विघ्नहर्ता @राधिका.

आभाच्या जीवनाताल चढउतारांची भावस्पर्शी कथा.

#विघ्नहर्ता..1
©®राधिका कुलकर्णी.

"अरे व्वा!!आज समोरचा दरवाजा उघडा! हे बरे झाले बाई.आता मुलांना नविन मित्र मैत्रिण मिळतील आणि मलाही शेजारीण...कदाचित."
मनातल्यामनात विचार करत आभाने सेफटी गेटच्या पिशवीतून  दुधाची पिशवी आणि न्युजपेपर घेतला.

कित्येक दिवसापासुन बंद असलेल्या समोरच्या फ्लॅटमधे आज कोणीतरी रहायला आलेले दिसत होते.

मुंबईच्या मध्यवस्तीतील प्रशस्त ओंकार अपार्टमेंट्सच्या 20 व्या मजल्यावर आभा आणि पार्थचा 3 बीएचके फ्लॅट होता. 
आभा आणि पार्थचा प्रेमविवाह.18 वर्ष उलटली होती लग्नाला.
दोघेही हुशार नौकरी करणारे.
पार्थचा अॅड एजन्सी मधे टुरींग जॉब तर आभा एका नामांकीत टेक्सटाईल कंपनीत अॅज अ क्रीएटिव्ह हेड कार्यरत होती.
दोन गोंडस मुले मोठा अथर्व 17 वर्षाचा तर  धाकटी सई 13 वर्षाची. दृष्ट लागावा असा संसार.
पण सगऴ ठिक असेल तर ते जीवन कसले.?
दोन वर्षापुर्वी छातीत दुखायचे निमित्त झाले आणि सिव्हीअर हार्ट अॅटॅकने पार्थ सगळ्यांना सोडून गेला.
आभा त्या धक्याने खूपच खचली.नातेवाईक आई वडील काही दिवस आधारासाठी राहिले.पण शेवटी कोण किती दिवस पुरते.आपल्या अडचणींना आपणच फेस करायला लागते.मुलांकडे पाहून हळुहळू आभा स्थिरावली, पून्हा उभी राहिली.
गेल्या दोन वर्षात एकही दिवस असा गेला नाही की आभाला पार्थची कमी जाणवली नाही पण बाप्पावरचा विश्वास  आणि स्वत:वरच्या आत्मविश्वासावर आभाने मोठ्या हिंमतीने लवकरच सर्व घराची जवाबदारी समर्थपणे स्विकारली.आणि हळुहळू संसाराची घडी नव्याने बसवली.

आभा तडफदार हुशार तेवढीच सुंदर आणि स्मार्ट.
अतिशय मेहनती जिद्दी आणि प्रचंड चिकाटी.कोणतेही काम हातात घेतले की ते यशस्वी पूर्ण पार पाडल्या खेरीज ती शांत बसयची नाही
तिच्या ह्या गुणांचे तेज नकळत तिच्या चेहऱ्यावर सहज दिसे.
ऑफिसातही तिच्या ह्याच गूण आणि कौशल्यामुळे सगळेच तिचा आदर करत असत.

चाळिसी पार केलेली असुनही तिने आपले सौदर्य आणि शरीर सौष्ठव छान जपले होते.रोज न चुकता जिम आणि योगा ह्यामुळे मन आणि शरीर निरोगी ठेवण्याचा ती काटेकोर प्रयत्न करत असे ज्यामुळे ती वयापेक्षा खूपच लहान दिसायची.
ह्यामुळे तरूणांपासुन वृद्धांपर्यंत तिची सगळ्यांशीच चटकन मैत्री व्हायची.

सगळ्या जवाबदाऱ्या एकटीनेच संभाळताना नाही म्हणले तरी तिची बरीच ओढाताण व्हायची पण तरीही सर्व ताण तणाव हसतमुखाने झेलत तिचा जीवनप्रवास सुरळीत चालला होता.
 लहानपणापासुनच गणपतीवर  तिची प्रचंड श्रद्धा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या घटनांसाठी ती बाप्पालाच श्रेय द्यायची.
वाईट घडते ते आपले प्रारब्ध असते पण त्यातुन मार्ग काढून पुढे जायची वाटही बाप्पाच दाखवतो अशी तिची असीम श्रद्धा होती...

लहानपण तसे गरीबीतच गेले.
नाही म्हणायला घरी एक वडिलोपार्जित गणपती मंदिर वडिलांच्या वाट्यात आले होते.
त्याची पूजा-अर्चना आणि भाविक लोक जे दान दक्षिणा देतील त्यावर घरखर्च कसाबसा भागायचा.
आईवडीलांना आभा एकुलती एकच मुलगी होती.लहानपणापासुनच चुणचुणीत आणि हुशार.
तिच्यावर जणु गणपती बाप्पाचा वरदहस्त होता.
शाळेपासुन कॉलेजपर्यंत कधीही पहिला क्रमांक सुटला नाही.
लहानपणापासुन आईला शिवणकाम करून घराला हातभार लावताना बघुन तिला त्या कामाबद्दल प्रचंड कुतूहल.
थोडेफार कटींग स्टिचिंगही विरंगुळा म्हणुन आईकडुन असेच शिकलेली.
आणि तेव्हाच तिने ठरवले की करीअर करेन तर ह्याच क्षेत्रात.
बारावी नंतर टेक्सटाईल ईंजिनियरींग पुर्ण करून लगेच तिने फॅशन डिझाइंनिंग क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले.
अर्थातच तिच्या मेहनतीला यश आले आणि एका नामांकीत कंपनीत ती जॉबला लागली.
आपली हुशारी,बोलण्या-वागण्यातील कमालीचा कॉन्फिडन्स आणि क्रिएटीव्ह आयडीआज ह्यामुळे लवकरच ती प्रमोशन घेत क्रिएटिव्ह हेड पदाला जावुन पोहोचली. 
ह्या सगळ्यामधे बाप्पाचे आशीर्वादच पाठिशी होते.
म्हणुन कितीही संकटे आली तरी ती यशस्वीच होत गेली असा तिचा गाढा विश्वास होता.
पहिल्या मुलाचा जन्मही दिलेली तारीख पुढे जावुन बरोबर चतुर्थीच्याच दिवशी झाल्याने तिने बाप्पाचा आशीर्वाद समजून त्याचे नाव अथर्व ठेवले.

त्यामुळेच पार्थ गेल्यावर जरी ती खचली तरीही बाप्पाचीच काहीतरी योजना असेल असा विचार करून त्या घटनेला चॅलेंज म्हणुन स्विकारले.
सगळे काही सुरळीत चालले होते.
पण पुढे येणाऱ्या वादळाची तिला कल्पना कुठे होती???
~~~~~~~~~(क्रमश:)~~~~~~~~~~~~~~
काय वाढून ठेवले होते नियतीने आभाच्या पानात?
कशी पार करेल आभा येणाऱ्या वादळाला?
काय आहे हे वादळं?
ह्या सगळ्यात तिला बाप्पा मदत करेल का???
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.....!!!
प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.....
©® राधिका कुलकर्णी.
( #विघ्नहर्ता....1 )

🎭 Series Post

View all