विजबाई रुसते तेव्हा ............

Article

वीजबाईच रुसते तेव्हा........

          धो धो पाऊस, हवेतला मंद गारवा, तनामनाला सुखावणारा भोवतीचा हिरवा निसर्ग आणि पावसाळ्यात प्रत्येक सजिवाला उबदार वाटणारी हक्काची जागा म्हणजे स्वतःचे घरटे. खरंतर पावसाळी दिवसातून आपल्याला आपल्या घराची, त्यातल्या सुरक्षित आपल्या माणसांच्या मायेच्या भिंतींची खरी किंमत कळते. अशा मुसळधार पावसात मग रस्त्यावरून चालणारी माणसं आणि धावणारी वाहने पाहिली की अशा मुसळधार पावसातून घराबाहेर पडण्याएवढं अपरिहार्य काम आपल्याला त्या क्षणी नाही आहे, याचा हेवा वाटतो. मग बाहेरचा पाऊस घराच्या खिडकीतून पाहताना हा मोकळा वेळ एंन्जॉय करावासा वाटतो. मग एखादा सिनेमा टीव्ही वरती पाहूया किंवा एखाद्या खमंग पदार्थावरती ताव मारूया असे बेत शिजू लागतात. मात्र या आनंदाचा कडेलोट होतो जेव्हा लक्षात येतं गेल्या दोन तासांपासून लाईट नाही आहे आणि मग अचानक सगळं नीरस वाटू लागतं. रोमँटिक पाऊस आता सैतानी पाऊस वाटायला लागतो. त्याहून पुढची गंमत म्हणजे लाईट नाही तर काय झालं मोबाईल तर आहे ना! कारण हल्ली अन्न पाणी नसलं तरीही आरामात एक दोन तास माणूस बसल्याजागी विना कटकट, लक्ष विचलित न करता थांबू शकतो फक्त एकच हाती मोबाईल हवा. त्यामुळे साधारण घरातले लाईट नसताना आपल्याला हक्काने आपल्या या दोस्ताची आठवण होते. पण तो दोस्तही नेमका याच वेळी आपल्या सोबत टाईमपास करण्यासाठी असमर्थ ठरतो. लाईट नसताना मोबाईल स्क्रीनच्या कोपर्‍यातली ती 'चार्जिंग फुल्ल' असलेली डबी पाहिली की, त्या क्षणी जगातले आपण सुखी असा साक्षात्कार होतो. काय तो अवर्णनीय आनंद असतो त्यावेळी!  पण तोच मोबाईल अखेरच्या घटका मोजायला लागला की आपला जीवही वर-खाली होतो आणि लाईट लवकर यावा, ही प्रार्थना आपण करू लागतो. पण पुढचे दोन-तीन तास तरी ही प्रार्थना ऐकायला देवाला वेळ नसतो. मग आपण पुन्हा कुठेतरी मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो. 

       एव्हाना पावसाचा जोर ओसरतो. आता तरी वीजबाई प्रसन्न होतील, अशी आशा असतानाच शेजारच्या कोणाकडून तरी बातमी येते, आपल्या गल्लीतील झाड पडलं किंवा विजेच्या तारा तुटल्या. मग काय आपल्या मनातली ही आशाही धुळीला मिळतेच शिवाय लाईट नाही आता काय करावं बरं, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा आपलं मन रमवणार्‍या माध्यमांनी कधीच कात टाकलेली असते. मग आपण त्या दिवसाला आणि सोबतच वायरमनलाही लाखोली वाहतो. अशातच कोणीतरी विद्युत वितरण कार्यालयात फोन लावून तक्रार देतात पण ते लोक पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत 'बिझी ' आणि त्यांची मागणी या दिवसांत अधिक असते त्यामुळे त्यांनी आपल्या वाडीला येऊन भेट देणे म्हणजे दुर्लभ गोष्ट! शेवटी वीजबाई घरी परतणार नाहीत, हे समजतं. मग उरतो शेवटचा आधार इन्वर्टर! जर घरी इन्वर्टर असेल तर जीवाला आधार वाटतो पण तोही शेवटी वीजबाईंपुढे नांगी टाकतो मग काय, रात्री घरातला अंधार आणि बाहेरचा अंधार खायला उठतो. रात्री झोपही पटकन येत नाही. घड्याळाची टिकटिक मात्र त्या नीरव शांततेत स्पष्ट ऐकू येते. ज्यांच्याकडे अजूनही वीज पोहोचलेली नाही, अशी कितीतरी वाड्या- वस्त्यांवरची माणसं विजेशिवाय कशी बरं राहात असतील, याचं आश्चर्य पावसाळ्यात आपल्या घरातील वीज गेल्यावर जास्त वाटतं.
     
       दुसऱ्या दिवशीची सकाळ ही फार 'गुड ' नसते. न्हाणी घरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे अंधाराशी सामना सुरू असतो. एव्हाना फ्रिज, मिक्सर, वॉशिंग मशीन या भाऊबंदकीनेही वीजबाईंपुढे मान टाकलेली असते. काडेपेटीच्या काड्याही अशावेळी भाव खाऊन जातात. शेवटी लोकांच्या तक्रारी, नाराजीचे सूर आणि आपली प्रार्थना फळाला येते. वायरमन नावाचा बहुप्रतिक्षित माणूस येऊन त्याचं काम करून जातो आणि वीज बाई घरी प्रकट होते. एवढा विनवण्या करणारी माणसं पाहून ती प्रसन्न होते आणि 'कशी जिरवली ' अशा अविर्भावात ती आपल्याकडे पाहून घरभर खिदळत सुटते. घरात लख्ख प्रकाश पसरतो अन घरातल्या सगळ्या वस्तू पुनर्जिवीत होतात. मग या आनंदात बाहेरचा पाऊसही पुन्हा आपल्याला 'रोमँन्टिक ' आणि हवाहवासा वाटतो.

स्नेहा डोंगरे