार्फमधून दिसणाऱ्या डोळयात राग दिसत होता. 


"ताई, प्लिज मला सोडा. माझा काही दोष नाहीये." चेतन गयावया करत होता.


"अशीच गयावया मी ह्या विकीकडे करत होते. सगळेजण ह्या दोघांना भय्या म्हणतात ना, ते दोघे त्या लायकीचे सुद्धा हे नाहीयेत. ह्या दोघांना पैश्यांचा लई माज होता ना, तो पैसाच ह्यांच्याकडून हिरावून घेतला आहे." ती मुलगी रागात बोलत होती.


"तू चेहरा दाखवशील, तर मी तुला ओळखेल ना. तुझ्यासारख्या छप्पन पोरींसोबत मी रात्र घालवली आहे. तुला आणि तुझ्या अख्ख्या खानदानाला मी विकत घेऊ शकतो." विकी चिडून बोलत होता.


"तुला माझी आठवण चेहरा न दाखवता करुन देते. तुझ्याकडे एक दमडीही उरली नाहीये आणि तू मला विकत घ्यायला निघाला आहे. माझ्या खानदान तुझ्यामुळे संपलं आहे. मी मात्र तुला त्या वेदना दिल्याशिवाय सोडणार नाही."


दरवाजा जवळ जाऊन एक बाटली घेऊन ती विकीजवळ गेली. हळूच बाटली त्याच्या बांधलेल्या हातांवर ओतली. विकी जोरजोरात ओरडायला लागला होता. विकीचे ओरडणे ऐकून ती मुलगी मोठमोठ्याने हसायला लागली.


"हे पोरी, तू हे काय केलंस? तू विकीच्या हातावर ऍसिड टाकलं. त्याचे हात भाजले आहेत, त्याला वेदना होत आहेत. प्लिज त्याला सोड आणि डॉक्टरकडे घेऊन जा." सुरजच्या बोलण्यात थोडी नरमाई होती.


"तुझा आदेश पाळायला मी तुझी नोकर नाहीये. एकदा तो दिवस आठव, ज्या दिवशी मी तुझ्याकडे भीक मागत होते आणि तू काय वागला होतास? खरंतर हे ऍसिड मी तुझ्या अंगावर सुद्धा टाकणार होते, पण विकीच्या वेदना तुलाही जाणवतील याची मला गॅरंटी होती. माझ्या आई वडिलांना ज्या यातना त्यावेळी झाल्या होत्या, त्या यातना मला तुझ्या डोळयात बघायच्या आहेत." ती मुलगी म्हणाली


ती मुलगी कोण होती? विकी व सुरजने तिच्यासोबत काय केले होते? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe








🎭 Series Post

View all