विधिलिखित

What exactly destiny isso read in this blog

विधिलिखित:-

विधिलिखित म्हणतात ते नक्की काय?
खरंच अस असतं का?
मनुष्यजन्म हा खूप योनीनमधून गेल्यानंतर खूप कष्ट सोसल्यानंतर मिळतो असे म्हणतात पण मग मनुष्याच्या आयुष्यात फक्त सुख असते का?

जे त्याला नको असते ज्याला तो सगळ्यात जास्ती भितो त्यापासुन लांब पळतो पण तरीही त्याचा पिच्छा सोडत नाही ते म्हणजे दुःख!
मग जर आधी वेगवेगळ्या योनीनमधून हा आत्मा ज्याला 'अमर' आहे असं म्हणतात तो प्रवास करत आपलं कार्य करत जेव्हा मनुष्य योनीत प्रवेश करतो तो खरच त्या प्रवासाचं सार्थक म्हणून की त्याची शिक्षा म्हणून?

मनुष्य जन्माला येतो तेव्हा सगळं लिहून येतो पण त्या जन्मातील घटना घडण्याच्या काही वेळा, काही स्तर ठरले असतात जे त्याला ठाऊक नसते पण ते घडतं हे नक्की!
 त्यालाच तर विधिलिखीत म्हणतात.

कोणाचा उत्कर्ष कोण्या ठराविक वयात-ठराविक काळात- ठराविक क्षेत्रात असेल तर तो तेव्हा घडतो त्याची चिन्ह दिसायला लागतात आणि तो समाधानी होतो किंवा आशावादी तर नक्की होतो.

नैराश्य हा एक अंगीभूत मन स्थिती आहे तिला कसे बाहेर काढायचे हे मात्र एक कौशल्य जे सगळ्यांनाच जमते असे नाही पण जमवता आले पाहिजे हे मात्र नक्की.

आयुष्य हे खरं तर एक गिफ्ट नसून फक्त एक लढाई आहे असेच म्हणले तर जास्त योग्य ठरेल!

लढत राहायचं जिंकण्याची नाही पण निदान पुढे जाण्याची आशा बाळगत सगळं सहन करत जायचं आणि काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवायची...

ह्या लढाईत खूप नवे भेटतात-ते जुने होतात-कोणी सुटतात तर कोणी कायम आपले अढळ स्थान निर्माण करून  सोबत राहतात, स्थायी किंवा अस्थायी.

 मुळात विधी म्हणजे भविष्य आणि ते जन्माला येताना  प्रत्येक जण लिहून घेऊन येतो, पण अंतिम सत्य मृत्यू हे अटळ आहे जे कोणालाही कधीच चुकत नाही...

कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घ आयुषी फरक इतकाच!
काही मिळण्याची ईच्छ-काही मिळवण्याची धडपड आणि मिळाले की टिकवण्याचा अट्टाहास ह्यातच वर्षा मागून वर्षे निघून जातात आणि सरतेशेवटी आपण म्हणतो हे तर विधिलिखित होते कोण काय करणार?

मग हा प्रश्न म्हणजे काढलेली पळवाट की सुसह्य वाटून घेण्याची ईच्छा?

अंत हा तर नक्कीच आहे तो स्तिथीचा, मनुष्याचा आणि सोबत सतत सुरू असणाऱ्या धडपडीचा...

पण तरीही सतत सुरू असतो तो एक अट्टहास की मला हे हवे ते हवे त्यासाठी हेवेदावे आणि संघर्ष!
त्यापेक्षा प्रयत्नात विश्वास ठेवला तर योग्य नाही का?

मला मिळणार पण ते मिळवण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आणि ते करण्यासाठी मन स्थिर आणि खंबीर हे लागणारच. 
म्हणून स्वतःवर विश्वास, काही करण्याची जिद्द आणि त्याला जोड प्रयत्नांची आणि हे सगळं जे घडवते ते म्हणजे विधी...
आणि हे लिखित असले तरी अस्तित्वात आणण्याची जवाबदारी ही आपलीच असते.... नाही का!

©®अमित मेढेकर