विळखा भाग १३ (अंतिम)
मागील भागाचा सारांश: सुरजचा विनाश करण्यामागे कोण मास्टरमाइंड होता? याचे उत्तर सोनलने दिले.
आता बघूया पुढे….
सोनलने चेतनच्या हातापायाची दोरी सोडली. चेतन उठून उभा राहिला. नाटक करुन त्यालाही कंटाळा आला होता.
"चेतन, मला तुझ्यावर डाऊट येऊ नये, म्हणून तू माझ्यासारखीच कथा बनवून सांगितलीस. राजू तरी मला तुझ्यावर विश्वास ठेवू नका, म्हणून सांगत होता. मी त्याचं ऐकलं नाही. खरंतर तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं. तुला मी सोडणार नाही. तू अजून सुरजला ओळखलं नाहीये. मला एकदा इथून सुटू देत, मग तुझ्याकडे मी बघतो." सुरज रागात बोलत होता.
चेतन हसून म्हणाला,
"तू आता अश्या अवस्थेत आहेस, ज्या अवस्थेत तू माझं काहीच बिघडवू शकणार नाही. तू सुटणार तरी कसा आहेस? तुला सुटण्यासाठी आम्ही बांधलं आहे का? समजा तू सुटला आणि पुढे जाऊन माझं बिघडवायला तू जिवंत तर राहिला पाहिजे. अरे हो, सोनलने एक गोष्ट तुला सांगितलीच नाही. माझं नाव राघव आहे, चेतन नाही. तुझ्या घरात तुझ्या नाकाखाली राहून मी तुला उध्वस्त केलं. तू ज्याच्यासाठी इथवर आलास, तो तुझ्यासोबत होता."
सुरजचे डोळे रागाने लाल झाले होते. सुरज ज्या खुर्चीवर बसला होता, ती हलवत होता. सुटण्यासाठी तो तरफडत होता.
"राजू कुठे आहे?" विकीने विचारले.
"राजू अर्जुनचा मामा असला, तरी त्याचेही हात अनेकांच्या रक्ताने माखले होते. माझ्या वडिलांवर गोळीही त्यानेच झाडली होती. आम्ही त्याला इतकं सहजासहजी सोडणार नाही. काही वेळात राजू पोलिसांकडे जाऊन त्याच्या व तुमच्या पापांची कबूली देणार आहे. पुढील काही वेळात पोलिस सुरजच्या घराची झडती घ्यायला जातील. राजू हवे ते पुरावे पोलिसांना मिळवून देणार आहे. ह्याच बोलीवर राजूला आम्ही सोडलं आहे. राजूला शिक्षा कायद्याने होईलच." चेतन उर्फ राघवने सांगितले.
"पोलिस आम्हाला पकडतील, तेव्हा तू केलेला गुन्हा त्यांच्यासमोर येईल. आम्हाला शिक्षा तर होणारच नाही, पण तुला आणि तुझ्या साथीदारांना शिक्षा होईल, हा माझा शब्द आहे. कायदा आणि पोलिस आम्ही खिशात घेऊन फिरतो." सुरज मिश्किल हसून म्हणाला.
यावर राघव म्हणाला,
"आम्ही तुला मूर्ख वाटतो का? आम्हाला कायद्याच्या मार्गाने तुला शिक्षा मिळवून द्यायची असती, तर हा सगळा खटाटोप आम्ही केलाच नसता.
आता तुला मी आमचा प्लॅन सांगतो. आपण जमिनीवर नाही आहोत. आपण एका बोटीत आहोत, ही बोट समुद्राच्या एकदम मधोमध आहे. ही बोट तुमच्या मालकीची आहे. आता काही वेळात आम्ही दुसऱ्या बोटीने निघून जाणार आहोत.
आम्ही गेल्यावर बरोबर पाच मिनिटांनी ह्या बोटचा स्फोट होणार आहे. तेलगळतीमुळे हा स्फोट झाला असेल, असे सगळ्यांना वाटेल. राजू आपल्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी पोलिसांकडे गेल्यावर तुमची पापं उघडकीस येतील, म्हणून तुम्ही हा देश सोडून जात होता, पण बोटला आग लागल्यामुळे त्या आगीत तुमचा होरपळून मृत्यू झाला, असे आढळून येईल. मी मास्टरमाइंड आहे ना. तुला माझ्या विळख्यात सापडवण्याआधी बरेच क्रिमिनल मूव्ही, वेबसेरीज बघितले, तेव्हा जाऊन ही सगळी कल्पना सुचली.
सोनल, चल आता आपली आता निघण्याची वेळ झाली आहे. यमदूत सुरज व विकीची वाट बघत असतील. आपल्या विळख्यात अडकून त्यांचा शेवट झाला आहे. आता कोणत्याही सोनलला, राघवला अर्जुनला आणि अजून बऱ्याच जणांना सुरज व विकीमुळे मनस्ताप होणार नाही."
राघव एवढं बोलून आपल्या साथीदारांना घेऊन दुसऱ्या बोटीत निघून गेला. पुढील पाच मिनिटाने सुरज व विकी असलेल्या बोटचा स्फोट झाला.
समाप्त.
©®Dr Supriya Dighe