विधिलिखित- एक अनोखे नाते ( भाग ५ वा)
©® आर्या पाटील
शेवटचा एक पेपर बाकी राहिला होता.आदल्या दिवशी संध्याकाळी टेरेसवर ज्या जागी विक्रांत आपला एकांत घालवायचा त्या जागेवर मेघाची काहीतरी तयारी सुरु होती. कानोसा घेत आसावरी ताई वर आल्या.
" मेघा, अभ्यास सोडून हे काय करतेस ? विक्रांत आला तर चांगलाच ओरडेल." तिला व्यस्त पाहून त्या म्हणाल्या.
" आई आधी हळू बोला. मी इथे हे सगळं करते हे विक्रांतना समजायला नको. त्यांच्यासाठी सरप्राइज आहे." ती लाजत म्हणाली.
" माझी लेक गं ती. मस्तच गं. मला मेलीला नाही सुचलं तुमच्या बाबांसाठी असं काही करायला. त्यांनी करावं असं वाटायचं पण तुझ्यासारखा मी पुढाकार नाही घेतला. चांगलं आहे. प्रेमाच्या संकल्पना बदलत आहेत." त्या तिच्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाल्या.
तिने नजरेनेच त्यांचे आभार मानले.
" अगं पण उद्या तुझा पेपर ना ?" त्या काळजीने म्हणाल्या.
" पेपर संपल्यावर सरप्राइज देणार आहे आई." ती उत्तरली.
" मग एवढ्या वेळात तो वर आला तर ?" त्या प्रश्नार्थक स्वरात म्हणाल्या.
" तेच तर नाही होऊ द्यायचं. विक्रांतला यातलं काहीच कळता कामा नये." म्हणत तिने सजावट पूर्ण केली.
" तु नको काळजी करूस. टेरेसवर येणारा दरवाजाच लॉक करून टाकू." म्हणत त्या लागलिच खाली उतरल्या. लॉक आणि चावी घेऊन तश्याच वर आल्या.
मेघाही आता बिनधास्त झाली.
" सांभाळ तुझं सरप्राइज." लॉक करून चावी मेघाच्या हातात देत त्या म्हणाल्या.
गोड हसत तिने त्यांना आलिंगन दिले.
कधी एकदा पेपर संपतो आणि आपण आपल्या मनातलं विक्रांतला सांगतो असे काहीसे झाले होते तिला. घटस्फोट तर बाजूलाच पण आता क्षणभरही तिला त्याच्यापासून लांब राहणे अशक्य होते.
' ते आपल्या प्रेमाचा स्विकार करतील ना ?' मनात शंका होतीच पण या शंकेचं दार तिने ' मी त्यांना ते स्विकारायलाच लावेन.' या कुलूपाने कायमचे बंद केले.
सकाळ झाली. आन्हिके आवरून तिने कॉलेजला जायची तयारी केली. परीक्षा सुरु असल्याने स्वयंपाकघरात तिला सक्तीची बंदी होती. आईबाबांचा आशीर्वाद घेऊन विक्रांतसोबत ती कॉलेजला निघून गेली.
" पेपर संपल्यावर थांब मी येईन घ्यायला." विक्रांत हक्काने म्हणाला.
" जो हुकूम मेरे आका." ती बालिशपणे म्हणाली. विक्रांतही गोड हसला.
" हो माहित आहे हसतांना मी छान दिसतो."ती काही बोलणार तोच त्याने ऐकवले.
बोटांचा मोर नाचवत ती हसली.
तिला सोडून तो त्याच्या कॉलेजला निघून गेला.
मेघाला घ्यायला जायचं म्हणून त्याने हाफ डे घेतला होता.
दोन तासांचा पेपर संपला आणि मेघाने सुटकेचा नि:श्वास सोडला. विक्रांत बाहेर वाट बघत असेल असा अंदाज बांधत मैत्रिणींना भेटून ती लगेच बाहेर पडली.
गाडीला टेकून उभा राहिलेला विक्रांत फोनवर बोलत होता. लगेच जाऊन त्याला मिठी मारावी आणि मनातलं सांगावं असं काहीसं झालं होतं तिला. संयम बाळगत तिने स्वतःला सावरले.
