विधीलिखित - एक अनोखं नातं भाग2

Gosht Anokhya Natyachi


"तसं काळजीचं काही कारण नाही. थोडा मुका मार लागला आहे इतकंच. पण हातावर जास्त ताण पडू देऊ नका." असे म्हणत डॉक्टरांनी मलम लिहून दिले. 


आता सरला काकूंची मात्र चिडचिड झाली. "तुम्ही सईचे नको तितके लाड करून ठेवले आहेत. आधीच तिला कामाची आवड! त्यात तिची नोकरी आणि आता हात गळ्यात घेऊन बसल्यावर काय कामं होणार हिच्याकडून? द्यायची, घ्यायची पोर. आताशी कामाची सवय नको का व्हायला तिला? सासरी गेल्यावर तिचे कसे होणार देवालाच ठाऊक!" 

आपल्या बायकोची नेहमीची कॅसेट ऐकून बाबा मात्र गालातल्या गालात हसत होते. हे पाहून सईने आपले डोळे मोठे केले. 

-------------------------------


इकडे हर्ष 'ब्ल्यू बर्ड स्कूलच्या' पायऱ्या चढून वर आला. तिथल्या शिपायाला विचारून त्याने मुख्याध्यापकांची केबिन गाठली. त्याने दारावर टकटक केली. तसा आतून आवाज आला, "या."



"सॉरी फॉर लेट सर. मी मनूचा..म्हणजेच मृणालचा डॅडी." 


"ओ.. मि. हर्ष, प्लीज बसा." मुख्याध्यापकांनी शिपायाला सांगून पहिलीत शिकणाऱ्या मृणालला आपल्या केबिनमध्ये बोलवले." तशी तुमच्या मुलीबद्दल शाळेची काहीच तक्रार नाही. मात्र हल्ली ती कोणात फारशी मिसळत नाही. शांत शांत असते. कुठल्या स्पर्धेत भाग घेत नाही की वर्गात आपण होऊन मित्र-मैत्रिणींशी बोलत नाही. इतके सोडले तर मृणाल अभ्यासात एकदम हुशार आहे. तिच्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला बऱ्याचदा निरोप पाठवले. पण ते तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचले नसतील म्हणून मीच तुम्हाला येथे बोलवण्याचा निर्णय घेतला."


इतक्यात मृणाल आत आली. समोर हर्षला पाहून तिला खूप आनंद झाला. "बाबा.." ती एकदम हर्षच्या गळ्यात पडली.

"हे आपले घर नाही मनू. शाळा आहे ना ही? इथे उभी रहा." हर्ष मोठ्याने म्हणाला. तशी ती बाजूला जाऊन मान खाली घालून उभी राहिली. 

"सर, मृणाल आपल्या बाबांचं सगळं ऐकते. मी समजावेन तिला आणि लवकरच तिच्या वागण्यात बदल जाणवेल तुम्हाला. मी शब्द देतो." 

आणखी बरेच काही बोलून हर्ष तिथून बाहेर पडला.


'आज शर्वरी असती तर ही वेळच आली नसती. मनू आणि मी दोघेही एकटे पडलो आहोत. मनूचे दुःख तिला व्यक्त करता येत नाही आणि माझे दुःख मला.'

आपल्याच विचारात हर्ष सकाळी सायकल आणि गाडीची धडक झाली होती तिथे आला. नेमके त्याला सईचे बाबा समोरून येताना दिसले. तो हसला आणि सईच्या बाबांनी प्रत्युत्तर म्हणून त्याला हसून प्रतिसाद दिला.

"काका, सगळं ठीक आहे ना?"


"हो आहे. पण सईच्या हाताला मुका मार लागला आहे. कळ मारते थोडी. असो.. पण तुम्ही पुन्हा इकडे कसे?" बाबा हर्षला म्हणाले. 


"मी इथे नवीनच राहायला आलो आहे. परवाच शिफ्टींग झालं. तो समोरचा बंगला दिसतो तिथेच राहतो मी." हर्ष एका बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाला. "बाय द वे काका, मी हर्ष. कधीही या घरी. आता आपली ओळख झाली." हर्ष निघून गेला.


"बाबा, हा परत इथे काय करतो आहे?" सईने हर्ष आणि बाबांना बोलताना खिडकीतून पाहिले होते. 


"तो इथेच राहतो म्हणे. नवीनच शिफ्टिंग झालं आहे." बाबांनी माहिती पुरवली.

------------------------------------


गाडी चालवायला डॉक्टरांनी मनाई केली म्हणून दुसऱ्या दिवशी सई बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती. बराच वेळ झाला बस आलेली नव्हती.

'शिट..बाबाही आज नेमके ऑफिसला लवकर गेले. आज उशीर झाला तर आमची खडूस बॉस धरून बदडायला कमी करायची नाही.' सई मनातल्या मनात चरफडत म्हणाली. 


इतक्यात एक गाडी सईपाशी येऊन थांबली." सई, मगाच पासून पाहतो आहे मी तुम्हाला, अजूनही इथेच उभ्या आहात. डोन्ट माईंड, पण मी तुम्हाला ड्रॉप केलं तर चालेल?" हर्ष खिडकीची काच खाली करत म्हणाला.


"नको. मी जाईन दहा लाखांच्या गाडीने. तुमची पंधरा-वीस लाखांची गाडी आम्हाला कशी परवडेल?" 


"म्हणजे?"


"अहो, मी जाईन बसने." साई थोड्या रागाने म्हणाली.

इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. " हो गं, निघतेच आहे मी. बघ ना बस नाही आली अजून. होईल थोडा उशीर आता काय करणार? तू तिथे थोडं सांभाळून घे." सई वैतागून म्हणाली.

तसे हर्षने आपल्या बाजूचे दार उघडले. कुठला पर्याय नसल्याने सई गपचूप त्याच्या गाडीत जाऊन बसली.

"ऑफिसचा पत्ता?" हर्षने कारला थोडा वेग दिला.


"ब्ल्यू बर्ड स्कूलच्या मागच्या बाजूला आणि गाडी थोडी हळू चालवा. मला भीती वाटते वेगाची." सई म्हणाली आणि हर्षने गालातल्या गालात हसत गाडीचा वेग कमी केला.

"तुम्हाला कुठलीच गोष्ट सरळ बोलता येत नाही का? कायम वाकड्यात शिरता म्हणून विचारलं."


"येते तर! तसं फारसं मी कोणाशी बोलायला जात नाही आणि त्यातच जर तुमच्या सारखी माणसे भेटली तर मात्र माझं डोकं सटकतं." सई .


"अच्छा.. आमच्यासारखी म्हणजे? तुम्ही मला किती ओळखता? काल -परवाच तर आपली भेट झाली."

यावर सई काहीच बोलली नाही. 


इतक्यात हर्षचा फोन वाजला. "गाडी चालवताना फोनवर बोलू नये अजिबात." सईचे वाक्य ऐकूनही हर्षने फोन उचलला. फोन मृणालच्या शाळेतून होता. तिला बरं वाटत नसल्याने तिच्या वर्गशिक्षकांनी हर्षला फोन करून तिला घेऊन जायला सांगितले. हर्षने गाडीचा वेग जास्तच वाढवला. काही मिनिटांतच त्याने सईला ऑफिसपाशी सोडले आणि आपली गाडी ब्ल्यू बर्ड स्कूलच्या दिशेने वळवली.

क्रमशः






🎭 Series Post

View all