वेश्यागृहातील आरसा ( भाग तिसरा )

कधी कधी प्रतिबिंब पण माणसाला अधःपाता पासून वाचवतं, फक्त मन शुद्ध असायला हवं हेच खरं.


वेश्यागृहातील आरसा ( भाग तिसरा )

खूप फिरून फिरून बस चालली होती. आजुबाजूच सगळं जग टक्क जागी होतं. रात्र झाल्याचं कुठलच लक्षण तिथं नव्हत.

बराच वेळ बस चालली होती. तसं मी त्याला विचारलं.

" मावशीच घर कुठं आहे. घरी कोण कोण असतं. "

तो नुसतं हसला. म्हणाला ,

" थांब ना थोडावेळ, माहिती पडेल लवकरच."

आणि हळू हळू बस एका वेगळ्याच भागातून जायला लागली. जिथं प्रचंड गर्दीच गर्दी होती.

" आता आपल्याला उतरायचं आहे. हे बघ घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहेच. पैशाची काळजी करू नकोस. आज खूप मजा कर. "त्याने सूचना दिली.

मग आम्ही दोघेही खाली उतरलो.

समोर एक सिनेमा थिएटर होतं. आजूबाजूला पान टपरीची, फुलांची दुकानच दुकानं होती. गर्दी तर एव्हढी होती की विचारूच नका. मोठं मोठ्या उंच बिल्डिंगा आणि त्यात प्रत्येक खिडकीत उभ्या असलेल्या, भडक रंगपट्टी केलेल्या बाया, मुली उभ्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याला बोलावीत होत्या. खुणा करीत होत्या. रस्त्यात पण कुठे कुठे आडोशाला अंधारात बाया उभ्या होत्या.

माझ्या मित्राने मला विचारलं," तू या भागात कधी आला आहेस का"

मी म्हटलं, "नाही. "

तेव्हढ्यात एका बाईने माझा हात धरला, आणि म्हणाली,"  आओ ना."

मी हातातली गोळ्या बिस्किटांची पिशवी घट्ट पकडुन म्हटलं ,"नही, मुझे मावशीके यहा जाना है."

मित्र म्हणाला," हे बघ, घाबरू नको. आणि असं कोणासोबत बोलू पण नको. चल माझ्या बरोबर. "

असं म्हणून तो मला एका इमारतीत घेऊन गेला. या ठिकाणी त्याला ओळखणारे बरेच लोक होते. बायका पण त्याला ओळखत होत्या.

तिसऱ्या मजल्यावर आम्ही पोहोचलो. रात्रीचे पावणे दहा वाजत आले होते. पण तिथं नुसती गजबज होती. एका खाटेवर बसून एक लाल रंगाचे केस असलेली एक राकट बाई ,अडकित्याने सुपारी कातरत पान तयार करत बसली होती. ती मित्रा कडं बघून हसली. हसून म्हणाली, " अरे कुठं होता इतके दिवस ?" बोलतांना तिचे किडलेले दात खूपच घाण दिसत होते.

" अरे मावशी, मला काम खूप असतात. आज माझ्या मित्राला घेऊन आलोय. " असं म्हणत तो माझ्याकडे वळून म्हणाला,

" अरे, तू इथंच थांब थोडावेळ. मी येतो लगेच. नंतर बोलतो तुझ्याशी " असं म्हणून मित्र नाहीसा झाला.

मी मनात विचार केला. अच्छा, ही घाणेरडी बाई याची मावशी आहे तर. मी पुढे होऊन तिच्या पाया पडलो. तिने पाय एकदम मागे घेतले. "अरे, अरे हे काय करतोस.  वेडा आहे की काय तू ?"

ओशाळून तिथल्या एका खुर्ची वर मी जाऊन बसलो. आणि इकडे तिकडे पाहात बसलो.

त्या घरात बऱ्याच मुली असाव्यात. सारखं कोणी न कोणी येत जातं होतं. तिथं ज्यात पूर्ण प्रतिबिंब दिसेल असा एक मोठ्ठा आरसा होता. त्या आरशात एक अठरा एकोणीस वर्षाची एक मुलगी परकर पोलका येव्हढ्याच कपड्यात इतक्या रात्री मानेला झटके देऊन देऊन केस विंचरत होती. ती तू होतीस.

दोन पाच सहा वर्षाची छोटी मुलं पकडा पकडी खेळत होती.

मला ते वातावरण एकदम विचित्र वाटायला लागलं. अरे, कशी विचित्र माणसं आहेत ही. आम्ही इतक्या लांबून आलोय, कोणी पाणी पण विचारत नाही.

शेवटी मी त्याच्या मावशीला म्हटलं,
" मावशी, खूप तहान लागली आहे. थोडं पाणी दया ना."

त्या बाईने कर्कश्य आवाजात त्या दोन मुलांपैकी एकाला पाणी द्यायला सांगितलं. तो मुलगा पाणी घेऊन आला. मला अचानक आठवलं की आपण चॉकलेट गोळया आणल्या आहेत. त्या दोघी मुलांना चॉकलेट गोळया दिल्या. दोघं खूप खूष झाली. त्यांच्याशी माझी दोस्ती झाली. ते माझ्याशी खेळायला लागले. त्यातल्या एकाने एक चॉकलेट त्या केस विंचरणाऱ्या तुला नेवून दिलं.

मी त्या मुलांशी खेळत असतांना अचानक माझं लक्ष आरशात गेलं. त्या आरशातल केस विंचरणाऱ्या तुझं प्रतिबिंब आमचे खेळ टक लावून पाहात होतं.

थोड्यावेळाने मित्र आला. मावशी  तुला, माझ्या कडे बोटं दाखवून म्हणाली, " याला घेऊन जा आत."

*********

मी आधीच सांगितलं आहे की मूर्ख पणात माझा हात कोणीच धरू शकणार नाही. मला वाटलं आता, जेवायची तयारी झाली असेल.

पण त्या वेळी तुला काय वाटलं कुणास ठाऊक. तू चक्क नाही म्हणालीस .

"नहीं, मावशी मैं इसको नहीं लेके जाऊंगी. ईसको मेरे बच्चो के साथ खेलने दो "

कदाचित त्या वेळी तुला मी मोरू वाटलो असेल. नाहीतर मामा वाटलो असेल. पण पुढच्या गोष्टींमधून मी अकल्पीतपणे वाचलो .

माझा मित्र आणि मी दोघेही परत आलो. जेवण बाहेरच केलं.

आज ईतक्या वर्षांनी मी कुठे गेलो होतो, हे समजलं होतं. पण तेंव्हा नेमकं काय झालं होतं हे अजूनही समजत नाही

पण मला नक्की आतमध्ये कुठंतरी जाणवत की मला त्या आरशानेच वाचवलं होतं. वाचवलं होतं म्हणावं की  की त्या देहव्यापाराच्या दलदलीत मूलांना अचानक पणं क्षणभर का होईना मिळालेलं बालपण मिळू द्यावं म्हणून तुझ्यातली आई जागी झाली होती म्हणावी , काही समजत नाही.  आजही सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

कधी कधी प्रतिबिंब पण माणसाला अधःपाता पासून वाचवतं, फक्त मन शुद्ध असायला हवं हेच खरं. माझं मला माहीत नाही. पणं त्या क्षणी  माझ्याशी खेळण्यात मग्न असलेल्या आणि माझं प्रतिबिंब पाहात असलेल्या तुझं मन मात्र शुध्द होतं यात तिळमात्र शंका नाही.

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all