Login

विधिलिखित- एक अनोखे नाते (भाग १ ला)

विक्रांत आणि मेघाच्या नात्याचं अनोखं विधिलिखित

विधिलिखित- एक अनोखे नाते ( भाग १ ला)

©® आर्या पाटील

मोहित्यांच्या वाड्यात जवळजवळ आठवडाभरापासून लग्नाची लगबग सुरु होती.विश्वासराव मोहिते यांच्या थोरल्या लेकीचं अनघाचं लग्न होतं.अगदी गर्भश्रीमंत नसले तरी स्वबळावर विश्वासरावांनी दोन लेकींच भविष्य घडवता येईल एवढं कमावलं होतं. संस्कारांच्या बाबतीत ते नेहमीच आग्रही होते. विश्वासराव कडक शिस्तीचे याउलट त्यांच्या पत्नी शैलाताई खूपच मृदू स्वभावाच्या. कठोरपणाच्या पडद्याआड विश्वासरावांमध्ये प्रेमळ बापही दडला होता.दोन्ही मुलींच्या भविष्याला आकार द्यायला त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. मोठ्या अनघाचे एम.एस्सी पूर्ण झाले होते तर धाकटी मेघा इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. जवळ जवळ सहा महिन्यांपूर्वी अनघाचे लग्न विक्रांत सोबत ठरले. एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेला विक्रांत उत्तम माणूस होता.शुभ्र वर्ण, पाणीदार डोळे, चाफेकळी नाक आणि कमनीय बांधा असलेल्य अनघाच्या प्रेमात विक्रांत पाहताक्षणीच पडला. जरी सगळ्यांसाठी ते अरेन्ज मॅरेज असले तरी विक्रांतसाठी प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती होती. या सहा महिन्यांत प्रेमाच्या जाणिवेत तो आकंठ बुडाला.लांब राहूनही त्याचे दिवस आणि रात्र तिच्याशिवाय अपूर्ण होते.ती सोबत असली की तोच सणवार वाटायचा. तिच्या आवडी निवडी जपणे जणू त्याचा छंद बनला होता. तिच्यात रमणे हा त्याच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला होता. तिच्यासाठी त्याने घराचे रुपच बदलवून टाकले होते. तिच्या आवडींना प्राधान्य देत त्याने घराचे कायापालट केले होते.

" अनघा, अजून घरी आलीस पण नाही आणि माझ्या लेकाला आईपासून तोडलस गं ." विक्रांतच्या आई अनघाला चिडवायच्या.

तसा विक्रांत चांगलाच लाजायचा.

" पाहिलस. कसा लाजतोय ते ? तु घरी आल्यावर माझ्या लेकाचं काय होईल तो परमेश्वरच जाणो." त्यांनी असे म्हणताच अनघा हसायची.

" तुम्ही दोघी मिळून असेच छळा मला. सासू आणि सुनेचा मिळून मुलाला जाच. बरोबर ना बाबा ?" तो लांबूनच बाबांना मदतीला घ्यायचा.

" नो कमेंट्स. बायकोचा शब्द शेवटचा." म्हणत बाबा उगाचच आईला भिऊन दाखवायचे.

" अनघा, बाळा लवकर घरी ये म्हणजे मला बायकोला घाबरणारा जोडीदार मिळेल." बाबांनी म्हणताच हा हशा पिकायचा.

थोडक्यात अनघाच्या रुपात गोड स्वप्नाची पूर्ती व्हावी या गोड आशेत दोन्हीही कुटुंबीय होती.

" ताईच्या लग्नात मला डिझायनर ड्रेस हवा आहे." इकडे मेघा आपले स्वप्नांचे इमले बांधायची.

" आहो, मी काय म्हणते अनघा सोबत मेघाचा बारही उडवून देऊया म्हणजे आपण मोकळे." विश्वासरावांना डोळ्यांनी खुणावून अनघाची आई शैलाताई म्हणायच्या.

" मी नाही एवढ्यात लग्न करणार." म्हणत मेघा चिडायची. विश्वासराव तिथेच आहेत याची जाणिव होताच शांत व्हायची.

" माझ्या मेघाला खूप शिकू दे. तिच्या पायावर उभी राहू दे त्याच्याशिवाय तिच्या लग्नाचा विषय काढायचा नाही." विश्वासराव हुकूम देऊन मोकळे व्हायचे.

" बाबा, आय लव्ह यु." म्हणत मग ती ही त्यांच्या गळ्यात पडायची.

दोन्ही घरांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते.विक्रांतचा प्रेमविरहही आता संपण्याच्या मार्गावर होता. त्याच्या मनावर राज्य करणारी अनघा आता काही तासांनी कायमची त्याच्या आयुष्यात येणार होती. शहरात राहणारे ते थोड्याच वेळात वरात घेऊन मोहित्यांच्या वाड्याकडे निघणार होते.

इकडे वाड्यातही जो तो आपल्या तयारीत मग्न होता. नुकतीच पार्लरवाली अनघाला तयार करण्यासाठी तिच्या रुममध्ये पोहचली होती.

" अनघा, तयारी तुझ्या आवडीने कर पण दागिने हेच घाल. तुझ्या आजीने दिले होते माझ्या लग्नात." आपल्या हातातील दागिन्यांचा डब्बा तिच्याकडे देत त्या म्हणाल्या.

तो डब्बा हातात घेत तिने मानेनेच होकार दिला. तोच शैलाताईंची नजर पार्लरवालीवर गेली.

" बेटा, तुम्हे कुछ चाहिए ?" बुरखा घातलेल्या त्या पार्लरवालीला अनघाची आई म्हणाली.

" आई, तु आवर बाकीचं. त्यांना काही नको. माझ्या खोलीत आता कोणालाही पाठवू नकोस. उगा डिस्टर्ब नको." म्हणत अनघाने दरवाजा लावला.

शैलाताई आल्या पावली निघून गेल्या आणि आपल्या तयारीला लागल्या.

तासाभराचा अवधी उलटला असेल तोच विश्वासरावांनी वर्दी दिली.

" शैला, मुलाकडचे निघाले आहेत. अनघा तयार झाली का ? मेघा कुठे आहे ?" ते म्हणाले.

" अनघाची तयारी झाली असेल मी जाऊन बघते. मेघाही येईल एवढ्यात. जवळच्या पार्लरवालीकडे गेली आहे." म्हणत शैलाताई अनघाच्या रुमकडे निघून गेल्या.

" अनघा, झाली का तयारी बेटा ? विक्रांत निघाला आहे. पोहचेल थोड्या वेळात. फोटोग्राफरही तुझी वाट पाहतोय. तयारी झाली असेल तर बाहेर ये." त्या दरवाज्यावर वाजवत म्हणाल्या.

दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली पाहून शैला ताईंना आश्चर्य वाटले. दरवाजा उघडून त्या आत शिरल्या. आतलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली.रुममध्ये कोणीच नव्हते. ना अनघा ना ती पार्लरवाली.

त्या तश्याच बाहेर पडल्या.

" अनघा, कोणी अनघाला पाहिलं आहे का ?" त्या साद घालू लागल्या.

त्यांना असं पाहून लागलिच पाहुण्यांची गर्दी त्याच्यांभोवती गोळा झाली. दहा जणींचे दहा अंदाज ऐकून शैलाताई चांगल्याच घाबरल्या.त्यांनी अनघाला फोन लावला पण तोही स्विच ऑफ आला.

बाहेर लग्नमंडपात विश्वासरावांच्या कानावर ही धावपळ पडली आणि ते लागलिच घरात शिरले. शैला ताई पार रडकुंडीला आल्या होत्या.

" शैला, काय झालं?" त्यांना सावरत ते म्हणाले.

