वेश्यागृहातील आरसा ( भाग पहिला )

कधी कधी प्रतिबिंब पण माणसाला अधःपाता पासून वाचवतं, फक्त मन शुद्ध असायला हवं हेच खरं.


वेश्यागृहातील आरसा ( भाग पहिला )

तू मला ओळखत नाहीस. मी देखील तुला ओळखत नव्हतो. परंतु तुझ्या त्या घरातील आरशाने, माझी तुझ्याशी आणि तुझी माझ्याशी एक वेगळीच ओळख करून दिली. त्या आरशाचा मी आजन्म ऋणी राहील. कारण हे वेगळे पैलू जर तो आरसा नसता तर ना मला कळले असते, ना तुला कळले असते.

तुला आठवतो का तो दिवस , ज्यावेळी मी तुला बघितलं त्या वेळी मला माहीतच नव्हतं की तू देखील मला बघत होतीस.  किती वेळ बघत होतीस कोणास ठाऊक. मी त्याबाबतीत पूर्णपणे अनभिन्न होतो. पण तू मात्र माझं कितीतरी वेळ निरीक्षण करत होतीस.

आजही मला , तुझ्या त्या कठोर व्यवसायात दुर्मीळपण आढळणारी  माणुसकी आणि अबोलपणे  मुलांबद्दलच  जपलेल  तुझं प्रेम आठवतं. दुर्दैवाने दलदलीत वाढलेल्या मुलांसाठी क्षणभरासाठी का होईना पण हरवलेलं बालपण देवू करणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला नरकाची दार,  कायमसाठी बंद करणारी तू, माझ्या मात्र कायमची लक्षात राहिली आहेस.

भले प्रत्यक्षात आपल्यामध्ये कोणताही संवाद झाला नाही. कोणतेही बोलणं झालं नाही. परंतु एक वेगळ्याच पातळीवरचा मुक संवाद आपल्यामध्ये घडून आला. ज्याचे तुलना कोणत्याच संवादाची करता येत नाही. आजही असा लाकडी डिझायनीच्या फ्रेम मध्ये मढवलेला आरसा पाहिला की मला आठवते तुझ भर रात्री मोकळे केस विंचरण , मुलांचं ते खेळणं, आणि त्या खेळण्याकडे तुझं ते केस विंचरता विंचरता अनिमिष पणे बघत राहणं.

खरं म्हणजे तो आरसा केवळ तुझे बाह्यरूप दाखवणारा नव्हता. तर त्याने मला तुझे हळूवार अंतरंग नकळत दाखवले होते. त्याचबरोबर माझी एका गर्तेतून अलगदपणे सुटका देखील केली होती. असे ते आरशाचे अनंत उपकार मी कधीच विसरू शकत नाही.

कदाचित आज मला तू विसरून देखील गेली असशील. कारण आठवण ठेवावं असं काही आपणात घडलंच नव्हतं. मला देखील आज तुझं रूप वगैरे काहीच आठवत नाही. इतकाच काय पण तू कुठे राहत होतीस ,मी कुठे आलो होतो ते देखील आठवत नाही. परंतु क्षणभरासाठी घडून गेलेली ती घटना माझ्या साठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामूळे तीला मनावर मी करून ठेवलेली आहे. काहीही झालं, कितीही काळ लोटला तरी मी ते विसरू शकत नाही.

आज वयाच्या उतारवयात मी विचार करतो की तुझी मुलं मोठी झाली असतील. शिकली असतील. कुठेतरी नोकरी करून त्यांनी तुला नरकातून बाहेर काढलं असेल.

आणि खरोखरच प्रत्यक्षात तसचं घडाव. आज ते काय करत असतील मला माहित नाही. तू कोणत्या अवस्थेत असशील, कोणत्या परिस्थितीत असशील याची देखील मला कल्पना नाही. पण मी परमेश्वरा जवळ नेहमी प्रार्थना करतो की तू त्या नरकातून बाहेर पडली असशील. तुझी मुलं खूप मोठी झाली असतील आणि त्यांनी तुला सुखात ठेवलं असेल.

निर्जन माळरानावर एखादं नाजूक रान फुल उमलाव आणि ते वाऱ्यावरती झुलत राहावं तसं तुझं वात्सल्याने भरलेलं कोमल अंतकरण ,मला त्या वासनेच्या झगमगत्या मध्यरात्री न कळतं सहजपणे उमललेलं दिसलं होतं. त्या बाबतीत तू अनभिन्न होती.

पण कधी कधी विचार करतो की, जर असा विचार तुझ्या मनात आलाच नसतात तर काय झालं असतं ?

खरचं कोण होतीस तू आणि क्षणभरासाठी माझ्या आयुष्यात का आली होतीस समजत नाही. पण सगळं कसं कालच घडल्या सारखं लख्ख आठवतय. अर्थात हे तूझ्या पर्यंत कधी पोहोचणार नाही याची मला खात्री आहे. पण तरीही लिहिल्या शिवाय राहवत नाही.

आठवते त्या दिवसाची रात्र.....

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all