Feb 24, 2024
वैचारिक

वेगळा संसार

Read Later
वेगळा संसार

"ए, मी आपल्या लग्नानंतर तुझ्या आई -वडीलांच्या सोबत राहणार नाही हा. मला आपला संसार स्वतंत्र हवा. लुडबुड नको कुणाची!" मिथिला गाडीत बसत म्हणाली. हे ऐकून 'आता हे काय नवीनच?' अशा नजरेने मिहिर तिच्याकडे पाहू लागला.
चार वर्षांच्या रिलेशनशिप नंतर, अखेर एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय मिहिर आणि मिथिलाने नुकताच घेतला होता.
मिथिलाच्या घरी हे लग्न मान्य होते. पण आता मिहिरच्या आई- बाबांची म्हणजेच, उषाकाकू आणि विकासरावांची परवानगी महत्वाची होती. मिहिरचे आई -वडीलही मिथिलाला भेटायला उत्सुक होते. त्यासाठीच दोघेही मिहिरच्या आई - वडिलांकडे, गावी चालले होते.

"असा काय बघतो आहेस?" मिहिरची तंद्री मोडत, आपली साडी ठीक करत, मिथिला सीट बेल्ट
बांधून नीट बसली.
मिहिरच्या आग्रहाखातर ती आज साडी नेसली होती. "आज पहिल्यांदाच आई -बाबांना भेटणार आहेस. मग जीन्स -पँट अजिबात घालू नकोस", असे म्हणत, मिहिरने तिला साडी नेसून यायला सांगितले होते.
फिकट गुलाबी रंगाच्या साडीत आज मिथिला इतकी सुंदर दिसत होती की, तिचे हे बोलणे ऐकूनही मिहिरला तिच्यावर ओरडावेसे वाटेना.
"बघु पुढचे पुढे ", असे म्हणत, त्याने खांदे उडवत गाडी सुरु केली.

गावाकडचा तासा दीड-तासाचा, वळणावळणाचा रस्ता, निसर्ग सौंदर्य पाहून मिथिला पार हरकून गेली. मोठाले, उंच डोंगर, त्यातून वाहणारे धबधबे, खोल दऱ्या, हिरवीगार झाडी.. हे पाहून मिथिलाला गाडीतून उतरून सेल्फी घेण्याचा मोह काही आवरला नाही. सारखी सारखी गाडी थांबवून मिहिर मात्र पार वैतागला. त्यामुळे गावी पोहोचायला दोघांना उशीर झाला. दुपारच्या जेवणाची वेळही टळून गेली.

मुलांची वाट पाहणारे मिहिरचे आई -बाबा दोघांना पाहताच एकदम पुढे आले. 'आपली होणारी सून पहिल्यांदाच घरी आली.' त्यामुळे मिथिलाचे अगदी छान ओवाळून स्वागत केले त्यांनी. मिहिर आणि मिथिला आई -बाबांच्या पाया पडून घरात आले.

मिहिरचे घर इतके प्रशस्त आणि सुंदर होते की, मिथिला पाहताक्षणी घराच्या प्रेमात पडली. मोठी बैठकीची खोली, स्वयंपाकघराची सुंदर रचना, तीन मोठ्या, मोठ्या बेडरूम, परसदारची जागा तर भली मोठी! मिहिरने वर्णन केल्याहून, घर अधिकच सुंदर होते.

मिहिरचे आई -वडीलही स्वभावाने अगदी छान होते. लवकरच मिथिला आणि बाबांची छान गट्टी जमली. राजकारणापासून ते स्वयंपाकापर्यंतच्या साऱ्या गोष्टी बाबांना कशा माहिती, याचे राहून- राहून मिथिलाला फार आश्चर्य वाटू लागले.
मिहिरच्या आईही स्वभावाने प्रेमळ, शांत होत्या.

आता जेवणाची वेळ टळून गेली असली, तरी आईंच्या आग्रहाखातर मिथिला पोट भरून जेवली. कोकणी पद्धतीचा, चविष्ट स्वयंपाक मिथिलाला मनाने आईंच्या जवळ घेऊन गेला.

जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन चौघेही समुद्र किनाऱ्यावर भटकून आले. तिथल्या वातावरणाने मिथिला अजूनच भारावून गेली. श्रावणातला ऊन - पावसाचा खेळ, दूरवर पसरलेला अथांग समुद्र, समुद्रात झेपावणारे पक्षी.. मिथिला मन भरून पाहत होती.

"मिथिला.."

"हा आई".. मागून आलेल्या हाकेने ती भानावर आली आणि आपसूकच तिच्या तोंडून 'आई ' हा शब्द निघून गेला. हे ऐकून उषा काकुंच्या चेहेऱ्यावर क्षणभर समाधानाची भावना तरळली. स्वतःला सावरुन त्या पुढे म्हणाल्या, "थोडं बोलायचं होतं."

"बोला आई.." मिथिला खाली वाळूवर बसत म्हणाली.

"मिथिला, आम्हाला 'सून' म्हणून तू पसंत आहेसच. आमच्या लेकाची पसंती तिचं आमची..आणि तुझ्यात नकार देण्यासारखे काहीच नाही. लग्नाचा निर्णय विचार करून घेतला आहे ना दोघांनी? हे नाते केवळ नवरा -बायकोचे नसते, लग्न म्हणजे दोन कुटुंब जोडली जातात गं, तुझ्या आई -वडिलांशीही बोलावं लागेल आम्हाला. भेटून पुढची बोलणी करावी म्हणतो आम्ही दोघेही. येत्या रविवारी आम्ही येतो आहोत असा निरोप देशील घरी?" आणखी बरेच काही बोलत होत्या उषा काकू.

मन लावून आपल्या होणाऱ्या सासुबाईंचे बोलणे ऐकणारी मिथिला नकळत सासुबाईंच्या चेहेऱ्याचे निरीक्षण करत होती. त्यांचा गोरा पान चेहरा, शांत, समंजस बोलणे अगदी मिहिरसारखेच होते. तिला आपल्या सकाळच्या बोलण्याची लाज वाटू लागली. 'मला लग्नानंतर तुझ्या आई -बाबांसोबत राहायचे नाही. आपला वेगळा संसार हवा'.
नाती समजून घेण्याआधीच, मी अशी कशी काय बोलले!' मिथिलाच मन व्याकूळ झालं.

इतक्यात पावसाची सर आली आणि सगळेच गाडीकडे पळाले.

घरी पोहोचेपर्यंत रात्र झाल्याने मिहिर आणि मिथिलाला आई -बाबांच्या आग्रहाखातर गावीच मुक्काम करावा लागला. पुन्हा एकदा आईंच्या हातच्या जेवणानंतर मस्त गप्पा रंगल्या आणि मिथिलाला लग्नाआधीच सासरी येण्याच्या स्वप्नात, कधी झोप लागली कळालेच नाही.

सकाळी निघताना सासुबाईंनी मिथिलाला प्रेमाने जवळ घेतले आणि साडी देऊन तिची ओटी भरली. सासरच्या प्रेमाने भारावलेली मिथिला शहरात आली तरी, तिच्या मनातून गावाकडची आठवण जातच नव्हती.

ठरल्याप्रमाणे उषा काकू आणि विकासराव मिथिलाच्या आई -बाबांना भेटून गेले. त्यांचीही मन जुळली आणि साखरपुड्याचा जवळचा, तर महिन्याभरात लग्नाचा मुहूर्त ठरलाही!

साखरपुडा दणक्यात पार पडला.

आता लग्नघाई सुरू झाली. मिथिलाच्या साऱ्या साड्या तिच्या सासुबाईंनी घेतल्या,अगदी तिच्या  मिथिलाच्या पसंतीच्याच!
हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येत होता. तसा तयारीला जोर येऊ लागला. आता मिथिला आणि मिहिरने ऑफिसला सुट्टी टाकली.

