विळखा भाग ११
मागील भागाचा सारांश: विकीने ज्या मुलीच्या तोंडावर ऍसिड टाकलं होतं, त्याच मुलीने विकीच्या हातावर ऍसिड टाकले होते. त्या मुलीने विकी व सुरजला स्वतःची आठवण करुन दिली.
आता बघूया पुढे….
"विकी, तू या मुलीला ओळखतोस का?" सुरजने विचारले.
"भय्या, ही सोनल आहे." विकीने उत्तर दिले.
"तू जिच्याकडे दिवसरात्र पडलेला असायचा तिचं सोनल का?" सुरजने प्रश्न विचारला.
"हो, ही तिचं सोनल आहे. सोनल तू तर माझ्यावर प्रेम करतेस ना? मग मला या अश्या अवस्थेत बांधून का ठेवलं?" विकीने सोनलकडे बघून विचारले.
सोनल हसत टाळ्या वाजवत म्हणाली,
"प्रेम आणि तुझ्यावर? शक्य तरी आहे का? माझा बदला घेण्यासाठी मी ते नाटक करत होते. तुझ्यासारख्या नीच माणसावर प्रेम करायला मी तुझ्या लेव्हलची वाटले होते का?"
"मी तुझं काय बिघडवलंय? मी तुला आजवर कधीच फसवलं नाही. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, मग तू कसला बदला घेत आहेस? आपल्याला भेटून जवळपास वर्ष होत येईल." विकीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
यावर सोनल म्हणाली,
"तुझी भेट मी मुद्दाम घेतली होती. तुझा विश्वास जिंकून त्याच विश्वासाने तुझा गळा कापायचा होता."
"ते कळलं, पण तू हे सगळं का करत आहेस? हे जरा नीट उलगडून सांगशील का? आम्हाला त्रास देऊन तुला काय मिळणार आहे?" सुरजने सोनलला विचारले.
"तुम्हाला दोघांना तुम्ही केलेली पापं आठवत नाहीत का? तुम्हाला सगळ्याची आठवण करुनच द्यावी लागेल का? अरे हो, मी विसरलेच की, तुम्ही आजवर आयुष्यात फक्त पापंच तर केलेली आहेत. तुम्ही केलेलं चांगलं काम मात्र तुम्हाला आठवू शकेल, कारण ते अगदी बोटावर मोजणारे असेल." सोनल म्हणाली.
"सोनल, माझ्या हाताची आग होत आहे. त्या पोरीने ऍसिड टाकून वाट लावली आहे. तू आता डोकं खराब करु नको. मी तुला हवे तेवढे पैसे देईल. आम्हाला दोघांना सोड." विकी म्हणाला.
यावर सोनल म्हणाली,
"एकतर मी हे सगळं पैश्यांसाठी केलं नाहीये आणि दुसरी गोष्ट तुझे सगळे बँक अकाऊंट खाली झाले आहेत. गैरव्यवहार करुन जी प्रॉपर्टी घेतली आहे, त्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत. काही वेळात ते पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचतील.
मी जास्त वेळ घेत नाही. तुला फक्त एक गोष्ट सांगते, त्यावरुन तुला काहीतरी नक्कीच आठवेल.
माझं लग्न म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्न होतं. बाबांना एकदम थाटामाटात माझं लग्न करायचं होतं. माझी आई मी लहान असतानाच वारली होती. मी आणि बाबा एकमेकांसाठी होतो. बाबांनी माझ्यासाठी आमच्या तोलामोलाचं स्थळ शोधलं होतं. साखरपुडा झाल्यावर पंधरा दिवसांनी लग्न करण्याचे ठरले होते.
लग्नाच्या तीन दिवस आधी बाबा शहरात आले होते. बँकेतून काही पैसे काढायचे होते, तसेच सोनाराकडून ऑर्डर दिलेले तयार दागिने घेऊन जायचे होते. बाबा आणि ड्रायव्हर असे दोघेच होते.
गावाकडे येत असताना सुनसान रस्त्यावर त्यांची गाडी पंक्चर झाली. ड्रायव्हर गाडीचे चाक बदलत असताना एक चारचाकी गाडी तिथे येऊन उभी राहिली. माझ्या बाबांना वाटलं होतं की, मदतीसाठी कोणीतरी थांबलं असेल.
त्या गाडीतून तोंडाला मास्क घातलेले दोन गुंड उतरले, एकाकडे बंदूक होती, तर एकाकडे चाकू होता. ड्रायव्हर जीवाच्या भीतीने पळून गेला. माझे बाबा एकटे त्या गुंडांचा प्रतिकार करु शकले नाही. गुंडांनी पैश्यांची बॅग व सोन्याचे दागिने घेऊन गेले.
माझे बाबा हतबलपणे त्यांच्याकडे बघत होते. बाबा कसेतरी घरापर्यंत आले. बाबांची ती अवस्था बघून मला खूप वाईट वाटलं होतं. माझ्यासमोर हात जोडून बाबा म्हणाले,
"मला माफ कर बेटा. मी तुझं लग्न धुमधडाक्यात करु शकणार नाही. माझ्या आयुष्यभराची पुंजी गुंड घेऊन गेले."
माझ्या बाबांचं ते शेवटचं वाक्य होतं. हार्ट अटॅकने त्यांचा जीव गेला. माझं लग्नही मोडलं. मी त्या दिवशी अनाथ झाले होते. त्याच दिवशी मी ठरवलं की, माझ्या बाबांचा जीव ज्यांच्यामुळे गेला, त्यांना मी सोडणार नाही. माझ्या बाबांनी कष्टाने एकेक पैसा जमवला होता."
"विकी भय्या, तुमचा खरा बिजनेस हा आहे का?" इतक्या वेळ शांत बसलेल्या चेतनने विचारले.
"ते काय सांगतील? गरीब लोकांना लुबाडून ते मोठे झाले आहेत. त्यांच्याकडील एकही पैसा कष्टाचा नाहीये." सोनलने सांगितले.
"तुला आमचा शोध कसा लागला? त्या गाडीत विकी होता, हे तुला कसं कळलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू हे सगळं एकटीने प्लॅन केलं का? आमचा पैसा कोणी गायब केला? हा कोण मास्टरमाइंड आहे?" सुरजने एकामागून एक प्रश्न विचारले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe