वेळेचे गुलाम

कथेतील नायिका आपली नोकरी व इतर कामांमध्ये आपले स्वतःचे अस्तित्व हरवून बसते.ते हरवेल अस्तित्व ती कसं परत मिळवणे ते आपण‌ पाहणार आहोत.


वेळ सकाळी ९:०० ची , घरात मात्र आज सगळ्यांची खूपच घाई,गडबड , आणि काकूंची किचनमध्ये नाश्त्यासाठी सुरू असलेली तयारी... अगदी लगबगीने काकू किचनमधील कामांची आवरासावर करत होत्या.
त्याला कारणही तसंच होतं , आज राधाकाकूंच्या भाचीच लग्न होतं. म्हणून शुभ्रा वगळता घरातील सगळीच मंडळी (अगदी आजी सुध्दा) लग्नाला जाणार होती . आणि त्यासाठी च सकाळी सकाळी घरात सुरु असलेली ही लगबग...सगळी काम‌ आवरुन राधाकाकू तयारीला लागल्या खऱ्या ; पण‌ साडी मात्र कुठली नेसावी ? हे काही काकूंना कळेना . शेवटी काकू शुभ्राच्या रूम मध्ये विचारण्यासाठी गेल्या...पण शुभ्रा मात्र आपल्या Laptop मध्ये डोकं खुपसून बसली होती ...शुभ्राला मान वर करून राधाकाकूंशी बोलायलाही वेळ नव्हता.
शुभ्रा राधाकाकूंची मुलगी ... उच्चशिक्षित एका नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत...आज खरंतर शुभ्राला देखील या लग्नासाठी सगळे जण घेऊन जाणार होते . पण हिला मात्र कसला वेळ , आज हिच्या एका महत्वाच्या project ची Deadline होती. शुभ्रा IT Sector मध्ये काम करत असल्यामुळे हि‌ अगदी १०-१२ तास त्या Laptop वर काम करत असे . आणि सध्या तर काय लाॅकडाऊन पासून IT Sector च्या लोकांना work from home च मिळालंय , अगदी घरात बसून सुद्धा श्वास कोंडलाय त्यांचा .
राधाकाकू शुभ्राला विचारण्यासाठी आल्या खऱ्या ; पण हिला मात्र कुठे वेळ होता ...आणि हे काही नवीन नव्हत , शुभ्राला नेहमीच कुठल्या गोष्टी साठी वेळ मिळत नाही . मग ते कुठल्या सणासाठी असो , घरातील कोणाचा वाढदिवस असो , लग्न असो किंवा family get together असो . हि मात्र‌ नेहमीच आपल्या कामात busy .आपले Projects आणि Deadlines या विश्वातच असणारी शुभ्रा. पण घरातले हि सगळे समजून घेत . कधी कधी थोडासा राग येऊन कुणीतरी टपली मारल्या सारखे एखादा शब्द बोलुन जाई.
पण आज मात्र राधाकाकूंचा संताप अनावर झाला . त्या अगदी उंच स्वरात शुभ्राला म्हणाल्या , "अग काय हे शुभ्रा "? हे तुझं नेहमीच झालंय तुला त्या Laptop मधून वर बघायला ही वेळ नाहीये . तुम्ही त्या Projects आणि Deadlines मध्ये सगळंच विसरुन जातात का ग ? तूला तुझं personal life पण काही आहे की नाही.
शुभ्रा अगदी वैतागून " अग आई तसं नाही ग , पण मी तरी काय करु ? आज Project ची Deadline आहे . खूप Pressure आहे कामाच शुभ्रा अगदी वैतागून रडवेल्या आवाजात म्हणाली...
हे सगळं बोलणं ऐकून शेजारच्या रूम मधून आजी शुभ्रा , राधा आवाज देत बाहेर आली... अग काय हे सकाळी सकाळी हा कसला गोंधळ ? आजी ने शुभ्रा आणि‌ राधाला विचारले .
राधाकाकू : (आजीला उद्देशून ) काही नाही हो आई , आपलं नेहमीचच , लग्नाला कुठली साडी नेसावी... म्हणून शुभ्राला विचारावं म्हंटल तर हिला कसला वेळ ...
आजी : अग मग चिडतेस काय ? यात तिची तरी काय चूक ? तिचे आॅफिस चे काम चालले असणार ...
राधाकाकू : आपण‌ समजून घेतोच हो आई , प्रत्येक वेळेस ...पण‌ आता अगदी कहरच झालायं शुभ्रा दिवसेंदिवस खूपच busy होत‌ चाललीय . सारखं ‌ते आपलं काम , काम‌ आणि तो‌ Laptop .
