विधीलिखित -एक अनोखं नातं भाग 4

Gosht Anokhya Natyachi

सई आणि मनू दोघी शाळेच्या गेट जवळ उभ्या होत्या. 
"तुम्ही इथे?" हर्ष आश्चर्याने म्हणाला.

" हो. आज ऑफिसचे काम लवकर आटोपले. जाताना मनू एकटीच उभी राहिलेली दिसली. तिला विचारताना शिपाई म्हणाले, आम्ही अनोळखी लोकांसोबत मुलांना सोडत नाही. सो, तिच्यासोबत इथेच थांबले."

"थॅन्क्स. आज मला निघायला उशीर झाला. काल सुट्टी पडली. मग बॉस सारखा सुट्टी घेतो म्हंटल्यावर एम्पलोयी पण सारखी सुट्टी मागतील. तसे नको व्हायला म्हणून काम करत राहिलो. वेळेचे भान राहिले नाही आणि.."

"कधीतरी व्हायचे असे. पण मी होते ना इथे." असे म्हणत सई आणि मनू दोघी गाडीत बसल्या.

हर्षने सईला घरी ड्रॉप केले. तो निघणारच इतक्यात सरला काकूंनी त्याला हाक मारली. "आज चहा पिल्याशिवाय जायचे नाही इथून. मनू बाळा, तू आत ये म्हणजे तुझे बाबा थांबतील इथे." काकूंनी झटपट नाश्ता बनवला.

त्या दिवसापासून मनू रोजच इथे येऊ लागली. सईला तिचा फार लळा लागला. तिच्यामुळे मनू मध्ये खूपच बदल जाणवू लागला. सरला काकू, बाबा यांचाही मनूवर तितकाच जीव जडला. 
मनू जरी रोज इथे येत असली तरी हर्ष मात्र या कुटुंबापासून अंतर ठेऊन होता. कारण त्याच्या मर्यादा त्याला माहित होत्या. आज ना उद्या सईचे लग्न होणार. आपल्यामुळे तिच्या लग्नात काही अडचण यायला नको. शिवाय लोकही बोलायला कमी करणार नाहीत. त्यापेक्षा आपण अंतर राखून वागलेलं केव्हाही चांगल. पण त्याला आता आधीसारखी मनूची काळजी वाटत नव्हती. कारण मनू विषयी असणारे सई, काकू आणि बाबांचे प्रेम त्याला ठाऊक होते.
मनू हल्ली सईमुळे तिच्या बाबांना बाबाच म्हणे. त्यामुळे हर्षही त्यांना बाबा म्हणू लागला. नाही म्हणायला शेजारी पाजारी कुजबूज चाले. मात्र सरला काकू आणि बाबा त्याकडे लक्ष देत नसत.


हळूहळू हर्षला सईचा सहवास आवडू लागला. शर्वरी आणि सईच्या आवडी -निवडी, वागण्या बोलण्याच्या पद्धतीत बरेच साम्य होते. शिवाय आपल्या कामाव्यतिरिक्त सई मनूला एक मिनिटंही नजरे आड होऊ देत नसे. या दोघींची इतकी छान गट्टी जमली होती, जणू माय लेकी असाव्यात दोघी! मनूसाठी सईच आई म्हणून योग्य आहे. हर्षच्या मनाने कौल दिला आणि 'माझे काय? सईला लग्नासाठी विचारावे की नको? शर्वरीच्या आठवणी माझ्या मनातून जाता जात नाहीत.'


हर्षच्या मनातली चलबिचल बाबांनी ओळखली. "हर्ष, मनातलं बोलायचं असेल तर बोलून टाक. मला तुझा मोठा मित्र समज हवं तर."
"बाबा, कसं बोलू तेच समजत नाही. मनूचा सईवर खूप जीव आहे आणि सईचा मनूवर. या गोष्टीचा पुढे जाऊन त्रास व्हायला नको." यावर बाबा काहीच बोलले नाहीत.

"तुम्हाला माझं बोलणं आवडलं नसेल तर सॉरी." हर्ष नाराजीने म्हणाला.

"हर्ष, तू लग्न करशील माझ्या मुलीशी?" बाबांनी विचारलेल्या प्रश्नाने हर्षचा गोंधळ उडाला.
"माझ्या सईशी लग्न करशील?" बाबा पुन्हा म्हणाले. 

"हे कसं शक्य आहे बाबा? सईचं हे पहिलंच लग्न..तिच्या खूप अपेक्षा असतील, स्वप्नं असतील. त्यात मी कुठेच बसत नाही. 
खरंतर शर्वरी आणि माझा प्रेमविवाह. दोघांच्या आई- वडिलांचा विरोध होता आमच्या लग्नाला. मग कॉलेज संपल्यानंतर पुढच्या वर्षी लगेचच आम्ही लग्न केलं. एका वर्षात मनूचा जन्म झाला. पण दोघांच्या आई -वडिलांचा विरोध कायम राहिला. साधारण चार वर्षांपूर्वी एका अपघातात शर्वरी आम्हा दोघांना सोडून निघून गेली. त्याचा दोष माझ्या माथी लागला. तिच्या आई -वडिलांनी मलाच दोषी मानलं. यातून सावरण्यास आम्ही घर बदललं. आता मी माझ्या आईच्या संपर्कात असतो. पण वडील अजूनही बोलत नाहीत माझ्याशी." 

"हर्ष, यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहित आहेत. तुझी माहिती बाहेरून कळायला मला फारसा वेळ लागला नाही. शेवटी मीही एक बाप आहे रे. काहीतरी विचार करूनच मी हा प्रश्न तुला विचारला असेल ना? 
मी चांगलच ओळखतो माझ्या मुलीला. सईच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दिसतं आणि मनूसाठी माया. पण कदाचित समाजाचा विचार करून ती काही बोलत नसेल. पण तुम्ही दोघे समाजाचा विचार करू नका. कारण समाजात नव्या विचारांचे स्वागत खूप उशीरा होते. बघ, विचार करून निर्णय घे. कदाचित हे विधिलिखित असेल!" बाबा म्हणाले. 

क्रमशः




🎭 Series Post

View all