विहीरीचे रहस्य (भाग/३)

कथामालिका


भाग ३

सार्थकचे काहीही न ऐकता ते तिघेही निघाले. नाईलाजाने सार्थक त्यांच्या पाठोपाठ गेला. सतत असं वाटायचं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे‌ . ते एक एक पायरी उतरत खाली गेले. बॅटरीच्या अंधुक पडणाऱ्या प्रकाशात ते चालू लागले. एका विहीरीत उतरल्यानंतर दुसऱ्या विहीरीत जाण्यासाठी पायऱ्या होत्या. आजुबाजुला जी जागा होती ती तिथे प्राण्यांचे भयानक मुखवटे लावलेले होते.

एकमेकांना आधार देत ते शेवटच्या विहीरीत उतरले. खूप जुन्या विहीरी असल्यामुळे त्या कोरड्या झालेल्या होत्या. शेवटच्या विहीरीच्या तळावर खूप पालापाचोळा जमला होता. बॅटरीच्या प्रकाशात प्रेम माधव आणि विराज पालापाचोळा बाजूला करून कुठे काही सापडते का ते शोधू लागले. त्यांना विहीरीच्या एका कपारीत असलेली एक लाकडाची पेटी सापडली. घाईघाईने त्यांनी ती उघडली. तर आत एक किल्ली होती.

"अरे, ही कशाची किल्ली आहे?" माधव

"बहुतेक इथे एखादी मोठी संदुक असावी असे वाटते. आपण ती शोधू या."

प्रेम ,माधव आणि विराज सगळीकडे शोधू लागले. त्या किल्लीवरून कुलूप किती मोठे असेल‌ यांची कल्पना येत होती. बराच वेळ शोधाशोध केली. तेव्हा त्यांना विहीरीच्या एका कोपऱ्यात एक साखळी दिसली. साखळी उचलली तर एक पाटी दूर झाली आणि त्या पाटीखाली एक मोठी संदुक सापडली.

विराज ओरडला, "सापडली संदुक!"

विराज ने त्या किल्लीने ते कुलुप उघडण्याचा प्रयत्न केला. प्रेम आणि माधव त्याला मदत करू लागले. पण, सार्थक दूर उभा राहून हे बघत होता.

"अरे ये ना जरा इकडे. फाटू कुठला?"

"तुम्ही मला काहीही म्हणा. मला कशालाच हात लावायचा नाही." सार्थक

"अरे, जाऊ द्या ना त्याला. आपणच बघुया."प्रेम

तिघांनीही ताकदीने कुलुप उघडले . संदुकीचे झाकण उघडताच आतले दृश्य बघून चौघांचे ही डोळे दिपले. त्यात झगमग करणारे सोने पाहून सगळेच एकदम शांत झाले.

"विराज काय आहे हे! बापरे! किती हे सोनं!"प्रेम

"अरे मला वाटलच नव्हतं की , खरोखरच इथे एवढा मोठा खजिना असेल म्हणून."

"विराज मला वाटते ही गोष्ट तुझ्या घरी सांगायला हवी. त्यामुळे आपल्या मार्ग सुचेल काही तरी."सार्थक

"काय वेडबिड लागल की काय तुला? "

"मी कोणालाही काहीही सांगणार नाही आणि तुम्ही सुद्धा." विराज

"मग काय करायचं ठरवलं आहे विराज?" सार्थक

"आपण हे सोनं घेऊन बाहेर पडू या." विराज

"अरे, कशासाठी हा अट्टाहास? अशाप्रकारे सोनं आपण बाहेर नाही नेऊ शकत. एक माझं "सार्थक

"मग काय करायचं ?" विराज

विराज ,माधव आणि प्रेम काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. विराजने घाईघाईने सोने घेण्यासाठी संदुकमध्ये हात टाकताच एक मोठ्या नागाने आपला फणा वर काढला. एवढ्या मोठ्या सापाला बघताच तिघांचीही बोबडी वळली.

कोणी काही बोलायच्या आतच विराजचा जीव घाबरू लागला आणि बेशुद्ध पडला. त्याचे शरीर थंड पडू लागले.

प्रेम , माधव आणि सार्थक प्रंचड घाबरले आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. विराजला असे बेशुद्ध पाहून सगळ्यांना दरदरून घाम फुटला.

"मी तुम्हांला सांगत होतो. की या सोन्याला हात लावू नका म्हणून. आता काय करायचं? विराज उठ ना रे!"

तिघेही विराजला आवाज देऊ लागले.

विराज उठतो की नाही. की काही अघटीत घडते का? पाहुया पुढच्या भागात....

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all