विळखा भाग १

Suspense Story

विळखा भाग १


"दादा, वडापाव कितीला आहे?" चेतनने हॉटेल मालकाला विचारले.


"पंधरा रुपये." हॉटेल मालकाने उत्तर दिले.


चेतनने खिसा चाचपला, तर खिशातून दहा रुपयांची नोट निघाली. नोट खिशात ठेऊन चेतन हॉटेल बाहेर पडत होता, तोच त्याला एका माणसाने आवाज दिला,


"ए हिरो, तुला भूक लागली आहे ना, पण खिशात पैसे नाही. इथे येऊन बस. मी तुला खायला देतो." 


एक अनोळखी माणूस आपल्याला आवाज का देतो आहे? आणि तो आपल्याला खायलाही देणार आहे. हा विचार करत करत चेतन त्या माणसासमोर जाऊन बसला.


"साहेब, भूक लागली आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. गेल्या आठ दिवसांपासून हातात फाईल घेऊन नोकरीच्या शोधात वणवण फिरतो आहे. नोकरी मिळाली नाहीच, पण खिशातील पैसेही संपले आहेत. शेवटची दहा रुपयांची नोट राहिली आहे." चेतनने आपली व्यथा मांडली.


"माझं नाव सुरज आहे. मी तुला काम देऊ शकतो. कामाचं बोलण्याआधी तू काहीतरी खाऊन घे. पोट भरलेलं असेल, तर डोकं व्यवस्थित चालतं." सुरजने वेटरला बोलावून पुरीभाजीची ऑर्डर दिली. 


"तू पुरीभाजी खा. अजून काही लागलं तर ऑर्डर करुन घे. मी पंधरा मिनिटात जाऊन येतो." सुरज हे बोलून तेथून निघून गेला.


वेटर पुरीभाजी द्यायला आल्यावर चेतनने त्याला विचारले,

"तू ह्या साहेबांना ओळखतोस का? माझी व त्यांची ओळख नसताना ते मला काम देणार आहेत. गेल्या काही दिवसांत माणुसकी असलेला माणूस पहिल्यांदा बघितला आहे."


"सुरज साहेब आमच्या हॉटेलमध्ये नेहमी येत असतात. आता नेमके ते कोण आहेत? काम काय करतात? याची कल्पना मला नाही. फक्त एवढंच सांगेल की, साहेब खूप मोठे आहेत." वेटर माहिती पुरवून निघून गेला.


पुढील पंधरा मिनिटांनी सुरज हॉटेलमध्ये परत आला. तोपर्यंत चेतनचे खाऊन झाले होते.


"साहेब, तुम्ही वेळेचे खूप पक्के आहात. बरोबर पंधरा मिनिटांनी परत आलात." चेतन म्हणाला.


"मालकाने वेळ पाळली तरचं त्याचे नोकरही वेळ पाळतील. बरं तुझं नाव काय आहे?" सुरजने विचारले.


"माझं नाव चेतन मोरे आहे." चेतनने उत्तर दिले.


"चेतन तुझं शिक्षण काय? तू कुठला? तुझा अनुभव किती? यापैकी मला कसलंही देणंघेणं नाही. मी दिलेलं काम वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडायचं. मी तुला माझ्या घराचा पत्ता देतो. संध्याकाळी आपलं सामान घेऊन माझ्या घरी रहायला यायचं. आज संध्याकाळ पर्यंत घरी आला नाहीस, तर तुझी नोकरी गेली समज." सुरजने चेतनला आपला पत्ता दिला आणि त्यासोबत पाचशे रुपये दिले.


सुरज तेथून निघून गेला. चेतन विचार करत होता की, 'हा असा कसा माणूस असेल. माझ्याबद्दल काहीही माहिती नसताना माझ्या हातात पाचशे रुपये देऊन निघून गेला. समजा मी ह्याच्या घरी गेलोच नाही आणि गावाला निघून गेलो, तर याने दिलेले पैसे त्याला परत मिळणार नाही.'

 चेतन सुरजचा विचार करत करत आपल्या मित्राच्या रुमवर गेला.


"चेतन, नोकरी मिळाली का?" मित्राने विचारल्यावर चेतनने सुरज बद्दल सविस्तरपणे सांगितले.


यावर त्याचा मित्र म्हणाला,

"चेतन, काहीही ओळख नसताना त्याने तुला नोकरी देऊ केली, तसेच खायला घातलं,वरुन पाचशे रुपये देऊन घरी रहायला बोलावलं. अशी कुठल्या प्रकारची नोकरी तो देणार आहे? चेतन जरा विचार करुन ही नोकरी जॉईन कर. मला हा सुरज काही बरोबर माणूस वाटत नाही. उगाच नको त्या फंदात अडकशील." 


"मित्रा, मला तुझी काळजी समजते आहे. खिशात पैसेही नाहीये आणि हातात नोकरीही नाहीये. रिकाम्या हाताने घरी जाऊही शकत नाही. मी सुरज साहेबांकडे जातो. काम पटलं नाही, तर सोडून देईल. मी माझी काळजी घेईल." चेतनने आपली सामानाची बॅग उचलली व त्याने आपल्या मित्राचा निरोप घेतला.


चेतनने एका रिक्षावाल्याला सुरजचा पत्ता दाखवला तर त्या रिक्षावाल्याने आश्चर्याने विचारले,

"तुला सुरज भय्यांच्या घरी जायचे आहे का?"


रिक्षावाल्याच्या तोंडून सुरजचे नाव ऐकून तो चमकलाच.


"हो, मला त्यांच्या घरी जायचं आहे. तुम्ही त्यांना भय्या का म्हणालात? तुम्ही त्यांना ओळखता का?" चेतनला प्रश्न पडला होता.


"अरे बाबा, सुरज भय्याला मीच काय? ह्या एरियातील सगळेच त्यांना भय्या म्हणतात." रिक्षावाल्याने सांगितले.


चेतन पुढे म्हणाला,

"मला त्यांच्या घरी सोडवा ना. वेळेत पोहोचलो नाही, तर मला नोकरी गमवावी लागेल." 


रिक्षा चालू करत रिक्षावाला म्हणाला,

"तू रिक्षात बस. मी तुला त्यांच्या घरी सोडवतो."


रिक्षावाल्याने चेतनला सुरजच्या घराच्या इथे सोडवले. सुरजचं घर बाहेरुन बघूनच हा कोणीतरी मोठा माणूस असल्याचे चेतनला जाणवले. 


"तुमचे किती पैसे झाले?" रिक्षातून खाली उतरल्यावर चेतनने विचारले.


"मला ह्या एरियात रिक्षा चालवू न देण्याचा तुझा विचार आहे का? मी तुझ्याकडून भाडं घेतल्याचे सुरज भय्याला कळले, तर मला ह्या एरियात रिक्षा चालवता येणार नाही." हे बोलून रिक्षावाला निघून गेला.


चेतनच्या मनात प्रश्न उभे राहिले की, 'सुरजचं नाव ऐकून रिक्षावाल्याने पैसे सुद्धा घेतले नाही. सुरज भय्या ही आसामी नेमकी आहे तरी काय? इतका मोठा माणूस माझ्यासारख्या सामान्य मुलाला किंमत का देत आहेत? मला स्वतःच्या घरी रहायला का बोलावलं असेल?'


चेतनच्या मनात जे प्रश्न उभे राहिलेत, ते तुमच्याही मनात उभे राहिलेच असतील ना? तर ह्या सर्वांची उत्तरे पुढील भागात बघूया…..


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all