" मी पोहचतो लगेच. तु तिथेच थांब." तो काळजीने म्हणाला.त्याचा त्रस्त चेहरा तिच्या नजरेतून सुटला नाही.
" विक्रांत, सगळं ठिक आहे ना ?" ती त्याला सावरत म्हणाली.
" आपल्याला लगेच निघावं लागेल. गाडीत बस." तो गंभीरपणे म्हणाला आणि गाडीत बसला.
तिनेही फ्रण्टसीटचा दरवाजा उघडला आणि आत बसली.
विक्रांत खूपच टेन्शनमध्ये होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे टाळले. जवळ जवळ अर्ध्या तासाच्या प्रवासाने ते एका निर्जन स्थळी येऊन पोहचले. गाडी बाजूला लावून त्याने तिला उतरण्याचा इशारा केला. त्याच्यामागून ती ही बाहेर आली. त्याने आजूबाजूला पाहिले. काही अंतरावर एका छोट्या तळ्याकाठी बाकड्यावर ती बसली होती. तो तसाच तिच्या दिशेने धावला. मेघाही त्याच्या मागे निघाली.
तो येण्याचा कानोसा घेत बाकड्यावर बसलेली ती उठून उभी राहिली. तो तिच्याजवळ पोहचताच तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. तेवढ्यात मेघाही तिथे येऊन पोहचली.समोरचं दृश्य पाहून मात्र तिच्या पायाखालची जमिन सरकली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची मोठी बहिण अनघा होती. तिने तात्काळ नजर दुसऱ्या बाजूला फिरवली. विक्रांतच्या सोबत तिला पाहून मनाला अनामिक वेदना होऊ लागल्या.
" अनघा, तु आधी शांत हो." म्हणत विक्रांतने तात्काळ तिला स्वतःपासून दूर केले. तिला खाली बसवून तो मेघाकडे वळला.
" मघाशी मला अनघानेच कॉल केला होता. ती जीव द्यायला निघाली होती म्हणून तडकाफडकी इथे यावे लागले." त्याने आपली बाजू मांडली.
त्याला समजून घेत मेघाने मान डोलवली.
" अनघा, आता सांगशील काय झालं आहे ते ?" तो तिच्याकडे न पाहता म्हणाला.
" मला फसवलं त्याने. जोपर्यंत जवळ आईचे दागिने विकून आलेला पैसा होता तोपर्यंत त्याने प्रेमाचे नाटक केले. लिव्ह इन मध्ये राहून लग्न नाकारले. पैसा संपला आणि..." बोलता बोलता ती पुन्हा रडू लागली.
" आता कळली असेल एखाद्या निष्पाप व्यक्तीला फसवण्याची किंमत ? खरं प्रेम जवळ होतं पण ते तुला कळलं नाही. कोणाचाही विचार न करता निघून गेलीस त्यामुळे देवाने शिक्षा दिली तुला." मेघाने तिला खडे बोल सुनावले.
" खरं आहे तुझं. मला शिक्षाच मिळाली आहे या सगळ्याची. खरं तर मला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही." म्हणत ती उठली आणि तळ्याच्या दिशेने सरसावली.
तात्काळ विक्रांतने तिला पकडले.
" मरु दे मला. नाहीतरी जिवंत राहून मरण यातनाच सोसाव्या लागणार आहेत." ती त्याचा हात सोडवू लागली.
" अनघा... अनघा सावर स्वतःला." तो रागात म्हणाला. तशी ती शांत झाली आणि पुन्हा त्याला बिलगली.
" तुझ्या प्रेमाला नाही समजू शकले मी विक्रांत. आय ॲम सॉरी." ती त्याला बिलगून रडू लागली.
तिला पुन्हा त्याच्याजवळ पाहून मेघा आणखी गहिवरली. तशीच तडक गाडीच्या दिशेने निघून जात त्यांना एकांत दिला. डोळ्यांतील पाणी थांबत नव्हते. परत एकदा तिची सख्खी बहिण वादळ घेऊन तिच्या आयुष्यात आली होती. स्वप्नांच्या दुनियेला जुन्या वास्तवाचा सुरुंग लागला होता.
