विळखा भाग ५

Suspense Story

विळखा भाग ५


मागील भागाचा सारांश: चेतनला अकाऊंट बघण्याचे काम विकीच्या सांगण्यावरुन सुरजने दिले. घराबाहेर एक माणूस फोटो काढत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. गार्ड त्या माणसाला पकडून सुरज कडे घेऊन आला. सुरजने त्या माणसाला अतिथी कक्षात घेऊन जाऊन त्याच्या पाहुणचार करण्याची तयारी करण्याचे आदेश गार्डला दिले.


आता बघूया पुढे….


चेतन आपल्या रुममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करु लागला होता. चेतनच्या डोळ्यासमोर सुरजने पकडलेल्या माणसाचा चेहरा राहून राहून येत होता. त्या माणसाचा पाहुणचार सुरजने कसा केला असेल? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता.


चेतनला रुमच्या बाहेरुन काही अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. चेतन थोड्यावेळ विचार करुन रुमच्या बाहेर पडला. इकडे तिकडे बघून आवाज नेमका कुठून येतो आहे? याचा अंदाज चेतन घेत होता. चेतन चोरपावलांनी चालत असताना नेमका त्याचा धक्का एका पाठमोऱ्या माणसाला लागला.


चेतन आता घाबरला होता. त्या माणसाने मागे वळून बघितले व जोरात विचारले,


"चेतन, तू इथे काय करतो आहेस?" 


"राजू दादा, ते मी पाणी प्यायला चाललो होतो, पण किचन कुठे आहे? हे ठाऊक नसल्याने आवाजाच्या दिशेने येत होतो." चेतनने घाबरलेल्या आवाजात सांगितले.


"तुला या बंगल्यातील मुख्य जागा दाखवायच्याच राहिल्या ना. उद्या सकाळी मला आठवण करुन दे. मी तुला किचन, गार्डन, ऑफिस सगळं काही दाखवून देतो. तुझा धक्का मला लागला ते बरं झालं, सुरज भय्याला लागला असता, तर मग तुझा त्यांनी चांगलाच पाहुणचार केला असता. सुरज भय्या यावेळी घरात नाहीत ते बरं आहे. मला जरा निवांत बसता तरी येईल." राजू मिश्किल हसून म्हणाला.


"राजू दादा, पाहुणचार म्हणजे नेमकं काय? मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही." चेतन म्हणाला.


"तुला वेळ आल्यावर त्याचा अर्थ कळेलच." राजूने सांगितले.


"राजू दादा, तुम्हालाही सुट्टी मिळत नाही का?" चेतनने विचारले.


"मला सुट्टी मिळतच नाही आणि सुट्टी घेऊन मी करु तरी काय? माझे कोणीच कुटुंबिय या जगात नाहीयेत. सुरज भय्याचं माझं कुटुंब आहे." राजूने उत्तर दिले.


"राजू दादा, सुरज भय्या देवमाणूस वाटतात ना? आपल्या सारख्या गरिबांना काम देऊन ते आपल्यावर उपकारच करतात ना." चेतन म्हणाला.


"पोरा, सुरज भय्या देवही आहेत आणि वेळप्रसंगी ते राक्षसाचा अवतार घेतात. सुरज भय्याशी जे चांगलं, त्याच्याशी सुरज भय्या चांगलं वागतात आणि जे वाईट त्याला सुरज भय्याचा रुद्रावतार बघायला मिळतो. आता जाऊन झोप. ह्या घरात सगळीकडे सीसीटीव्ही लावलेले आहेत. सुरज भय्याला आपण गप्पा मारताना दिसलो, तर दोघांना फैलावर घेतील." राजूने चेतनला किचन दाखवले. 


चेतन पाणी पिऊन आपल्या रुममध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजूने चेतनला त्याचे काम करण्याचे ऑफिस व काय काम करावे लागेल? याची कल्पना दिली.


चेतन टेबलवर ठेवलेल्या एकेक फाईल बारकाईने बघत होता. सगळ्याच फाईलवर धूळ बसलेली होती. चेतनने फाईल वरील धूळ झटकली. चेतन एकेका फाईलचा अभ्यास करत होता. फाईल चाळत असताना चेतनला त्या फाईलमध्ये एक फोटो आढळून आला होता. फोटो बघून चेतन आश्चर्यचकित झाला होता. चेतनला त्या फोटोकडे बघत असताना त्याला मागून आवाज ऐकू आला,


"ए हिरो. काम आवडलं का?" 


चेतनने मागे वळून बघितले, तर विकी दरवाजात उभा होता. चेतनने विकीकडे बघून फक्त स्माईल दिली. विकीने चेतनच्या हातातील फोटो खेचून घेतला.


"हा फोटो तुला कुठे मिळाला?" विकीने दरडावून विचारले.


"ह्या फाईलमध्ये मिळाला." चेतनने उत्तर दिले.


"हा राकेश, तुझ्याआधी इथे बसून काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने माझ्याशी भांडण केले होते, मग मी त्याचा कायमचा विषयचं संपवून टाकला." विकीने सांगितले.


"विषय संपवून टाकला, म्हणजे?" चेतनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.


"अरे, म्हणजे त्याला कामावरुन काढून टाकले. तू वेगळा काही अर्थ घेऊ नकोस." विकीने सारवासारव केली.


विकी चेतन सोबत बोलत असताना सुरज तिथे येऊन म्हणाला,

"चेतन, काम जमतंय का?"


"हो, प्रयत्न करतोय. हळूहळू जमेल." चेतनने सांगितले.


"चेतन, तुला काही कळलं नाही, तर राजूची मदत घे. विकी, माझ्यासोबत माझ्या रुममध्ये चल. तुला कालच्या पाहुण्याबद्दल थोडं सांगायचं आहे." सुरज बोलून निघून गेला, त्याच्या पाठोपाठ विकीही गेला. 


सुरज व विकीचे हावभाव चेतनला संशयास्पद वाटत होते.

—--------------------------------------------------


चेतनला सुरजच्या घरी राहून आठ दिवस झाले होते. सुरजने चेतनला पहिल्याच आठवड्यात ऍडव्हान्स पगार दिला होता. चेतनने आपल्या घरी ऑनलाईन पैसे पाठवले होते. चेतन आता सुरजच्या घरी चांगलाच रुळला होता.


चेतनला सुरजच्या घरी राहण्यात अवघडलेपणा येत नव्हता. सुरज, राजू व विकी अधूनमधून चेतनसोबत गप्पा मारत होते. सुरज कधी चिडलेला असायचा, तर कधी प्रेमळ. सुरज नेमका कसा आहे? याचा अंदाज चेतनला येत नव्हता.


चेतन त्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे, हे बघून सुरजने त्याला बक्षीस दिले होते. सुरज दररोज रात्रीचे जेवण चेतनसोबत डायनिंग टेबलवर करायचा. जेवण करताना दोघांमध्ये बऱ्यापैकी गप्पा होत होत्या.


सुरज काय बिजनेस करतो? हे चेतनला कळत नव्हते. सुरजच्या बिजनेस अकाऊंटवर दररोज कोटींचे व्यवहार होत होते. सुरजला याबाबत विचारण्याची हिंमत चेतनला होत नव्हती.


क्रमशः

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all