आजी : तूझही खरंच आहे राधा , आई म्हणतेय ते काही ‌खोट नाही हं शुभ्रा . Job लागण्याआधी अगदी अवखळ , स्वच्छंद मनाने हसणारी , बागडणारी , घरातील प्रत्येक गोष्टीत रस घेणारी , बाबांची काळजी करणारी , आजीने औषध वेळेवर घेतलंय की नाही ते बघणारी , शुभ्रा आता घरात आहे की नाही असं होतं .
आता मात्र आई च‌ बोलणं मनावर न घेणारी शुभ्रा‌ आजी च बोलणं ...कान‌ देऊन ऐकत होती , आणि आजीच्या अनुभवी नजरेने ते टिपले सुद्धा. ... आजी शुभ्राच्या शेजारी जाऊन बसली . शुभ्रा आजीकडे बघत म्हणाली , "हो ग आजी खरंय तुझं म्हणणं , मला कळतंय ग हे सगळं पण office च्या‌ गडबडीत मला वेळं मिळणं impossible आहे ".
आजी : तूला सगळं कळतंय शुभ्रा , पण तूला ते वळत‌ नाहीये . तुला एखादी गोष्ट ‌मनापासून करायची‌ असेल तर त्यासाठी तू नक्कीच वेळ काढू शकते. ते वेळेच्या नियोजनासाठी कुठला बरं शब्द वापरता तुम्ही...
शुभ्रा : Time Management ग आजी.
आजी : हा हा तूझ्या भाषेतल बाई तेच . त्याचीच खूप गरज आहे बघ तूला..‌अग माणसाने कस‌ं अगदी आनंदाने , निर्धास्तपणे आयुष्य जगावं.
शुभ्रा : Enjoy your life अस म्हणायचंय का तूला ?
आजी : हो तेच ग बाई . मला‌ मेलीलां‌ कसलं येतय‌ ते तुमचं इंग्रजी .अगं शुभ्रा तुम्ही तूमचे काम करुन , नोकरी करून बाकीच्या गोष्टींना देखील वेळ दिला पाहिजे. आयुष्यातील इतर गोष्टींचा देखील आनंद घेता आला पाहिजे.
फक्त काम एके काम आणि तूझा तो Laptop याला ग काय अर्थ आहे ? तूमच्या आजकालच्या पिढीचं बाई मला काही ‌कळत नाही. सारख ते आपलं घड्याळाच्या काट्यावर पळायचं
शुभ्रा : " वो तुम्हारा जमाना अलग था , आजी , आजकल के जमाने मैं ऐसा‌ नहीं चलतां"
Cool down....
आजीने वैतागलेल्या नजरेने शुभ्राकडे बघितलं तसा‌‌ तिने शब्द आवरता घेतला बात तो सही हे आजी ,अग खरंच नेहमीच आम्ही घड्याळाच्या काट्यावर पळत असतो.
आजी : अग पाच पाच मिनिटांला घड्याळाकडे ‌बघत‌ असतात तुम्ही.‌ तुम्हाला कुठे जायचं असेल , घरी कोणी आलं असेल तर वेळ च नसतो . मेल पोटभर बोलता ही येत नाही
तुमचं आपलं नेहमीचच मला वेळ नाही ,‌ मला उशीर होतोय .
अगं माणस‌ ही जोडली जातात ती खरी संवादामुळे ‌आणि बोलण्यातूनच , नाती टिकतात‌ ती खरी संपर्क वाढल्यानेच .आमच्या काळात कसं मला माझी एखादी मैत्रीण भेटली की आम्ही तास न तास गप्पा मारत असू , तसं तुमच्या आजकालच्या पिढीला मित्रमैत्रिणींना सोबत गप्पा मारायला वेळच‌ कुठेय . तूम्ही मात्र त्या मोबाईल वर मित्रमैत्रिणी जोडतात म्हणे . ...
शुभ्रा : social media वर ग आजी Facebook , what"s app , Instagram त्यावर भरपूर friends असतात आम्हाला .
आजी : कसले ग हे तूझे मित्रमैत्रिणी ? त्यांना तरी वेळ असतो का बोलायला ? मनातल्या गोष्टी सांगायला ? फक्त आपलं काय ते Mobile वर मॅसेज करत असतात . आजकाल तूम्ही त्या लग्नसमारंभात पण धावपळ करण्यासाठी पण मुलं मुली बोलवतात म्हणे .
शुभ्रा : अग Event management चे लोक असतात ते .
