विळखा भाग ६

Suspense Story

विळखा भाग ६


मागील भागाचा सारांश: सुरजच्या घरी पकडून आणलेल्या माणसाचे सुरजने काय केले? याचा शोध घेण्यासाठी चेतन रुमच्या बाहेर पडला, पण अचानक त्याचा धक्का राजूला लागल्याने चेतनला काहीच कळू शकले नाही. चेतन हळूहळू सुरजच्या घरी रुळला होता. सुरजच्या बिजनेसची माहिती चेतनला समजली नव्हती.


आता बघूया पुढे….


सुरज आपल्या रुममध्ये गहन विचार करत बसलेला होता. सुरजचा मोबाईल वाजत होता, पण तो मोबाईल उचलत नव्हता. सुरज कसलातरी विचार करण्यात गुंग झाला होता. चेतन सुरजच्या रुम समोरुन जात असताना त्याला मोबाईलची रिंग ऐकू आली, म्हणून त्याने दरवाजा ढकलून बघितलं, तर सुरजच्या समोरच मोबाईल वाजत होता, पण तो उचलत नव्हता. 


चेतन हिंमत करुन सुरज जवळ आला.


"सुरज भय्या, तुम्ही फोन उचलत का नाहीये? मोबाईलची रिंग केव्हापासून वाजत आहे." 


चेतनच्या आवाजाने सुरज दचकून म्हणाला,

"चेतन, तू माझ्या रुममध्ये काय करतो आहेस? काय झालं?" 


चेतनने मोबाईल कडे बोट दाखवले. सुरजने मोबाईल वरील फोन कट केला.


"भय्या, काही टेन्शन आहे का? तुम्ही फोन का उचलत नव्हते." चेतनने विचारले.


"चेतन, कालपासून राजू गायब आहे. मी त्याला एका कामाच्या निमित्ताने बाहेर पाठवलं होतं. काम अतिशय महत्त्वाचे आणि जोखमीचे होते. राजू त्या ठिकाणी पोहोचलाच नाही. राजूचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ आहे. आता सकाळपासून तोच माणूस मला फोन करुन त्रास देत आहे.


मला तर काय उत्तर द्यावे? हेच कळत नाहीये. एकतर विकीही सकाळपासून फोन उचलत नाहीये. आजवर असं कधीच झालं नव्हतं. राजू माझ्या अगदी विश्वासातील माणूस आहे." सुरजने सांगितले.


"भय्या, राजू दादांकडे पैसे दिले होते का?" चेतनने प्रश्न विचारला.


"हो ना. राजूकडे पाच खोके होते." सुरजने उत्तर दिले.


"भय्या, आपण ह्यात पोलिसांची मदत घेऊ शकतो. एकतर राजू दादांना कोणीतरी लुटलं असेल किंवा राजू दादांची नियत बिघडली असेल." चेतनने सुचवले.


यावर सुरज म्हणाला,

"चेतन, मी पोलिसांची मदत घेऊ शकत नाही. आता का? ते विचारु नकोस. राजू माझ्यासोबत बऱ्याच दिवसांपासून आहे. तो असं करु शकत नाही."


"सुरज भय्या, राजू दादाचा मोबाईल ट्रेस केला, तर त्यांचं शेवटचं लोकेशन कळेल. शिवाय त्यांचे मॅसेजही आपल्याला भेटतील, त्यावरुन आपल्याला खरं काय आहे? ते कळेल. भय्या, पैसा माणसाची नियत कधीही बिघडवू शकतो." चेतनने सांगितले.


"हे काम तुला येतं का?" सुरजने विचारले.


"भय्या, मला येत नाही, पण माझा एक मित्र आहे. तो ही कामं करतो. मोठमोठे लोकं त्याला अमाप पैसा देऊन त्याच्याकडून मॅसेज, कॉल ट्रेस करण्याचे काम करुन घेतात." चेतनने सांगितले.


"तुझा मित्र पोलिसांना माझ्याबद्दल सांगणार नाही ना? तुझ्या विश्वासातील आहे ना? चेतन आधीच माझ्या डोक्यात गोंधळ उडाला आहे. माझी दोन्ही महत्त्वाची माणसे माझ्या संपर्काच्या बाहेर गेले आहेत." सुरजच्या डोळयात भीती आणि टेन्शन दिसून येत होते.


"भय्या, मला तुमचा मोबाईल द्या. मी त्याला तुमच्यासमोर फोन करतो." सुरजने चेतनकडे आपला मोबाईल दिला.


चेतनने त्याच्या मित्राला फोन करुन सविस्तर कल्पना दिली. 


"तुझा मित्र काय बोलला?" सुरजने विचारले.


"मी त्याला राजू दादांचा फोन नंबर दिला आहे. तो पंधरा मिनिटांत फोन करणार आहे. मी तोपर्यंत माझं राहिलेलं काम करतो." चेतन एवढं बोलून निघून गेला.


सुरजला काही चैन पडत नव्हती. सुरज इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. चेतन सुरजच्या रुममध्ये धावत गेला,


"भय्या, आपल्या एका अकाऊंट मधील पंधरा कोटी गायब झालेत. इथे येण्यापूर्वी त्या अकाऊंट मध्ये पैसे होते. काही मिनिटांत ते पैसे तेथून गायब झालेत."


चेतन घाबरलेला होता. सुरज चेतनच्या पाठोपाठ कम्प्युटर समोर जाऊन अकाऊंट चेक करत होता.


"अरे चेतन, माझ्या दुसऱ्या अकाऊंट मधून सुद्धा दहा कोटी गायब झाले आहेत, पण हे कसं शक्य आहे? माझ्या ह्या दोन्ही अकाऊंटचा पासवर्ड फक्त मला माहित आहे. माझ्याशिवाय कोणीच हे अकाऊंट हाताळू शकत नाही." सुरजला काहीच सुचत नव्हते. 


तेवढ्यात चेतनच्या मित्राचा फोन आला, त्याने राजूच्या मोबाईल मधील संशयास्पद मॅसेज सुरजच्या मोबाईलवर पाठवले. ते मॅसेज बघितल्यावर सुरजला आश्चर्याचा धक्का बसला.


"मी त्या सुरजचा नोकर नाहीये. स्वतः एवढं कमावतो आणि मला काहीच देत नाही. मी त्याची बरोबर जीरवणार आहे. तो आता माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पुढील आठवड्यात तो पाच खोके माझ्या ताब्यात देणार आहे.


सुरज्याला वाटतंय की, मला काहीच कळत नाही. मी त्याचा विश्वास जिंकून हळूहळू सगळीच माहिती काढून घेतली आहे. आता फक्त त्याच्या अकाऊंटचा पासवर्ड माहीत झाला की, मग त्याला माझा रंग दाखवतो."


मॅसेज वाचल्यावर चेतन म्हणाला,

"भय्या, हे सगळं राजू दादांनी केलं आहे तर…."


सुरजच्या डोळयात रक्त उतरलं होतं, त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. सुरजने हाताच्या मुठी आवळल्या. 


"आता मी त्या राजूला सोडणार नाही. तो जाऊन जाऊन कुठे जाऊ शकेल? तीस कोटी गेल्याने मला काही फरक पडत नाही. तो फक्त कचरा होता." बडबड करत सुरज निघून गेला.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all