रडत रडत शैला ताईंनी त्यांना सारी हकिगत सांगितली.

काहीतरी आठवून त्या पुन्हा तिच्या रुममध्ये शिरल्या.

सगळी रूम शोधली पण त्यांना दागिन्यांचा डब्बा सापडला नाही. कोपऱ्यात भरून ठेवलेली अनघाची बॅगही तिथे नव्हती.

" आहो, आपली अनघा.." बोलता बोलताच त्या खाली कोसळल्या. विश्वासराव पुरते हलले. अनघा अशी काही वागेल यावर त्यांना जराही विश्वास बसत नव्हता. ते तसेच धावत वाड्याच्या गेटपाशी पोहचले.

" अनघाला पाहिलस का तु कुणासोबत जातांना ?" त्यांनी चौकीदाराला विचारले.

त्याने नकारार्थी मान हलवली.

" पण साहेब ती बुरखावाली आली तेव्हा एकटी होती परत जातांना मात्र दोघी जणी दिसल्या." त्याने आठवून सांगितले.

ते तसेच आत आले. झाला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला होता.नवरा कधीही तेथे पोहचू शकत होता. लोकांची कुजबुज सुरु झाली.

" लेकींना जास्त सुट दिली तर असच होणार. आता कसं तोंड दाखवणार मुलाकडच्यांना ?" लोकं कुजबुजत होती.

तोच वरातही गेटपाशी येऊन पोहचली. स्वागतासाठी कोणी नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जेव्हा अनघा पळून गेल्याचे कळले तेव्हा मात्र त्यांच्याही पायाखालची जमिन सरकली. विक्रांतला बाजूला घेऊन त्याच्या बाबांनी सारी हकिगत सांगितली.त्याचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही. तो तसाच वाड्यात शिरला.

" अनघा.. अनघा.." ओरडत त्याने पूर्ण वाडा पिंजून काढला पण त्याला ती सापडली नाही.

एका कोपऱ्यात रडत बसलेल्या शैलाताईंना पाहून तो त्यांच्याकडे वळला.

" आई, आपली अनघा असं काही करणार नाही. मी फोन करतो तिला." म्हणत त्याने तिला फोन लावला पण तो स्विच ऑफ आला. एकदा नव्हे क्रित्येकदा तो फोन लावतच होता.

" विक्रांतराव, आम्हांला माफ करा." म्हणत रडतच शैलाताईंनी त्यांच्या फोनवर आलेला तिचा मॅसेज त्यांना दाखवला.

" आई, मला माफ कर. पळून जाण्याचा गुन्हा जरी असेल तरी प्रेमात सगळे गुन्हे माफ आहेत. माझं रविवर खूप प्रेम आहे. एक सामान्य ड्रायव्हर म्हणून बाबांनी त्याला कधीच जावई म्हणून स्विकारलं नसतं.विक्रांतवर माझं प्रेम कधी नव्हतं ना कधी असेल फक्त योग्य वेळ येईपर्यंत मला हे नाटक करणं भाग होतं.रविला स्थिरस्थावर व्हायला वेळ हवा होता फक्त अन् फक्त त्यासाठी मी हे नाटक केलं. मला माहीत आहे बाबा मला कधीच माफ करणार नाहीत तरीही तुमची मी मनापासून माफी मागते." वाचतांना विक्रांतचा तोल गेला आणि मोबाईल खाली पडला.

तिच्या सततच्या मौनाचा अर्थ त्याला आज आणि हा असा कळला. त्याचं एकतर्फी प्रेम गुदमरून मरत होतं. डोक्यावरची पगडी काढत तो तिथेच बसला. तोच त्याचे नातेवाईक आत आले.

