विचार

This blog o related to our thoughts

विचार:-

किती महत्वाचा शब्द आहे ना ' विचार'! खरं म्हणले तर विचार हा आपला खूप जवळचा मित्र अथवा मैत्रीण म्हणा जो कधीच साथ सोडत नाही आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणाल तर एक असा शत्रू जो कधीच पाठ सोडत नाही! जळी,स्थळी, काष्ठी, पाषाणी जिथे तुम्ही असाल तिथे तुमच्या सोबत आहे ते तुमचे 'विचार'. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात,आपण कोणत्या अँगल ने ते घेतो त्यावर सगळे अवलंबून असते. माझ्या खूप जवळच्या अशा व्यक्तीचे उदाहरण मी इथे देऊ इच्छितो.. तर आपण त्याला नाव देऊ यात मित्र! तर हा माझा हा मित्र मुळात खूप आणि खूप सज्जन व्यक्ती आहे. खूप चांगल्या मनाचा, विचारांचा आणि अत्यंत कर्तव्यदक्ष! मी तर म्हणेन अति हुशार आणि अति चांगला ही एक त्याला दैवी देणगी आहे आणि कधी वाटते की हा एक श्राप सुद्धा! कुठल्याही गोष्टीचा खूप खोलवर स्टडी करायचा, मग त्याचं चांगलं किंवा वाईट पडताळून बघायचे आणि त्या सगळ्यात खूप लेव्हल वर विचार करत स्वतःला त्रास करून घ्यायचा. मुख्यतः या सगळ्या प्रोसेस मध्ये त्या क्षणाची मजा ही हरवून बसायची! एखाद्या गोष्टीचा सुतावरून स्वर्ग गाठायचा म्हणा ना! खूप चांगले असणे, दुसऱ्याच विचार करणे या नादात त्या माझ्या मित्राने ने स्वतःला हरवून दिले आहे. त्याचा शोध घेत मी त्याला कायम काहीतरी सांगत असतो. विचार हा तुम्हाला तुमचे भविष्य घडवायला मदत करतो. त्याला दिशा देणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही शालेय जीवनात असता तेव्हा निर्णय घरातील मोठे घेतात! मग मोठे झालो की मित्र- मैत्रिण सोबत आणि मदत सुद्धा करतात पण या सगळ्यात सर्वात महत्वाचं आहे ते तुमचं स्वमत! जे घडत असते ते विचारांनी. विचार करणे हे खूप गरजेचे आहेच. जर विचार केले नाही तर मार्ग मिळणार नाही आणि मार्ग मिळाला नाही तर आपलं यश आपल्याला मिळणार नाही. म्हणून म्हणतो त्याला द्यावी लागते ती दिशा आणि त्या योग्य दिशेसाठी महत्वाचे आहे ते म्हणजे तुमचे सकारात्मक असणे! आता आपण बघूयात याच विचारांची दुसरी बाजू! विचारांना जर आपण भरकटू दिले तर त्यासारखा मोठा शत्रू दुसरा कोणी नाही. म्हणतात ना 'मन चिंती ते वैरी न चिंती!' माणसाचं मन म्हणजेच त्याचे विचार हे वेगळेच रसायन आहे! तर हे मन तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर नेऊन आणते आणि त्याची गल्लत होते आणि निर्माण होते भीती! मग ही भीती स्वतःचे वर्चस्व गाजवत आपल्याला नेते चुकीच्या दिशेने आणि आपण करतो ते निगेटिव्ह विचार! जसे म्हणतात ना एक ग्लास पाण्याने अर्धा भरून असला तरी बघणारा कोणी म्हणतो की हा अर्धा रिकामा तर कोणी म्हणतो नाही हा अर्धा भरलेला ग्लास आहे. तर हे जे मत निर्माण होत असते ते तुमच्या विचारांनी! खरं तर मी म्हणेन की ज्याला खरच तहान लागली आहे त्याने हेच बघावं की हे अर्धा ग्लास पाणी माझी तहान भागवू शकते मग मी त्याला रिकामा का म्हणावे! खरंतर आपल्यात जग जिंकण्याची जिद्द असावी, काम करण्याची क्षमता निर्माण करावी आणि त्याला जोड द्यावी ती योग्य विचारांची, आणि मग बघा जे मिळते ते किती उत्तुंग यश असते आणि ते आत्मिक समाधान मिळवून देते. यश हे तुमची वाट बघत असते तिथवर पोचण्याचा मार्ग आपल्याला शोधायचा असतो. मुळात तो असतोच पण आपण योग्य विचारांची जोड द्यायची असते. एक चांगला विचार संपूर्ण आयुष्य घडवते तर तेच एक चुकीचा विचार त्याला मातीत मिळवते. विचार हे वाईट नाहीत ते फार गरजेचे आहेतच पण त्याला दिशा देणं हे आपल्या हातात असावं. आपल्या मनावर आपलं प्रभुत्व आपण निर्माण करायचं असते ते जर दुसऱ्याच्या हातात दिले तर मात्र मार्ग कठीण होतो. सुखकर असे काहीच नसते आणि सहज सुद्धा! त्याला आपल्या विचारांनी ते बनवावे लागते आणि जोड द्यावी लागते ती सुयोग्य मेहनतीची. मी एक समुपदेशक म्हणून तुम्हाला दरवेळी सहज सोप्या भाषेत काही न काही सांगायचा प्रयत्न करत असतो. खूप सहज आणि साध्या गोष्टी असतात पण योग्य रीतीने जर आपण गाईड लाईन मिळावली तर आपले आयुष्य आणखी जास्ती सुखकर होते आणि जीवनाचा परम आनंद आपल्याला मिळतो. आपलं सुख, समाधान, आनंद हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे आणि ते मिळवणे हे सुदधा! चांगले विचार करा! चांगली सोबत ठेवा!आणि मनापासून विश्वास ठेवा मग तो व्यक्ती असो अथवा ती अदृश्य शक्ती! तुम्ही यशस्वी होणारच हा विश्वास बाळगा आणि पुढे चालत राहा. मग म्हणतात ना 'सबकुछ आसान है!' आणि त्या विचारातच तुमचे भविष्य आहे, तुमचे कर्तृत्व आहे. एक योग्य विचार हा तुम्हाला पराकोटीचा आनंद आणि यश देऊ शकतो हे कधीच विसरू नका आणि त्या विचारला चुकीच्या दिशेने भरकटू देऊ नका. लेख वैचारिक आहे तर या लेखाचा ही नीट मनापासून आणि नक्की विचार करा!

©®अमित मेढेकर