विळखा भाग १२

Suspense Story

विळखा भाग १२


मागील भागाचा सारांश: सोनल विकीच्या आयुष्यात का आली? हे तिने सांगितले. विकी व सुरजच्या चुकीच्या कामांमुळे सोनलचं आयुष्य कसं उध्वस्त झालं होतं? ह्याची तिने त्यांना आठवण करुन दिली.


आता बघूया पुढे….


सोनलने बोलायला सुरुवात केली,

"तू अगदी बरोबर ओळखलंस, या सगळ्यामागे एक मास्टरमाइंड आहे. तो माझ्यासाठी मात्र देवदूत बनून आला होता. फक्त त्याच्यामुळे मी माझा बदला पूर्ण करु शकले.


माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार लोकांना शिक्षा मिळावी, म्हणून मी दररोज पोलिस स्टेशनला जात होते. तुमच्या पैश्यांवर जगणारे पोलिस मला दाद देत नव्हते.


एके दिवशी संध्याकाळी माझ्या घरात मी बसलेली असताना दरवाजावरील बेल वाजली.


"नमस्कार, मी इन्स्पेक्टर राघव. मला तुमच्या वडिलांच्या केस संदर्भात बोलायचं आहे." 


मी त्यांना घरात घेतलं.


"माझ्या बाबांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? हे मला कळेल का?" मी इन्स्पेक्टर राघवला विचारले.


"तुम्हाला कळून तुम्ही काय करणार आहात? कोर्ट जोवर निकाल देत नाही, तोपर्यंत न्याय मिळण्याची वाट पाहत बसाल. शेवटी पुराव्यांअभावी तो गुन्हेगार निर्दोष सुटेल, तेव्हाही तुम्ही काहीच करु शकणार नाही. हार मानून शांत बसाल." इन्स्पेक्टर राघवने अतिशय शांतपणे सांगितले.


"तुम्ही मला त्यांचं नाव सांगा, मी त्यांचा जीव घ्यायला मागेपुढे पाहणार नाही." मी अतिशय चिडून बोलले होते.


यावर इन्स्पेक्टर राघव म्हणाले,

"हा जो राग तुमच्या चेहऱ्यावर आहे, तोच कृतीतून बाहेर येऊ द्या. एनिवेज मी इन्स्पेक्टर नाहीये. तुम्ही मला घरात येऊ दिलं नसतं, म्हणून मी इन्स्पेक्टर असल्याचं तुम्हाला सांगितलं. 


तुमच्या वडिलांच्या गाडीवर ड्रायव्हर माझे बाबा होते. माझे बाबा जीवाच्या भीतीने तेथून पळाले, पण त्यांनी गाडी आणि त्यात बसलेल्या माणसाचा चेहरा बघितला होता. बाबांनी पळता पळता फोन करुन मला घडलेली कथा सांगितली होती व त्या गाडीचा नंबरही मला दिला. आम्ही बोलत असताना गोळीचा आवाज मला ऐकू आला आणि बाबांचा आवाज येणे बंद झाला.


बाबांनी गाडीचा नंबर सांगितल्याने या सगळ्यामागे नेमकं कोण आहे? ह्याचा शोध मला लागला. आपल्याला मिळून या लोकांना शिक्षा द्यायची आहे. आपल्या दोघांसारखे अनेक निष्पाप लोकं यांचे बळी ठरले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये सेटींग लावून सगळ्या फाईल मी मिळवल्या आहेत. आपली मदत करायला त्यातील सगळेच आहे. माझ्याकडे एक प्लॅन आहे, त्याप्रमाणे काम केलं तर ते नीच लोकं आपल्या विळख्यात बरोबर सापडतील." 


या सगळ्यामागे विकी होता, हे कळलं होतं, पण विकीमागे कोणाचा वरदहस्त होता, ते आम्हाला शोधून काढायचं होतं. आमच्या प्लॅनप्रमाणे मी विकीच्या आयुष्यात गेले. सुंदर मुलगी हा विकीचा विकनेस आहे, हे आम्हाला ठाऊक होतं. विकी दररोज रात्री माझ्याकडे यायचा, त्याच्या बिअरच्या ग्लासात मी गुंगीचं औषध मिसळून त्याला देऊन टाकायचे. 


