Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

विहीरीचे रहस्य (भाग/२)

Read Later
विहीरीचे रहस्य (भाग/२)


भाग/२

चौघेही ते वास्तू बघून अचंबित झाले.

"बाहेरूनच इतकी सुंदर वास्तू आहे. तर आतून किती सुंदर असेल."विराज

"हो ना, खरोखरच उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे ही वास्तू. पण, याकडे कोणाचेच लक्ष नाही का? एखाद्या जुन्या अडगळीप्रमाणे दुर्लक्षित वाटत आहे."प्रेम

ए, पण मला भिती वाटत आहे. आपण इथे जास्त वेळ थांबणे योग्य नाही."सार्थक

"सार्थक यार तू नेहमी निगेटिव्हच विचार का करतो. अरे, एकदा संपूर्ण वाडा आत जाऊन बघू अणि लगेच परत निघू ठीक आहे."

विराजने त्याला समजावले.

त्याचे भव्यदिव्य प्रवेशद्वार बंद होते. आजुबाजुला दाट गवत वाढलेले होते. आता दार कसे उघडायचे हा विचार सर्व जण करीत होते. तेवढ्यात विराजने एका दगडाने दाराचे कुलूप उघडलेच. अतिशय जाळेजळमटे लागलेले होते. खूप वर्षांपासून ते बंद होते.

"अरे, विराज बॅटरी आणली का तू? " माधव

"हो आणली आहे. तसेही मी बाहेर येतांना माझे सामान माझ्या सोबत असते‌ . तुम्हांला तर माहीतच आहे ना!"

"चला तर मग आतमध्ये!" विराज

चौघेही एक एक पाऊल जपून पुढे जात होते. तसतसे त्यांना संमोहित झाल्या सारखे वाटत होते. थोडासा कोंदट वास सगळीकडे पसरला होता. बॅटरीच्या प्रकाशात ते पुढे चालू लागले. तिथे असणाऱ्या लाकडी खांबावर संपूर्ण कोरीव काम केलेले होते.‌ संपूर्ण माळवदाचे घर होते. काही ठिकाणी पडझड झालेली दिसत होती. आत गेल्यावर एकानंतर एक असे सात दरवाजे होते. प्रत्येक खोली एवढी मोठी की त्यांना आश्चर्यच वाटत होते.‌ स्वयंपाकघर, न्हाणीघर, बैठक व्यवस्था अतिशय नीटनेटके पध्दतीने वाटत होती. एक एक खोली अतिशय विलोभनीय होती.

"बापरे ! या एवढ्या मोठ्या खोल्या?" प्रेम

"अरे, या खोल्या नाही तर दालनेच आहेत." विराज

"माधव, प्रेम, सार्थक हे बघा काय आहे? \"

आतील खोलीत भिंतीवर तैलचित्र लावलेले होते.‌ किती वर्षं जुने होते हे त्या तैलचित्रावरून लक्षात येत होते. ते एका स्त्रीचे चित्र होते. त्या फोटोतील स्त्रीचे कपडे आणि दागिने पाहून अत्यंत जुन्या काळातील स्त्रीचे आहे. असे वाटत होते.

"वा! किती सुंदर आहे हे चित्र!" सार्थक

काही क्षण सगळे त्या चित्राकडे बघत होते. तेवढ्यात त्यांच्या मागून कोणीतरी गेल्याचा भास झाला. मागे वळून पाहिले तर कोणीही नव्हते.‌ एक क्षण तर वाटले की आपला श्वासच थांबला.‌

बरीच रात्री झाली असुनही सगळ्यांची झोप मात्र उडाली होती. संपूर्ण वाड्यात ते फिरत होते. तेवढ्यात विराजला एक मोठी लाकडी संदुक दिसली. विराजने जाळे बाजुला करून संदुक उघडले.

तर आत एक नकाशा सापडला. विराज तो नकाशा पाहू लागला.

"ए मित्रांनो ,बघा यात काय आहे?"

"नकाशा!" प्रेम

"पण, काय असेल यात." सार्थक

"अतिशय जीर्ण झालेल्या या नकाशात काही तरी माहिती आहे. कदाचित या वास्तू मधीलच असू शकते‌. आपण सगळे मिळून शोधु या. अरे, आपल्या अभ्यासाचा काही फायदा तर झाला पाहिजे."

त्यातली भाषा मात्र काही समजत नव्हती. पण, सगळे मिळून चर्चा करून काही तरी निष्पन्न झाले. फक्त त्यात एकात एक सात काहीतरी आहे आणि सगळ्यात खालील तळघर असावे. नकाशात दाखवल्याप्रमाणे त्याच वास्तू मध्ये एक खजिना लपवलेला आहे बहुतेक.

"मला वाटतं त्या विहीर असतील. मी असं खूप आधी ऐकलं आहे.माधव‌

"ए ,चला शोधू या."

"मला वाटतं आपण बाहेर जाऊ या. बराच वेळ झाला आहे. रात्रीचे दोन वाजत आहे. आपण आता कोणतीही रिस्क घ्यायला नको." सार्थक

"काय रे सार्थक ,तू नेहमी उलटा विचार का करतो. आपण इथे कशासाठी आलो आहे. नवीन काही शोध घेतला तर आपले नाव होईल." विराज

"पण , मला वाटतं आता आपण तळघरात नको जायला. उद्या सकाळी परत येऊ ना आपण. मला सारखं वाटतंय की आपल्या भोवती सतत कोणीतरी फिरत आहे. आपण जाऊ या बाहेर." सार्थक फार घाबरला होता.

"पण, प्रेम माधव आणि विराज कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते."

ते चौघेही विहिरीत जातात की नाही ते बघुया पुढच्या भागात.....

©® आश्विनी मिश्रीकोटकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//