Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

विळखा भाग ४

Read Later
विळखा भाग ४

विळखा भाग ४


मागील भागाचा सारांश: सुरज चेतनमध्ये स्वतःला पाहत होता. सुरज चेतन सारखाच नोकरीच्या शोधात गावाहून शहरात आला होता. हॉटेल कल्पतरुच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन चेतनला हॉटेलमध्ये भेटलेल्या माणसाचं नाव विकी होतं. विकी हा सुरज सोबत काम करत होता.


आता बघूया पुढे….


गार्डने चेतनला डायनिंग टेबलवर आणून बसवले. चेतनला सगळंच विचित्र वाटत होतं. सुरजच्या घरी येऊन चेतन वैतागला होता. काही वेळातच सुरज चेतनच्या समोर येऊन बसला.


"चेतन, तू जेवायला सुरुवात केली नाहीस. तुला भूक लागली नाहीये का?" सुरजच्या आवाजात आपुलकी होती.


"साहेब सॉरी भय्या, मला तुम्ही इथे नजरकैदेत का ठेवलं आहे? एकवेळ उपाशी राहिलेलं परवडलं, पण असं इथे पोटभर जेवण करणं मला जमणार नाही. मला दुपारी एक माणूस भेटला, नोकरीच्या आमिषाने त्याने मला इथे बोलावलं. मी इथे आलो, तर सगळेच माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत आहेत. मला काहीच कळत नाहीये." चेतन एका दमात सगळं काही बोलून गेला.


"चेतन, किती बोलशील? तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील." सुरज बोलत असताना राजू फोन सुरजकडे देत म्हणाला,


"विकी भय्याचा फोन आहे." 


सुरजने फोन उचलून कानाला लावला,

"हॅलो विकी, तू कुठे आहेस? फोन उचलत का नव्हता?"


"भय्या, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना? सोनल सोबत असताना माझा मोबाईल स्विच ऑफ असतो." विकीने सांगितले.


सुरज थोडा जोरात म्हणाला,

"विकी, आज दुपारी तू एका मुलाला हॉटेलमध्ये भेटलास, त्याला तू घरी पाठवले. तू आम्हाला काहीच सांगितलं नाही."


सुरजचं बोलणं तोडत विकी म्हणाला,

"भय्या, तो मुलगा आला का? त्याचं नाव चेतन आहे. तो आपल्या कामाचा मुलगा आहे. आपलं अकाऊंट तो सांभाळू शकतो. मी गेल्या आठ दिवसापासून त्याच्यावर नजर ठेवून होतो. चेतनला कामाची गरज आहे आणि आपल्याला त्याची. 


राक्याने त्या दिवशी डोक्याची दही केली नसती, तर आज ह्या पोराला शोधावं लागलं नसतं. राक्याला तुम्ही लईच डोक्यावर चढवून ठेवलं होतं. आता ह्याला ह्याच्या लायकीत ठेवायचं. नाहीतर जिकडे राक्या गेला तिकडे याला पाठवायला मला काही क्षणही लागणार नाहीत."


सुरजने फोन कट केला. सुरज चेतनकडे बघून म्हणाला,

"चेतन, तुझं ग्रॅज्युएशन कशात झालं आहे?" 


"माझं बी कॉम झालेलं आहे. आमच्या गावातील पतपेढीवर अकाऊंटचं काम पाहायचो. पतपेढी बंद पडली आणि माझी नोकरीही गेली." चेतनने सांगितले.


"कम्प्युटरचं नॉलेज आहे का?" सुरजने विचारले.


"मला कम्प्युटर चालवता येतं, पण दुपारी जे मला भेटले होते, त्यांनी मला शिक्षण, अनुभव यासंबंधी काहीच विचारले नव्हते." चेतन म्हणाला.