" विश्वासराव, तुमच्या लेकीने आमच्या घराण्यालाही काळिमा फासला आहे. ती गेली पळून पण आता आमच्या विक्रांतच्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणाचे काय? त्याची काहीही चुकी नसतांना त्याने का शिक्षा भोगायची ? अश्या मुलाला कोणता बाप आपली मुलगी देईल ?" विक्रांतचे काका बरसले.

विश्वासरावांनी डोळे टिपले. मनाशी निर्धार करून ते उठले आणि विक्रांतच्या बाबांजवळ पोहचले. त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांनी क्षमा मागितली. त्यांना असे करतांना पाहून विक्रांतच्या बाबांनी लागलीच त्यांना उठवले.

" दिगंबरराव, माझ्या लेकीने आपला इज्जतीला फासलेला काळिमा पुसून टाकण्याची एक संधी द्या. माझ्या मेघाला सून म्हणून स्विकारा." हात जोडत त्यांनी विनंती केली.

त्यांची ही विचित्र विनंती ऐकून सगळेच हादरले.

विक्रांतला तर हा आणखी मोठा धक्का होता.

" माफ करा बाबा पण हे कदापी शक्य नाही." म्हणत तो तसाच बाहेर निघून गेला.

" विक्रांतरावांना समजवा. हा एकच पर्याय शिल्लक आहे आपल्याकडे. इज्जत तर गेलीच आहे पण त्यांचं आयुष्य बर्बाद नको व्हायला." विश्वासराव काकुळतीला येऊन म्हणाले.

जमलेल्या नातेवाईकांनी विक्रांतच्या वडिलांना समजावले. त्यानांही त्याचं म्हणणं पटलं. त्यांनी विश्वासरावांना होकार दिला आणि विक्रांतला समजवण्यासाठी ते वाड्याबाहेर पडले.

तोच मेघा लगबगीने वाड्यात शिरली. फोनवरून तिला झाल्या प्रकाराची माहिती कळली होती. ती रडतच शैलाताईंजवळ पोहचली.

" मेघा, आत ये आणि शैला तु ही." म्हणत विश्वासराव खोलीत शिरले. त्यांच्यापाठोपाठ मायलेकीही आत आल्या.

" तुला माहित होतं या सगळ्याबद्दल ?" विश्वासरावांचा पारा चढला.

मेघाने भीतभीतच नकार दिला. विक्रांतसोबत तिच्या लग्नाचा घेतलेला निर्णय त्यांनी सांगताच मेघा चिडली.

" बाबा, तिच्या चुकीची शिक्षा मला का ? मी नाही लग्न करणार . मला शिकायचं आहे." ती गयावया करू लागली.

" मेघा, तुला हे करावच लागेल. तिने जिवंतपणीच मारलं आहे. आता तुझ्या या निर्णयाने आम्ही औषध खाऊन कायमचे मरतो म्हणजे तुमच्या मनासारखं होईल. तु लग्न केलं नाहीस तर उद्या सकाळपर्यंत आमची मेलेली तोंडे पाहायला तयार रहा." विश्वासराव तोंड फिरवून म्हणाले.

शैलाताई फक्त रडत होत्या. नवऱ्याची इज्जत आणि लेकीचं भविष्य या दुविधेत त्या चांगल्याच भरडल्या जात होत्या.

" बाबा, असं अभद्र बोलू नका. माझ्या स्वप्नांच्या चितेवर तुमची इज्जत अवलंबून असेल तर या चितेत जळायला तयार आहे मी. शेवटी माझं आयुष्य उतरण बनूनच राहिलं." म्हणत तिने आपला निर्णय सांगितला.

ती आता कठोर बनली होती. तिचा जीवघेणा निर्धार तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता.

इकडे विक्रांतच्या आईबाबांनी जीवाची धमकी देत त्यालाही लग्नासाठी तयार केले.

ज्या लग्नाचा सोहळा सजणार होता तेच लग्न आज दोघांसाठी जीवघेणं बंधन ठरत होतं.विधिलिखित म्हणतात ते हेच होतं का ? 

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all