विळखा भाग १०

Suspense Story

विळखा भाग १०


मागील भागाचा सारांश: एका खोलीत सुरज,विकी व चेतनला बांधून ठेवण्यात आले होते. चेतन तेथून सुटका व्हावी यासाठी गयावया करत होता. एका मुलीने येऊन सुरज व विकीचा पाणउतारा केला, तसेच विकीच्या हातावर ऍसिड टाकले.


आता बघूया पुढे….


विकी वेदनेने अजूनही विव्हळत होता. सुरज त्या मुलीकडे रागाने बघत होता.


"तुझ्या पापांचा पाढा मलाच वाचावा लागेल. तुला आठवतही नसेल. विकीला आठवलं असेल, पण तो बोलण्याच्या मनस्थितीत नसेल.


मी सायकलवर माझ्या घरुन कॉलेजला दररोज ये-जा करायचे. एके दिवशी माझी सायकल विकीच्या गाडीला धडकली. चूक त्याचीच होती, पण मीच घाबरले होते. एवढ्या मोठ्या गाडीला आपला धक्का लागलाय म्हटल्यावर हा गाडीचा मालक मला ओरडणार, याची भीती मला वाटत होती.


विकी रागात गाडीतून खाली उतरला, पण मला समोर बघून तो काहीच बोलला नाही. आजूबाजूचे लोकं कोणाचा कोणाला धक्का लागला याबद्दल बडबड करत होते, तेव्हा सगळ्यांना थांबवून विकीने त्याची चूक असल्याचे कबूल केले.


माझ्या हाताला जखम झाल्याने त्यातून रक्त येत होते. माझी सायकल एका दुकानाजवळ लावून विकी मला त्याच्या गाडीतून दवाखान्यात घेऊन गेला. मलमपट्टी झाल्यावर विकीने मला घरी सोडले. माझ्या आई वडिलांना भेटून त्यांची माफी मागितली.


दुसऱ्या दिवशी विकीच्या माणसांनी माझी सायकल रिपेअर करुन घरी पोहोच केली. मला व माझ्या आई वडिलांना विकी एक चांगला माणूस वाटला होता.


त्या दिवसानंतर विकी बऱ्याच वेळेस मला रस्त्यात, कॉलेजजवळ भेटला होता. मी त्याच्यासोबत फॉर्मल बोलायचे. विकी काहीतरी कारण काढून आमच्या घरीही येत होता. विकीचा खरा हेतू मला त्यावेळी लक्षात आलाच नव्हता.


व्हॅलेन्टाईन डेला कॉलेजच्या बाहेर सगळ्यांसमोर विकीने मला प्रपोज केलं. विकी माझ्यापेक्षा जवळपास दहा वर्षांने मोठा असेल. मी विकीकडे त्या नजरेने कधीच बघितले नव्हते. मी विकीला सर्वांसमोर नकार दिला. 


विकी माझ्या पाठोपाठ घरी आला होता. विकीने माझ्या आई वडिलांकडे माझा हात मागितला. मी लहान असल्याने आई-बाबांनी नकार दिला.


विकीचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. पुढील चार ते पाच दिवसांनी आमचा अपघात ज्या ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी विकी सुरजसोबत माझी वाट बघत होता. विकीच्या हातात ऍसिडची बाटली होती. त्यांच्यासोबत बंदूकधारी गार्ड असल्याने आजूबाजूचे कोणीच मदतीला धावून येत नव्हते. 


विकीने मला चार शिव्या घालून माझ्या तोंडावर ऍसिड टाकले. मी सुरजसमोर हात जोडून गयावया करत होते, पण त्यानेही मला वाचवलं नाही. विकी आणि सुरज जोपर्यंत तिथे होते, तोपर्यंत कोणीच मला हॉस्पिटलला नेले नव्हते. मी वेदनेने विव्हळत होते.


काही वेळाने मला हॉस्पिटलला नेण्यात आले होते. माझी ती अवस्था, तो त्रास बघून बाबांना हार्ट अटॅक आला व ते हे जग सोडून गेले. मुलीच्या वेदना सहन होत नव्हत्या, म्हणून आईने काही दिवसांनी पाण्यात उडी मारुन जीव दिला.


मी त्या दिवसापासून आरशात स्वतःचा चेहरा बघितला नव्हता. मी शपथ घेतली होती की, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा देणार नाही, तोपर्यंत मी आरशात बघणार नाही.


मुलगी म्हणजे तुमच्यासाठी खेळणं वाटतं का? जबरदस्तीने होकार दयायला लावायचा आणि नाही दिला, तर तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिला नरकात ढकलून दयायचे. 


मी विकीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकू शकले असते, पण मी तसं केलं नाही. अजून विकीला बरेच धक्के बसणार आहेत, त्यानंतर विकीचा चेहरा मला बघायचा आहे." ती मुलगी सगळं काही बोलून मोकळी झाली.


यावर चेतन म्हणाला,

"ताई, तुमच्यासोबत जे झालं, ते वाईटचं झालं. तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली असती, तर त्यांनी विकी भय्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली असती. तुम्ही स्वतःचे हात खराब का करुन घेत आहात?"


ती मुलगी हसून म्हणाली,

"माझ्या चेहऱ्याकडे बघून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असती, पण त्यांनी विकीला शिक्षा केली नसती. पैश्यावाले लोकं हे, पोलिसांना खिशात घेऊन फिरतात.


ह्या दोघांना पापांचा पाढा अजून बाकी आहे. तो ऐकल्यावर तू अजून शॉक होशील. आता विकीला अजून एक धक्का देण्याची वेळ आली आहे."


ती मुलगी दरवाजा जवळ गेली आणि म्हणाली,

"ताई, तू आता ये. आता तुझा टर्न आहे."


दुसरी मुलगी दरवाजातून आत आली, त्या मुलीने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेला नव्हता. ती मुलगी विकीसमोर जाऊन उभी राहिली. विकीला भयंकर वेदना होत होत्या. तो जोरात ओरडला,

"तू!."


ती मुलगी कोण असेल? विकी तुला बघून का ओरडला? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe
🎭 Series Post

View all