वेगळ्या जगातील नातेवाईक ( भाग तिसरा )

दुधाच ऋण खूप मोठं असतं हे फक्त प्राणीच जाणतात.


वेगळ्या जगातले नातेवाईक (  भाग तिसरा )

विषय: नातीगोती

प्लॅटफॉर्मवर खूप गोंधळ उडाला होता. सगळी इकडची तिकडची कुत्री जमा झाली होती आणि त्याला जे धक्काबुक्की करत होते त्यांच्या अंगावरती बेभानपणे धावून जात होती. हे दृश्य खूप अपूर्व होतं.

काही कुत्र्यांना हे कसं कळलं कुणास ठाऊक. त्यांच्या पैकी काही कुत्री ज्यांनी पाकीट मारलं होतं त्या चोरांना  जागेवरून अजिबात  हळू देत नव्हती.  सगळे कडे धुरळा  आणि कुत्र्याचं भुंकण  याचा नुसता गोंधळ उडाला होता. कोणाचाच आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. त्याला ज्यांनी हात लावला होता त्यांची अवस्था तर पाहावली जात नव्हती. माणसांचं तर तिथं काही कामच नव्हतं. त्या कुत्र्यांना कोणी समजावून सांगितले नव्हतं. तरी सुद्धा सगळी एकजूट होऊन त्या दोन-तीन लोकांवर तुटून पडली होती.

थोड्या वेळाने पोलीस आले. गार्ड आला. ड्रायव्हर आला. त्या पाकिटमारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पाकिटाची ओळख पटवून ते पाकीट त्याला दिलं आणि हा गोंधळ एकदाचा थांबला. गाडी पुन्हा पुढे चालायला लागली.

त्या वेळी आम्हा सगळ्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळालं की, त्याने खरोखरच एका वेगळ्या जगातल्या प्राण्यांशी नातं जोडलं होतं.

दुसऱ्या दिवशी तो तसाच हसऱ्या नजरेने, प्रसन्न मुद्रेने गाडीच्या दरवाजा जवळ उभा राहून कुत्र्यांना बिस्कीट खाऊ घालत होता. त्यावेळी मी त्याच्याजवळ गेलो. त्याला मुद्दामून ओळख दाखवून नमस्कार केला.  त्याला विचारलं ,"काल काही तुम्हाला लागलं तर नाही ना  ? " तो सहज हसला आणि म्हणाला,"  प्रत्येक स्टेशनवर माझे इतके मित्र असताना, मला कोणी हात तरी लावू शकेल काय  ? माझ त्याच्या विषयी कुतूहल जागृत झालं. मी त्याला विचारलं की," हे प्राण्यांबद्दल प्रेम तुमच्या मनात कसं काय निर्माण झालं ?" तेव्हा अचानक तो गंभीर झाला आणि सांगायला लागला.

" खरं सांगू का जोशी, मला अगोदर ही भटकी कुत्री अजिबात आवडत नसत. पण माझी मुलगी, तिला मात्र या कुत्र्यांची खूप आवड होती. एकदा तिने शाळेजवळच रस्त्यावरच एक छोटसं पिल्लू घरात आणलं. त्याला छान दूध  पाजलं. त्याचं नावं देखील तिनं ठेवलं होतं. झोपायला जुन्या कपड्याची गादी तयार केली. आणि मी येईपर्यंत त्याला ते कुरवाळत राहिली. त्याचे लाड करत राहिली. तिला वाटलं मी आल्यावर मला या गोष्टीचा खूप आनंद होईल. पण झालं उलटच. मी तिला खूप रागावलो . ते कुत्र ताबडतोब शाळेजवळ सोडण्यास सांगितले.
या गोष्टीला कितीतरी वर्ष उलटली. आम्ही ते पिल्लू विसरूनही गेलो होतो.
एके दिवशी संध्याकाळी ती शाळेतून येत असताना काही साखळी चोरांनी तिची साखळी चोरली. आसपास कोणीच नव्हतं. तरी तिने चोर चोर असं ओरडायला सुरूवात केली. अचानक त्या चोराच्या मागे काही कुत्री लागली.  त्या चोराला त्या कुत्र्यांनी पुढे जाऊच दिल नाही. शेवटी तर त्या चोराने तिला तिची साखळी परत दिली. तेंव्हाच कुत्र्यांनी त्याला सोडलं. तिला त्या कुत्र्यांमध्ये एक ओळखीचा कुत्रा दिसला. तिने त्याला जे नाव दिलं होतं त्या नावाने  सहज हाक मारली. त्यावर तो कुत्रा तिच्याजवळ येऊन शेपूट हलवायला लागला. तो तोच कुत्रा होता. ज्याला तिने फक्त एकदाच घरी आणून दूध दिलं होतं. आणि परत सोडून दिलं होतं. पण  त्या दुधाला तो जागला होता. माझ्या मनाला ही गोष्ट खूप स्पर्शून गेली. एक दुधाचे  एवढं मोठं ऋण असते ही गोष्ट माझ्या कल्पनेच्या पलीकडली होती. तेव्हापासून मी ठरवलं जर निरपेक्ष प्रेम हव असेल तर ते याच प्राण्यांपासून मिळेल" आणि असं बोलून तो हसत हसत दरवाजाला लटकला.

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all