सीमांत पूजनाचा दिवस उजाडला. कार्यालयात 'मुलाकडील'  मंडळींचे जोरदार स्वागत झाले. एकमेकांकडील नातेवाईकांच्या भेटी-गाठी झाल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता लग्नाचा मुहूर्त साधायची गडबड सुरू झाली.
आधुनिक काळात वावरणारी मिथिला स्वतः चेच सजलेले पारंपारिक रुप आरशात पाहून आनंदीत झाली. मिहिरही खूप खुश होता आणि उषा काकुंच्या डोळ्यातुन हा साजरा होणारा सोहळा पाहून आनंदाश्रू वाहत होते.

लग्न पार पडले, जेवणावळी पार पडल्या. पाठवणीची वेळ आली. मिथिलाने आपल्या माहेरच्या मंडळींची गळाभेट घेतली आणि आनंदाने ती आपल्या सासरी जायला निघाली.
मिथिलाचे आई -वडील खूप खुश होते, इतके साजरे सासर मिळाले होते तिला!

गावी आल्यानंतर, सासरी मिथिलाचे जंगी स्वागत झाले आणि माप ओलांडून ती आपल्या हक्काच्या घरी आली.
पूजा, देवदर्शन झाल्यानंतर मिहिर आणि मिथिला दोघे आठ दिवस मधुचंद्र साजरा करून आले.

मिथिला हळूहळू सासरी रुळू लागली. महिन्याभरात तिने आपल्या सासुबाईंकडून बऱ्याचशा गोष्टी शिकून घेतल्या. दोघींचं इतकं छान सुत जुळलं की 'अहो आई' वरून 'ए आई' अशी हाक देऊन मिथिला आपल्या सासूबाईंना बोलावू लागली.

महिन्याभराची सुट्टी संपत आली तशी मिहिरने शहरात जायची तयारी सुरू केली. मिथिलानेही आपले पॅकिंग केले आणि सासुबाईंच्या मागे लागली, 'तुम्ही दोघेही आमच्या सोबत चला म्हणून.'
तशा सासुबाई म्हणाल्या, "अगं शहरात करमत नाही आम्हाला. इथे किती व्याप आहे पाहिलंस ना? सांभाळणार कोण इथलं सारं? आणि तुमचा राजा -राणीचा नवा संसार. आमची लुडबुड नको गं त्यात. तसेही आम्ही येत जाऊ अधून मधून. तुम्ही मात्र दर आठवड्याला, सुट्टीला येत जात राहा."
"आई, असे काय म्हणता?" आपल्या माणसांची लुडबुड होते का कुणाला? मलाच करमायचे नाही तुमच्याविना. तिथे आमचा जॉब आहे म्हणून, जावं तर लागेलच. नाहीतर इथेच राहिलो असतो ना आम्ही. तिथे राहू आपण सगळे एकत्र."

पण सासुबाई काही मिथिलाचे ऐकायला तयार होईनात. आता मिथिलाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. 'मायेचं सासर सोडून जायचं म्हणून.'
तिला अशी पाहून मिहिर हळूच म्हणाला," तुलाच राहायचं नव्हतं ना सासू -सासऱ्यांच्या सोबत? वेगळा संसार हवा होता ना? झालं ना आता मनासारखं?"

मिहिरचे बोलणे ऐकून मिथिलाला आपल्याचं बोलण्याची कीव वाटू लागली. 'असं भाग्याचं सासर सगळ्यांच्या नशिबात नसतं! सासू- सासऱ्यांची मनं जाणून घेण्याआधीच मी निर्णय घेऊन मोकळी झाले होते. खरा आनंद तर आपल्या माणसात राहून मिळतो.'

तिने मिहिरला डोळ्यांनीच सॉरी म्हंटले आणि निघताना आठवड्याच्या सुट्टीत शनिवारी- रविवारी येण्याचे निश्चित करत, मिथिलाने भरल्या डोळ्यांनी आपल्या सासू -सासऱ्यांचा निरोप घेतला. गाडीत सामान भरताना तिला आरशात सासुबाईंचे प्रतिबिंब दिसले, त्याही आपल्या पदराने डोळे पुसत दारात उभ्या होत्या.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//