विळखा भाग ८

Suspense Story

विळखा भाग ८


मागील भागाचा सारांश: विकी जखमी अवस्थेत घरी आला होता. विकीला राजूचा फोन आल्याने तो हायवेवर चालला होता, त्याला चार-पाच जणांनी अडवून खूप मारलं. विकीचा मोबाईल सुद्धा सापडत नव्हता. विकीचा फोन नंबर ट्रेस केल्यावर राजू व विकीच्या नंबरचे शेवटचे लोकेशन एकच असल्याचे आढळून आले.


आता बघूया पुढे….


"चेतन, माझ्या पर्सनल अकाऊंट मधील पैसे तसेच आहेत का? हे चेक कर बरं." विकीने चेतनला सांगितले.


चेतनने विकीचे अकाऊंट चेक केले.


"भय्या, काही वेळापूर्वी तुमच्या अकाऊंट मधील सर्व पैसे काढण्यात आले आहेत." चेतनने सांगितले.


"अरे, पण हे कसं शक्य आहे? माझ्या अकाऊंटचे डिटेल्स राजूकडे किंवा कोणाकडेच नव्हते." विकी रागात ओरडून म्हणाला.


"भय्या, तुमच्या मोबाईल मध्ये अकाऊंट डिटेल्स होते का?" चेतनने विचारले.


"हो होते ना. आता माझ्या लक्षात सगळं येऊ लागलंय. माझा मोबाईल चोरण्याचा हेतू मला कळतोय. माझा मोबाईल आणि बँकेचे अँप माझ्या फिंगर प्रिंट शिवाय ओपन होत नाही." विकी विचार करत म्हणाला.


"भय्या, तुम्हाला त्यांनी इतकं मारलं की, तुम्ही बेशुद्ध झालात, त्याचवेळी त्यांनी त्यांचा डाव साधला. भय्या, हे सगळं प्लॅन करुन केलं आहे. ह्या सगळ्यामागे एकच सूत्रधार असेल." चेतनने सांगितले.


इतक्या वेळ सुरज सगळं ऐकत बसला होता. सुरजच्या हातात बंदूक होतीच. सुरजने बंदूक चेतनवर धरली व तो म्हणाला,


"आजवर राजू कधीच आमच्या विरोधात गेला नाही. तू आमच्या घरात प्रवेश केलास आणि हे सगळं घडायला लागलं. या सगळ्यामागे नक्कीच तुझा हात असेल. तुझ्याशिवाय कोणीच बाहेरची व्यक्ती इथे आली नाहीये. राजू व विकीचा फोन नंबर तुच ट्रेस केलास, राजूचे मॅसेज तुच सांगितलेस."


चेतन हात जोडून रडक्या आवाजात म्हणाला,

"सुरज भय्या, इथे येण्याआधी मला तुम्ही कोण? हेही ठाऊक नव्हतं. अजूनही तुमचा बिजनेस काय? याची कल्पना मला नाही. विकी भय्याची भेट झाली आणि मी इथे आलो. इथे आल्यापासून मी घरातच आहे. तुम्ही सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक करा. 


माझ्याकडे मोबाईल सुद्धा नाहीये, तर मी हे सगळं कसं करेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढे पैसे चोरुन त्याचं मी काय करु?" 


"अरे, पण तू सोडून इथे कोणी बाहेरचं आलंच नाहीये." विकी म्हणाला.


यावर चेतन म्हणाला,

"मी आलो, त्याच दिवशी एका माणसाला गार्डने पकडून आणलं होतं. तो माणूस कुठे गेला? तोही आलाच होता ना."


"चेतन, मी तर त्याच्याबद्दल विसरलो होतो. विकी, त्याचा आम्ही दोन दिवस पाहुणचार केला. तो गुंगीत असताना राजू त्याला लांब कुठेतरी सोडून आला होता." सुरज म्हणाला.


"सुरज भय्या, राजू त्याच माणसाच्या मदतीने हे सगळं करत असेल का?" विकीला प्रश्न पडला.


"सुरज भय्या, एकदा सीसीटीव्ही फुटेज चेक करुन बघा. राजू दादा व त्या माणसाचे जर कनेक्शन असेल, तर लगेच कळून येईल." चेतनने सुचवले.


चेतनच्या सांगण्यावरुन सुरजने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. राजू रात्रीच्या वेळेस बऱ्याचदा त्या माणसाच्या रुममध्ये गेला होता.


"बस झालं. आता काही झालं तरी आपण त्या लोकेशनला जाऊयात. अजून किती वेळ हातावर हात धरुन बसणार आहोत. राजूला खऱ्या सुरजचा रुद्रावतार दाखवावा लागणार आहे. विकी, तू आणि चेतन माझ्यासोबत चला." सुरज ओरडून म्हणाला.


"भय्या, मला खूप भीती वाटते आहे. ते लोकं मला काही करणार तर नाही ना? मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." चेतन भेदरलेल्या आवाजात म्हणाला.


सुरज रागाने त्याच्याकडे बघत म्हणाला,

"तू जर आता माझ्या बरोबर आला नाहीस, तर मीच तुला गोळी घालून ठार मारेल. आधीच माझं डोकं सटकलं आहे." 


चेतनला सुरज व विकी सोबत जाण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. सुरज पुढे, त्याच्या मागे विकी लंगडत आणि मागे चेतन घराबाहेर पडून गाडीत बसले. सुरजने आपल्या सोबत दोन बंदूकधारी गार्डला घेतलं होतं. सुरज व विकी दोघांचे चेहरे रागाने लालबुंद झाले होते. चेतन आतून खूप घाबरला होता. राजू व विकीच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवर जायचे त्यांनी ठरवले होते.


शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी जाऊन त्यांची गाडी थांबली. आजूबाजूला बघितलं, तर एक पत्र्याचे शेड होते. पत्र्याच्या शेडच्या दिशेने लोकेशन दाखवत होते. सुरज व विकी हातात बंदूक घेऊन त्या दिशेने गेले. चेतन व गार्ड त्यांच्या मागून गेले होते. 


पत्र्याच्या शेडमध्ये विकीला त्याचा मोबाईल दिसला, त्याशेजारी राजूचा मोबाईल देखील होता. आजूबाजूला कोणी आहे की नाही? याची खात्री सुरज करत होता. अचानक पाचही जणांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all