सकाळी उठल्यावर त्याला वाटायचं की, रात्री नशेत आमच्यामध्ये बरंच काही घडलं असेल म्हणून, पण आजपर्यंत आमच्यात काहीच घडलं नाहीये. नशेत विकीने तुमची अनेक गुपितं मला सांगितली होती. विकीमागे सुरज नावाचा माणूस आहे, हे त्याच्याकडून कळले होते.


सुरज एक समाजसेवक म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे, त्याचा खरा चेहरा कोणालाच ठाऊक नव्हता. विकीने दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरु केला होता. 


विकीच्या मागावर आमचे दोन माणसे कायम असायचीच. राकेश व विकीचे भांडण झाल्यावर विकीने राकेशवर चाकूने वार केले होते. विकीला वाटलं होतं की, त्याने राकेशला मारुन टाकलं. आमच्या माणसांनी राकेशला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने तो वाचला.


राकेश आमच्या टीममध्ये सामील झाला. तुम्ही अकाऊंटचं काम करण्यासाठी माणूस शोधत आहात, हे विकीकडून मला कळलं होतं. विकीच्या अकाऊंटचे डिटेल्स आमच्याकडे होते. सुरजच्या अकाऊंटचे डिटेल्स मिळवायचे असेल, तर त्याच्या घरात घुसणे आवश्यक होते.


चेतन व विकीची भेट हा आमच्या प्लॅनचा भाग होता. चेतन तुझ्या घरात आला, त्याच दिवशी एका माणसाला गार्डने पकडून आणले होते, तो अर्जुन आमचाच होता. 


तिथे एकच गडबड झाली की, राजू गार्ड हा त्याचा सख्खा मामा निघाला. सीसीटीव्हीत राजू त्याच्या रुममध्ये त्याचसाठी गेला होता. आमचं नशीब चांगलं की, राजूला अर्जुनने आमचा प्लॅन सांगितला नाही. अर्जुनच्या बहिणीवर विकीने जबरदस्ती केली होती, तिला मोकळं सोडलं तर विकीसाठी धोकेदायक होतं, म्हणून विकीने त्या मुलीला जीवंत जाळून ठार केले होते. 


अर्जुनला त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. राजू गार्ड तुमच्याकडे राहत असल्याने त्याला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. अर्जुनने त्याला हे सगळं सांगितल्यावर तोही चवताळला होता. आधीच राजूला विकी आवडत नव्हता, त्यात ही भर पडली होती. राजू सुरज विरोधात जायला तयार नव्हता.


अर्जुनने सुरजच्या घरात माईक फिट केले होते. घरातील सगळं बोलणं आम्हाला बाहेर ऐकायला येत होतं, त्याप्रमाणे आम्ही तयारी करत होतो. चेतनला कामाच्या निमित्ताने कम्प्युटरचा ताबा मिळाला होता. कम्प्युटर मधून तुमच्या बेकायदेशीर कामांची माहिती आम्हाला मिळाली होती. 


सुरजचे बँक डिटेल्स आम्हाला मिळाले होते, पण त्याच्या मोबाईलमध्ये अजून काहीतरी महत्त्वाचं मिळेल, अशी आम्हाला आशा होती, पण सुरजच्या मोबाईलला कोणीच हात लावू शकत नव्हतं. आम्ही परिस्थिती अशी निर्माण केली की, सुरजने स्वतःहून त्याचा मोबाईल दोनदा चेतनकडे दिला होता.


आम्हाला जे हवं होतं, ते मिळालं होतं. आम्ही तुमचा असा पैसा गायब केला, ज्याची तक्रार तुम्ही पोलिसांकडे करुच शकले नसते. तुम्ही ज्यांना लुबाडले त्यांना ते पैसे आम्ही देऊन टाकले आहेत." 


हे सगळं ऐकल्यावर सुरजची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all