ती अशी निघून जाताच विक्रांतने अनघाला स्वतःपासून लांब केले.
" आई बाबा मला घरात घेणार नाहीत आणि तुझ्याकडे.." बोलता बोलता ती शांत झाली.
त्यालाही काय बोलावे कळत नव्हते.
" कोणीच तर मला स्विकारणार नाहीत मग मी जगू कोणासाठी ?" ती म्हणाली.
शेवटी जुनं प्रेम होतं त्यांच ते.मनापासून जगला होता तो तिच्यासोबत. हळवा तो क्षणात विरघळला.
" आमच्यासोबत चल. उद्या आम्ही घेऊन जाऊ तुला आई बाबांकडे." तो उत्तरला.
" पण मेघाला चालेल का ? नको त्यापेक्षा मी मेलेली.." ती पुढचं काही बोलणार तोच त्याने नजरेनेच तिला शांत केले.
" तु चल." तिला न स्पर्शता त्याने निघण्याची खुण केली.
ती ही काहीही न बोलता त्याच्या मागून निघाली.
त्या दोघांना एकत्र येतांना पाहून मेघाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडून तिला आत बसवताच मेघा रागातच गाडीच्या बाहेर पडली. विक्रांत मेघाजवळ येऊन पोहचला.
" अनघा, आपल्यासोबत घरी येत आहे. आताच जर तिला तुझ्या माहेरी घेऊन गेलो तर बाबा कसे रियॅक्ट करतील सांगता येत नाही. त्यांना पुन्हा काहीही होता कामा नये. आईंना फोन करून कल्पना देऊ आणि उद्या अनघाला घेऊन घरी जाऊ." त्याने आपला मनसुबा बोलून दाखवला.
" आईबाबा तिला माफ करतील ?" ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.
" त्यांना करावं लागेल. सगळच तर उद्धवस्त झालय तिचं. तिला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना हे करावं लागेल नाहीतर आत्महत्या करून घेईल ती." तो गंभीर होत म्हणाला.
" आपलं आयुष्य उद्धवस्त करणारी तिच होती. आईबाबा जिवंत आहेत की मेलेत, माझं काय झालं असेल याची जराही पर्वा नव्हती केली तिने आणि तुम्ही माफ करण्याचं बोलता. तुम्ही करू शकाल का तिला माफ ?" हा प्रश्न तिच्यासाठीही तेवढाच भावनिक होता.
विक्रांत काहीही न बोलता तसाच शांत उभा राहिला.
" बोलणं सोपं असतं पण स्विकारणं कठिण." ती बोलून गेली.
" पोटच्या लेकीसाठी त्यांना हे कठिण काम करावं लागेल. प्रेमापोटी, मायेपोटी तिला माफ करावं लागेल." एवढच बोलून तो गाडीत बसला.
त्याच्या वाक्याचा नको तो अर्थ लावून ती तशीच अश्रू ढाळीत तिथेच थांबली.त्याने वाजवलेल्या हॉर्नला तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तो पुन्हा गाडीतून उतरला आणि तिच्याजवळ आला.
" मेघा, गाडीत बस." तो तिचा हात पकडत म्हणाला.
"तुम्ही जा तिला घेऊन मी येते नंतर." ती डोळे टिपत म्हणाली.
" मेघा, प्लिज चल." तो विनंती करीत म्हणाला.
" मला तुमच्यासोबत कुठेच यायचं नाही." ती थोडी रागातच म्हणाली.
" मेघा, मी त्रासलो आहे आता प्लिज माझ्या सहनशक्तीच अंत पाहू नकोस. आत बस." तो हात जोडत म्हणाला.
त्याला असे हात जोडतांना पाहून ती गहिवरली. काहीही न बोलता त्याच्या बाजूला गाडीत जाऊन बसली.
डोक्याला हात लावत त्याने दिर्घश्वास घेतला आणि गाडी घराच्या दिशेने वळवली.
प्रेमाच्या नव्या नांदीला भूतकाळ परत फिरून ग्रासला होता. त्यांच्या सुखी जीवनाला अनघाचं ग्रहण लागलं होतं.
क्रमश:
©® आर्या पाटील