आजी : अग पण‌ काय त्याचा उपयोग , पूर्वीच्या काळी ‌कस घरात एखादा लग्नसमारंभ असेल तर काका , काकू, मामा‌ , मावशी, आत्या , सगळे एकत्र यायचे आणि ही कुटुंबातील सगळी मंडळी धावपळ करायची...अगदी आनंदाने सगळे एकत्र येऊन ते कार्य पार पाडायचे . त्यामुळे घरात एक मस्त खेळत वातावरण निर्माण होऊन चांगले संबंध तयार होत असत .
मी काही असं म्हणत नाही तुम्ही लोकांनी तूमची काम सोडून अगदी आमच्या सारखं च करावं . पण जस‌ शक्य असेल ‌तसा थोडा वेळ काढला पाहिजे...आणि याच लहान लहान गोष्टींमध्ये खरा आनंद असतो शुभ्रा.
शुभ्रा : हो ग आजी मला माझ्या ‌लहानपणीची आठवण झाली... लहानपणी एकदा स्वराली मावशीच्या लग्नाला गावाला गेलो होतो आपण ...खूप मजा आली होती...मला त्याची आठवण झाली .
आजी : अग‌ हेच नाही शुभ्रा‌...आपल्या कडे अवगत ‌असलेल्या कलेतून सुद्धा आपण‌ छान आनंद घेऊ शकतो . विरंगुळा म्हणून तुम्ही मुली त्या Mobile मध्ये बघण्यापेक्षा तूम्हाला आवडणाऱ्या कलेत वेळ घालवून त्याचा आनंद घेऊ शकतात .
शुभ्रा : अग हो आजी , मी तर भरतनाट्यम पूर्ण शिकली आहे , संगीत विशारद आहे . शाळा , कॉलेज मध्ये मी स्टेज दणाणून सोडणारी , भरघोस बक्षिसे मिळवणारी...
इतक्यात टक, टक , टक दरवाजा वाजतो आणि शुभ्राचे बाबा येतात...राधा , आई अग अजून आवरलं नाही तुमचं , किती वाजलेत बघा ! (पून्हा एकदा घड्याळाकडे लक्ष ) उशीर होतोय आपल्याला . मग शुभ्राची आई , आजी आणि बाबा लग्नासाठी निघून जातात .
आजीच्या विचारांमध्ये हरवलेल्या शुभ्राला अचानक आठवण येते ती office time सुरू झालंय त्याची आणि शुभ्रा आपल्या कामाला लागते .
दुपारी एक वाजता शुभ्राचा Lunch break होतो . सकाळ चे आजी चे बोलणे शुभ्रा ने अगदी मनावर घेतले होते . जेवण करत असतांना देखील शुभ्राच्या मनात हा विचारांचा गदारोळ चालूच होता . शुभ्रा विचार करत होती , खरंच एके काळी शाळा , कॉलेज मध्ये भरतनाट्यम आणि गायनाच्या स्पर्धांमध्ये ती नेहमीच भाग घेत होती . तिच्या भरतनाट्यम च तर‌ सगळीकडे खूपच कोडकौतुक होत होतं . अगदी तासनतास भरतनाट्यमच्या रियाजात कुठे निघून जात हे देखील तिला कळत नसे .
तसेच बाबांसोबत सकाळी योगा करणे , फिरायला जाणे हा देखील तिचा आवडीचा भाग !
आज शुभ्राला खरंच वाटत होते , मी एका नामांकित कंपनीत भल्या मोठ्या पगाराची नोकरी करतेय , पण खरंच या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद , कलेतून मिळणारा आनंद मी गमावून बसलीये का ? आपण फक्त पैशाच्या आणि वेळेच्या मागे धावतोय , पण खरंच यात Satisfaction आहे का ?

" जिंदगी लंबाईसे नहीं , गहराईसे नापनी चाहिए ! "
असं म्हणत शुभ्राने दुसऱ्या दिवसापासून च आपलं Lifestyle च change केलंय . पून्हा आधी सारखं सकाळी उठून बाबांसोबत योगा करणं , फिरायला जाणं हे सगळं तिने सुरू केलं . तसंच भरतनाट्यम् आणि गायनाचा रियाज देखील तिने वेळ मिळेल तसा चालू केला .
आॅफिस च्या कामांमध्ये रसभंग झालेलं आयुष्य आता जणू काही सप्तरंगी उधळण करणाऱ्या इंद्रधनुष्यातल्या सात रंगांप्रमाणे बहरून निघालं होतं .
अशिक्षित आजी च्या बोलण्याला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या शुभ्राला मात्र आता त्यातले तथ्य कळाले होते .
... खरंच आपल्याही आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनुतल्या रंगांप्रमाणे विविध रंगांच महत्व आहे का ?


लेखिका :- स्नेहल सुर्यवंशी