"डॅडू, कसं तरी होतंय." मनू अस्वस्थ झाली होती. घराजवळ येऊन हर्षने एका दवाखान्यापाशी गाडी थांबवली आणि मनूला घेऊन तो पळत आत गेला. सुदैवाने दवाखान्यात फारशी गर्दी नव्हती. डॉक्टरांनी मनूला तपासले. काही औषधे लिहून दिली. "थोडा फार स्ट्रेस जाणवतो आहे. बाकी काही काळजी करू नका. ताप उतरला नाही तर संध्याकाळी पुन्हा घेऊन या."
या सगळ्या गडबडीत ऑफिसमध्ये कळवायचे हर्ष विसरूनच गेला. आपल्या फोनकडे त्याचे लक्षच नव्हते. गाडीत फोन विसरल्याने तो घराबाहेर आला. आपला फोन घेऊन तो गाडीचे दार बंद करणार इतक्यात दुसऱ्या फोनची रिंग वाजली. क्षणात त्याच्या लक्षात आले, सईचा फोन इथे विसरला असावा. गडबडीने त्याने फोन उचलला.
"कधीचा फोन करते आहे मी. हर्ष, माझा फोन तुमच्या गाडीत विसरला आहे ना?" पलीकडून आवाज आला.
"हो."
"मग फोन तुमच्याकडेच ठेवा. संध्याकाळी मी येऊन घेऊन जाईन." हर्ष पुढे काही बोलणार इतक्यात सईने फोन ठेवून टाकला.
----------------------------------------
संध्याकाळी दारावरची बेल वाजली, तसा मनूने पळत येऊन दरवाजा उघडला.
"घरात कोणी आहे का बाळ?" सईने आत वाकून पाहत विचारलं.
"बाबा.. कोणीतरी आलं आहे." मनू हर्षला हाक मारत आत निघून गेली.
हर्ष नुकताच झोपेतून उठला होता. तसाच तो बाहेर आला.
"माझा फोन न्यायला आले मी." सई दारातूनच म्हणाली.
"हम्म. आत या ना." हर्ष सईचा फोन शोधू लागला. "मनू, इथे आणखी एक फोन होता. तो कुठे आहे?"
हर्षचा आवाज ऐकून मनूने मागे लपवलेला फोन हळूच आणून त्याच्या हातात दिला.
"मनू, दुसऱ्याच्या फोनला हात लावू नये. इतकंही कळत नाही का तुला?"
हर्षचा वाढलेला आवाज पाहून मनू रडवेली झाली.
"अहो, असू दे फोनला लॉक होते.ते तिला ओपन करता आले नसावे." सई मनूच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली.
"हो. पण लॉक उघडले नाही म्हणून मी फक्त एकदाच ट्राय केले." मनू आपले डोळे पुसत म्हणाली.
"तुमची मुलगी का? खूपच गोड आहे." सईने मनूला आपल्याजवळ ओढले. " बाबा ओरडले ना? मग आता आईला जाऊन सांग हं त्यांचं नाव. पण आई कुठे आहे तुझी?"
"माहित नाही. मला ती कधीच दिसत नाही. ती त्या फोटोतच असते कायम. पण बाबा मात्र तिच्याशी रोज बोलतो म्हणून मी तिच्याशी तशीच बोलते." सई समोरच्या फोटोकडे बोट दाखवत म्हणाली.
"ओह..सॉरी बाळा. मला माहित नव्हतं." सईने मनूला मिठी मारली.
" मी तुला आई म्हंटल तर चालेल?" मनू आपली मिठी अधिकच घट्ट करत म्हणाली.
"मनू.. इकडे ये. त्या ताईला उशीर होतो आहे. जाऊ दे तिला घरी." हर्षने सईचा फोन तिच्या हातात दिला.
"उद्या येशील ना? मी वाट पाहते तुझी." मनूने गोड हसत सईला निरोप दिला.
"आता हात कसा आहे तुमचा?" हर्ष दारात येऊन सईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला.
"आहे बरा. आज दिवसभर कामात वेळ गेल्याने त्याची आठवणही राहिली नाही." सईने हळूच आपले डोळे पुसले. हे हर्षच्या नजरेतून सुटले नाही.
घरी येऊन सईने सारी हकीकत आई-बाबांना सांगितली. हर्षने बाबांच्या मनात आधीच घर केले होते. आता त्यांना हर्षबद्दल जिव्हाळा वाटू लागला. सरला काकूही हळहळल्या.
--------------------------------------
"बाबा, ती बघा आपल्याकडे काल आली होती ना..स्टॉपवर उभी आहे." मनूच्या आवाजाने हर्षचे सईकडे लक्ष गेले. पण त्याने गाडी थांबवली नाही. कालचा प्रसंग आठवून तो अस्वस्थ झाला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला.
"हळू ना बाबा..मला भीती वाटते." मनू घाबरून म्हणाली. तसे हर्षच्या चेहऱ्यावर अस्पष्ट असे हसू उमटले.
मनूला शाळेत सोडून हर्ष ऑफिसमध्ये गेला.
"प्रेरणा, एनी अपडेट?"
"नो. सर आणि एव्हरीथिंग इज फाईन. काल सगळं व्यवस्थित पार पडलं." हर्षची सेक्रेटरी म्हणाली. "मनू ओके आहे आता?"
"हो."
दिवसभर काम करून हर्ष थकून गेला. मनूची शाळा सुटून तास होऊन गेला तरी त्याचे लक्ष नव्हते. सहाचा ठोका पडला तेव्हा हर्ष भरकन उठला.
"आजचे उरलेले काम पूर्ण करून अर्ध्या तासात ऑफिस बंद करा." प्रेरणाला सूचना देऊन तो ऑफिसमधून बाहेर पडला.
शाळेच्या आवारात येताच हर्षला वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा