विद्यार्थ्यांकडून कौतुक

लेख


विषय - माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

शीर्षक - कौतुक

शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिलो.मात्र भूतकाळाच्या घटना व कथा कधीही विसरू शकत नाही.शिक्षकी पेशा मनापासून व आनंदाने स्विकारला.
पिढ्या अनेक घडवल्याने मानसिक समाधान मिळते.
सोपी व सुलभ गणित अध्यापनाची पद्धती अवलंबतो.विद्यार्थी रममाण होतात व त्यांची अध्ययनाची गोडी वाढते.
तीन वर्षांपूर्वी अचानक शाळेत लाल दिव्याची गाडी व सोबत पोलिसांचा ताफा अचानक माझ्या शाळेत आला. अचानक आलेल्या गाड्या पाहून वातावरण सुन्न झाले.
सुटबुटातील अधिकारी व सुरक्षारक्षक ऑफिसकडे गेले व त्यांनी माझ्या विषयी चौकशी केली व मला बोलविण्यास सांगितले. शाळेचा चपराशी धावतधावतच माझ्याकडे आला व त्वरित ऑफिसमध्ये बोलावले असा निरोप त्याने धापा टाकत दिल्यामुळे मीही थोडा घाबरलो होतो.
वर्गातील मुलांना गणिताची उदाहरणे सोडवायला सांगून मी लगेच ऑफिसकडे जायला निघालो.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सुटबुटातील अधिकारी माझ्या पायावर नतमस्तक झाला.मी ही अवाक झालो होतो.त्यानेच परिचय करून दिला व सर तुमच्या अध्यापनामुळे व वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे व मदतीमुळेच आज मी वर्ग -१ चा अधिकारी म्हणून नियुक्त झालों आहे व यांचे सर्व श्रेय तुम्हाला जाते हे ऐकून माझी छाती अभिमानाने भरून आली व केलेल्या निस्वार्थी कार्याची जणू मला पावतीचं मिळाली.
माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.
कौतुकाचा वर्षाव मात्र जबाबदारी वाढवतात.विद्यार्थ्यानी मनोभावे केलेले कौतुक अविरतपणे कार्य करण्याची प्रेरणा देतात.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व सर्वांगिण विकासासाठी नवनवीन प्रयोग करण्याची उर्जा मिळते व चैतन्य निर्माण होते.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर,औरंगाबाद