विधिलिखित -एक अनोखं नातं भाग अंतिम

Gosht Anokhya Natyachi

"सई, तुला मनूबद्दल काय वाटते? सरला काकू अचानक म्हणाल्या.

"आई, का कोणास ठाऊक? पण असे वाटते तिचे आणि माझे जन्मोजन्मीचे काहीतरी नाते असावे. खूप जीव आहे माझा तिच्यावर. खूप आवडते ती मला. बघ ना, आम्ही दोघी एकत्र असल्यावर सगळे विचारतात, आम्ही माय -लेकी आहोत का म्हणून?" सई सहज बोलून गेली.

"..आणि हर्षबद्दल काय वाटते तुला?" सरला काकूंनी पुन्हा प्रश्न केला.

"हर्ष, माझा चांगला मित्र आहे. एक चांगला बाप आहे. आवडतो मला तो.. बस् इतकंच.
आमच्या नात्याची सुरुवात जरा हटके झाली. पण माझा जीव.." सई बोलता बोलता अडखळली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव उमटले.
तशा सरला काकू बाबांकडे पाहत म्हणाल्या, "आयुष्यभरासाठी एक जोडीदार म्हणून कसा वाटतो तुला हर्ष? अगदी मनमोकळेपणाने बोल.

"आई.. अगं त्याचं लग्न झालं आहे. शिवाय त्याला एक मुलगी आहे. मी त्याच्याशी लग्न करायला भलेही तयार होईन. पण तो तयार व्हायला हवा ना लग्नासाठी आणि तसं झालं तर लोक काय म्हणतील? त्याची श्रीमंती पाहून लग्न केलं हिने. असंच म्हणतील. नको ते बोलतील सारे. याचा सगळ्यांना त्रास होईल." सई भडाभडा बोलून गेली.

"आणि तो तयार असेल तर?" बाबा मध्येच म्हणाले.

"बाबा, म्हणजे तुमचं बोलणं झालं आहे या विषयावर?" सई गोंधळून म्हणाली.

"सई, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती, पूर्व जन्मीच नातं असतं म्हणून. कदाचित ऋणानुबंध असावेत काहीतरी खास. मी आणि तुझ्या आईने हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. समाजाचे म्हणशील तर, आपण कसंही वागलो तरी समाज नावे ठेवतोच. 
मान्य आहे, हे तुझं पहिलं लग्न आहे. तुझ्या खूप साऱ्या अपेक्षाही असतील. पण हर्षसारखा मुलगा मिळणे भाग्यात असेल तर ते का नाकारावे? आणि मनूला आई हवीच. आईचे प्रेम तू तिला देशील याची खात्री आहे आम्हाला. " बाबा म्हणाले.

"बाबा, माझ्या जास्त अपेक्षा नाहीत. फक्त त्याने मला सांभाळून घ्यावं. माझ्यावर भरभरून प्रेम करावं. बाकी मी माझ्या परीने संसारासाठी सगळं करेन." सई म्हणाली.

"हर्षचे कुटुंब पूर्ण होईल. त्याला हक्काची बायको आणि मनूला हक्काची आई मिळेल. किती जीव लावला आहे पोरीने! त्या लेकरासाठी जीव तुटतो गं.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची मुलगी आमच्या डोळ्यासमोर राहील." काकू आपले डोळे पुसत म्हणाल्या.

आपल्या आई -बाबांनी आपल्यासाठी इतका पुढारलेला विचार करावा! हे सईसाठी नवीनच होते. बराच विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. तिला खात्री होती, मनूचा ती नीट सांभाळ करू शकेल आणि हर्ष तिला आवडत होताच.
सई सरला काकूंच्या मिठीत शिरली.

सईचा होकार आहे म्हंटल्यावर सरला काकू आणि बाबांनी हर्षला घरी बोलावून घेतले. तो आपल्या आईला घेऊन आला. हर्षच्या आईला सई आवडली आणि हर्षच्या वडिलांनीही आपला राग विसरून या लग्नाला संमती दिली. 

"या लग्नासाठी माझी एकच अट आहे." न राहवून हर्ष म्हणाला. \"आता हे काय नवीनच?" सर्वांच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.
"ती अट म्हणजे, सईने मनूला आईचे प्रेम द्यावे. बस्. माझ्या मनूची आई आणि माझी बायको होशील?" हर्षने सईला प्रपोज केले आणि सईने लाजून त्याला होकार दिला.

काही दिवसांतच हर्ष आणि सईचे लग्न पार पडले. मैत्रीचे नाते एकााअनोख्याा बंधनात बांधले गेले. आता सई कायद्याने मनूची आई झाली आणि हर्षची बायको! 

हर्ष आणि सईचं लग्न झालं असलं तरी या नात्यात थोडं अवघडलेपण होते. पण मनूमुळे हे अवघडलेपण लवकरच दूर झाले. 

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, त्यांच्यासोबत आपले विचार जुळतात. मैत्रीचं, प्रेमाचं नातं जुळतं. कदाचित हे विधिलिखित असतं. आपल्या आयुष्यात कोणी यावं? त्यांशी आपले संबंध कसे असावेत? हे दैव ठरवतं आणि जे दैव ठरवतं तेच विधिलिखित असतं.

समाप्त.
©️®️सायली जोशी.


🎭 Series Post

View all