विळखा भाग ७
मागील भागाचा सारांश: राजू पाच कोटी रुपये घेऊन गायब झाला होता. चेतनच्या मदतीने राजूचे मॅसेज ट्रॅक झाले होते. सुरजच्या दोन अकाऊंट मधून एकूण पंचवीस कोटी गायब झाले होते. राजूच्या मॅसेज वरुन हे सगळं राजूने केलं असेल हे सिद्ध झालं होतं.
आता बघूया पुढे….
सुरज हातात बंदूक घेऊन चेतनकडे आला. सुरजच्या हातातील बंदूक बघून चेतन घाबरला होता.
"ही बंदूक तुझ्यासाठी नाहीये. यातील गोळीवर राजूचे नाव लिहिले आहे. तुझ्या मित्राने राजूचे शेवटचे लोकेशन पाठवले आहे ना? आपण त्या जागेवर जाऊ. तू माझ्यासोबत चल." सुरज म्हणाला.
"भय्या, तुमचा राग मला समजतो आहे, पण यावेळी डोकं शांत ठेवून काम करा. राजूने तुम्हाला संपवण्याचा प्लॅन केला असेल तर…. आपण तिकडे जावं, म्हणूनच त्याने हा प्लॅन आखला असेल. विकी भय्यासोबत काही कॉन्टॅक्ट झाला का?" चेतनने विचारले.
सुरज एका खुर्चीत बसत म्हणाला,
"तो विकीही कुठे तरफडलाय काय माहित? तो फोनच उचलत नाहीये. मला तर काय करावं? कोणाशी बोलावं? हेच कळत नाहीये."
"भय्या, तुमच्या तर बऱ्याच ओळखी आहेत ना? तुमच्या घरी येताना मी ज्या रिक्षाने आलो होतो, त्याने तुमचं नाव ऐकून माझ्याकडून भाड्याचे पैसे सुद्धा घेतले नव्हते." चेतन म्हणाला.
"चेतन, माझा खरा चेहरा, खरा बिजनेस कोणालाच माहिती नाहीये. सगळ्यांना मी एक समाजसेवक म्हणून माहितीये. माझा दाखवायला एक बिजनेस आहे आणि प्रत्यक्षात वेगळाचं आहे.
माझे जे पैसे गायब झालेत, ते अकाऊंट विदेशी बॅंकेतील आहे. हा सगळा काळा पैसा आहे. माझ्या ओळखी बऱ्याच आहेत, पण माझा खरा चेहरा कोणालाच ठाऊक नाहीये. माझा दोन नंबरचा बिजनेस विकी हँडल करायचा. राजूला त्यातील थोडंफार माहिती होतं. मी फक्त ऑर्डर द्यायचे काम करत होतो. ऑर्डर पाळण्याचे काम राजू आणि विकी करायचे." सुरजने सांगितले.
सुरज व चेतन बोलत असताना एक गार्ड पळत पळत तिथे येऊन म्हणाला,
"सुरज भय्या, ते विकी भय्या बघा ना."
गार्ड धापा टाकत बोलत होता, म्हणून त्याचे बोलणे कळत नव्हते. विकीचे नाव ऐकल्यावर सुरज व चेतनने घराच्या बाहेर धाव घेतली. दोन गार्ड विकीला धरुन घराच्या दिशेने घेऊन येत होते. विकीचा चेहरा रक्ताने माखलेला होता. विकीचे कपडे फाटलेले होते. विकीची अवस्था बघून सुरज भेदरला होता.
"कोणीतरी डॉक्टरला घेऊन या." सुरजने गार्डकडे बघून ऑर्डर दिली.
विकीला एका रुममध्ये नेऊन बेडवर झोपवण्यात आले होते. विकीला वेदना होत असल्याने त्याला काहीच बोलता येत नव्हते. थोड्याच वेळात गार्ड डॉक्टरला घेऊन आला. डॉक्टरने विकीला वेदनाशामक इंजेक्शन दिले. विकीच्या जखमा स्वच्छ करुन त्यांना मलम लावला.
"डॉक्टर, विकीला बरं वाटेल ना?" सुरजने डॉक्टरकडे बघून विचारले.
"इंजेक्शन मुळे दुखणं कमी होईल. मी काही औषध लिहून देतो, ती त्यांना द्या. मुक्का मार बराच लागला असल्याने त्यांना काही दिवस वेदना होतीलच. इंजेक्शनचा परिणाम झाल्यावर ते बोलू शकतील. लवकर बरे व्हायचे असेल, तर त्यांना आराम करायला सांग." डॉक्टर हे सांगून निघून गेला.
काही वेळाने विकीच्या वेदना कमी झाल्यावर त्याने सुरजला बोलावून घेतले. चेतनही त्याच्या सोबत होता.
"विकी, तुला कोणी मारलं? तुझा मोबाईल कुठे आहे? मी सकाळपासून तुला किती फोन केलेत." सुरजने विचारले.
"भय्या, दररोजप्रमाणे मी काल रात्री सोनलच्या घरी होतो. आज सकाळी राजूचा फोन आल्याने मला जाग आली. फोन कट झाला होता, पण राजूने मला मॅसेज करुन हायवेवर अर्जंट यायला सांगितले होते. मी सोनलच्या घरुन हायवेवर जात असताना एक गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. काही कारण नसताना त्यांनी मला गाडीतून ओढून मारलं.
मी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते चार ते पाच जण होते. सगळ्यांनी तोंडाला मास्क लावलेले होते. मी बेशुद्ध झालो होतो. शुद्ध आली तेव्हा, मी इथे जवळच्या नाक्यावर गाडीत होतो. माझा मोबाईलही सापडला नाही. मी गाडी घेऊन इथवर कसा आलो आहे? हे माझं मलाच माहीत." विकीने सांगितले.
विकीचे बोलणे ऐकल्यावर चेतन सुरजला म्हणाला,
"भय्या, हे सगळं राजू दादांनी प्लॅन केलेलं दिसतंय. मी विकी भय्याचा फोन ट्रेस करायला सांगतो."
सुरजने चेतनला फोन करण्यासाठी त्याचा मोबाईल दिला. चेतन मोबाईल घेऊन बाहेर निघून गेला.
"सुरज भय्या, तुम्ही चेतनला तुमचा मोबाईल का दिला?" विकीने विचारले.
मग सुरजने विकीला सगळी हकीकत सांगितली.
विकी सगळं ऐकून शॉक झाला होता. पुढील दहा मिनिटात चेतन रुममध्ये परत आला.
"सुरज भय्या, माझा संशय खरा ठरला आहे. राजू दादांचा व विकी भय्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन एकच आहे. विकी भय्यावर जो हल्ला झाला, तो राजू दादानेच घडवून आणला असेल." चेतनने सांगितले.
सुरज अतिशय रागात म्हणाला,
"आता शांत बसून चालणार नाही. काहीतरी करावे लागेल. ह्या सगळ्यामागे राजू आहे की अजून कोणी याचा शोध आता घ्यावाच लागेल."
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा