विळखा भाग ३

Suspense Story
विळखा भाग ३

मागील भागाचा सारांश: चेतनने सुरजच्या घरात प्रवेश केला होता. चेतनच्या समोर जो सुरज येऊन उभा राहिला होता, त्या सुरजला बघून चेतन आश्चर्यचकित झाला होता. चेतन ज्या सुरजला हॉटेलमध्ये भेटला होता, तो हा सुरज नव्हता. 

आता बघूया पुढे….

चेतनला एका खोलीत बंद करुन राजू गार्ड सुरजच्या रुममध्ये गेला.

"भय्या, ह्या मुलाला इथं ठेवायला नको होतं. ह्या मुलाला पोलिसांनी पाठवलेलं असेल तर…" 

यावर सुरज म्हणाला,
"राजू, आपण त्याला असं जाऊही देऊ शकत नाही. आपण चेतनला ज्या रुममध्ये बंद केलं आहे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. चेतनच्या हालचालींवरुन तो जर पोलिसांचा माणूस असेल तर लगेच लक्षात येईल. 

चेतनला बघून मला माझे जुने दिवस आठवले. मीही गावातून नोकरीच्या शोधात शहरात आलो होतो. राजू, पोटाची भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते. चेतनच्या हावभावांवरुन तरी मला तो खरं बोलतो आहे, असं वाटतंय.

एकदा हॉटेल कल्पतरुचे सीसीटीव्ही फुटेज येऊदेत, मग तो कोणाला भेटला होता, ते कळेल. आपण चेतनकडे लक्ष केंद्रित करायचो आणि आपले शत्रू वेगळाच प्लॅन आखत असतील. स्वामी महाराजांच्या मते येणारा काळ आपल्यासाठी धोकेदायक आहे. आपल्याला सतर्क रहावं लागणार आहे. 

स्वामी महाराजांच्या आदेशामुळे मी घराबाहेर पडणं टाळत आहे. पोलिस माझ्यापर्यंत एवढ्या सहजासहजी पोहोचू शकणार नाही."

राजू व सुरजचं बोलणं चालू असताना एक गार्ड तिथे येऊन म्हणाला,
"भय्या, या पेनड्राईव्ह मध्ये हॉटेल कल्पतरुचे सीसीटीव्ही फुटेज आहे. मी तेथील वेटरला चेतनचा फोटो दाखवला, तर चेतनने जे काही सांगितलं, ते खरं आहे. चेतनकडे वडापाव खाण्याइतपत सुद्धा पैसे नव्हते."

"तू जाऊ शकतोस आणि चेतनला फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलवर यायला सांग. तू त्याच्या आजूबाजूला थांब, त्याला एकट्याला सोडू नकोस." सुरजने आदेश दिला, तसा तो गार्ड निघून गेला.

"राजू, तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोड." राजूने पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला. सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज त्यात होते. फुटेज पुढे पुढे घेत, ज्या क्षणी चेतन दिसला, तिथे थांबवण्यात आले. चेतन ज्या माणसाला हॉटेलमध्ये भेटला होता, तो माणूस बघून राजू म्हणाला,

"भय्या, हे तर आपले विकी भय्या आहेत."

"हो, पण त्याने त्याचं नाव सुरज असं का सांगितलं? विकीने असा कोणी मुलगा आपल्या घरी येणार असल्याची कल्पना दिली का नाही?" विकीचा मोबाईल नंबर डायल करत सुरज म्हणाला.

विकी फोन उचलत नसल्याने सुरज वैतागून म्हणाला,
"हा विकी कुठे उलथला आहे? आपले दिवसमान एकतर चांगले नाहीयेत, याची कल्पना त्याला आहे, तरी तो असं बेजबाबदार वागत आहे."

"भय्या, लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण तुम्ही विकी भय्यांना जरा जास्तच लाडावून ठेवलं आहे, त्यांना नको ते अधिकार देऊन ठेवले आहेत. विकी भय्या दररोज रात्री त्या सोनलकडे पडलेले असतात. दारुच्या नशेत ते आपलं सगळं सिक्रेट सांगून टाकतील." राजू म्हणाला.

"राजू, विकी माझा उजवा हात आहे. आजरोजी मी एवढं मार्केट केवळ विकीमुळे कॅपचर केलं आहे. विकी नसता तर हा सुरजही नसता. विकी आपलं सिक्रेट कोणालाच सांगणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट विकीला आपली सगळी सिक्रेट्स माहितीच नाहीयेत. विकीला फक्त अर्धसत्य माहीत आहे. सोनलकडे गेल्याशिवाय त्याची बुद्धी चालत नाही. प्रत्येकाच्या गरजा असतात." सुरजने सांगितले.

"भय्या, तुम्हाला इतकं टेन्शन असतं. तुम्ही इतका मोठा व्याप सांभाळतात, पण तुम्ही दारुच्या थेंबाला स्पर्श करत नाहीत. बाई तर लांबचं राहिली, असं का?" राजूने विचारले.

"राजू, आपण कितीही म्हटलं, तरी लहानपणी मनावर झालेले संस्कार आपल्यावर परिणाम करत असतात. माझा बाप दारुड्या होता, त्याच्यामुळे आईला लई त्रास सहन करावा लागला. आमच्या आयुष्याची राखरांगोळी त्या दारुमुळे झाली. मी दारुला स्पर्श करणार नाही, असे आईने माझ्याकडून वचन घेतले होते. 

बाई बद्दल बोलशील तर, मलाही आवड होती. ह्या क्षेत्रातील माझ्या गुरुंनी मला सल्ला दिला होता की, 

"तुला जर राजा बनायचे असेल आणि तुझा धाक तयार करायचा असेल, तर तुझी कमकुवत बाजू शत्रूला समजायला नको. तू एखाद्या आमिषाला भुलत आहे, हे जर शत्रूला कळले, तर ते तुला त्यामार्फत संपवायला मागेपुढे पाहणार नाहीत."

त्या दिवसापासून मी बाईचा नाद सोडून दिला."
सुरजने सांगितले.

राजू पुढे म्हणाला,
"भय्या, मग तुम्ही हे विकी भय्याला समजावून का सांगत नाही?"

सुरज हसून म्हणाला,
"राजू, राजा एकच असतो आणि तो मी आहे. मला विकीला राजा बनू द्यायचं नाहीये. चेतन सोबत जेवण करता करता गप्पा मारुयात."

"भय्या, तुम्ही त्या चेतनला अतिमहत्त्व देत आहात." राजू म्हणाला.

"राजू, चेतनमध्ये मी स्वतःला बघतो आहे. चेतनच्या डोळयात मला खरेपणा दिसतो आहे. मी त्याच्यावर पटकन विश्वास ठेवणार नाही." सुरजने सांगितले.

सुरज पोलिसांपासून सावध का राहतो आहे? तो कोणत्या क्षेत्राचा राजा आहे? हे बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all