"तुला दुपारी जो भेटला होता, त्याचं नाव विकी आहे. विकी आमचाच माणूस आहे. तो एका महत्त्वाच्या कामामध्ये अडकल्यामुळे आम्हाला तुझ्याबद्दल सांगू शकला नव्हता. आता त्याचाच फोन होता. त्यालाही सगळेजण विकी भय्या म्हणतात. 


काही दिवसांपूर्वी आमचा अकाऊंट बघणारा राकेश व विकीचे भांडण झाले आणि विकीने राकेशला कामावरुन काढले. आता तुला हे काम करायचं आहे. पुढील एक वर्ष तुला सुट्टी मिळणार नाही. खाऊन पिऊन महिन्याला पन्नास हजार रुपये मिळतील. तुला या बंगल्याच्या बाहेर पडता येणार नाही. तुला जे हवं ते इथेच मिळेल.


तुला तुझ्या घरी पैसे पाठवायचे असतील, तर पाठवू शकतोस. तुला नजरकैदेत कोणीही ठेवणार नाही. तू ह्या घरात सगळीकडे वावरु शकतोस, पण बाकीच्या मकलाशा केलेल्या चालणार नाही. 


मी जेवढा चांगला माणूस आहे, तेवढाच वाईटही आहे. तू अजून माझं खर रुप बघितलं नाहीये. तुला या सगळ्या अटी मंजूर आहेत का?" सुरजने विचारले.


"मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. भय्या इतक्या मोठया पगाराची नोकरी मला कधीच मिळणार नाही. मी तुम्ही सोपवलेलं सगळं काम अतिशय प्रामाणिक व निष्ठेने पार पाडेल. मी इतर कोणत्याच चौकश्या करणार नाही." विकीने सांगितले.


यावर सुरज हसून म्हणाला,

"तुझ्याकडे दुसरा पर्यायही नाहीये. माझ्या राज्यात आलेला माणूस इतक्या सहजासहजी बाहेर पडू शकणार नाही. आता गुपचूप जेवण कर."


सुरज व चेतन शांतपणे जेवण करत होते. तेवढ्यात दोन गार्ड एका माणसाला तिथे घेऊन आले. माणसाच्या गळ्यात कॅमेरा होता आणि पाठीवर एक सॅक अडकवलेली होती.


"हा कोण आहे?" सुरजने मोठ्या आवाजात विचारले.


"भय्या, हा आपल्या बंगल्याच्या बाहेरुन फोटो काढत होता. मी याला दोन दिवसांपूर्वी सुद्धा बाहेर घुटमळताना बघितले होते." एका गार्डने सांगितले.


"याला अतिथी कक्षात घेऊन जा आणि त्याच्या पाहुणचाराची सोय करुन ठेवा. मी जेवण संपवून आलोच." सुरजने आदेश दिला, तसे ते दोन गार्ड त्या माणसाला घेऊन एका खोलीत निघून गेले.


"राजू, हे काय आहे? दोन दिवसांपूर्वी तो माणूस आपल्या घराबाहेर घुटमळत होता, तरी तो आज येण्याची हिंमत कशी करु शकतो? सिक्युरिटीकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये." सुरज जरा जास्तच मोठया आवाजात बोलला होता.


सुरजचा आवाज ऐकून चेतन घाबरला होता. सुरज तसाच जेवणाच्या ताटावरुन उठला. हात धुवून जाणार तोच चेतनकडे बघून तो म्हणाला,

"तू पोटभर जेवण कर. उद्या सकाळ पासून तुला कामाला सुरुवात करायची आहे. राजू तुला तुझं काम समजावून सांगेल."


चेतनने मान हलवून होकार दिला. सुरज व त्याच्या पाठोपाठ राजूही निघून गेला.


चेतनच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले,

"आता हे ह्या माणसासोबत काय करतील? मला ह्या लोकांसोबत काम करण्याची इच्छा नाहीये, पण दुसरा कोणता पर्यायही दिसत नाहीये. अतिथी कक्षात पाहुणचार करणार, म्हणजे नक्की काय करणार?"


चेतनच्या मनात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//