वेगळं राहायचं भारीच सुख!!(भाग ५ अंतिम)

वेगळं राहिल्याशिवाय एकत्र कुटुंबाचे महत्त्व कळत नाही.


मुलांना ठेवून सीमा आणि सुरेश सगळ्यांचा निरोप घेवून निघाले. आज पहिल्यांदा सीमाला सासरची इतकी ओढ वाटत होती.

घरापासून दूर नसती गेली तर तिला घराची आणि घरातील माणसांची किंमत कधीच कळली नसती. हेही तितकेच खरे.

घरुन आल्यापासून सीमा शांत शांत वाटत होती सुरेशला.

"काय ग काय झालंय आज. इतकी शांत का?"

"काही नाही. वाटलं होतं निदान कोणीतरी म्हणेल तरी, मुलांना सुट्टी आहे, आजच्या दिवस तरी राहा म्हणून. पण आता कोणालाच आपले घेणेदेणे नाही राहिले. सगळंच बदललं हो आता घरी."

"हो बदलणारच ना, कारण एकेकाळी आपणही बदललोच होतो ना. मग ते बदलले तर कुठे बिघडले? आपण अचानक जेव्हा घर सोडले तेव्हा त्यांनाही काहीतरी वाटलेच असेल ना. हा पण विचार कर जरा थोडा."

"जावू द्या तुम्ही तेव्हाही त्यांचीच बाजू घेत होतात आणि आताही तेच करत आहात."

"मी त्यांची बाजू नाही घेत, मी खऱ्याच्या बाजूने आहे आणि नेहमी असेल. कारण तुला नेहमी तुझेच खरे वाटत असते आणि इतर सगळे चुकीचे. आता  त्यांनी तुला राहा म्हणावं, ही तुझी अपेक्षा साफ चुकीची नाही का? पण एवढे मात्र खरे, तू स्वतःबरोबरच माझे आणि मुलांचे पण खूप हाल केलेस. तुला जे वाटते ते तू साध्य केलेस पण एकदाही आमच्या मनाचा विचार नाही केलास."

"चुकलं हो माझं. खरंच चुकलं. बऱ्याच गोष्टी आज क्लिअर झाल्या पण."

"नशीब माझे तुला तुझी चूक तरी समजली. एका दृष्टीने बरंच झालं नाही, आपण घर सोडलं ते. नाहीतर आयुष्यभर पुन्हा मलाच ऐकावे लागले असते."

"असं काही नाहीये ओ. पण मी ना आतापर्यंत नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करत होते. पण आता नाण्याची दुसरी बाजूही क्लिअर झालिये आता मला. सुरुवातीला एकत्र कुटुंबाचे आकर्षण मलाही होते पण स्वतः जेव्हा त्यात पडले तेव्हा मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली गुदमरून कधीतरी अंत हा निश्चित, असे वाटायचे. मोकळा श्वास घ्यावा असे वाटत असले तरी तो घेता यायचा नाही कधी. म्हणून मग माझी चिडचिड व्हायची."

"पण आता तर हवा तेव्हा आणि हवा तितका मोकळा श्वास घेतेसच की तू. तरीही तुझी चिडचिड काही थांबलेली दिसत नाही."

"सगळे मान्य आहे ओ. पण आता हा मोकळा श्वास सुद्धा नकोसा झालाय. कारण खरंच तो घ्यायला तरी वेळ आहे का? हा प्रश्न नेहमी सतावत असतो मला."

"चला म्हणजे एकंदरीतच तुला त्याची किंमत समजली. हे खूप बरं झालं."

"अहो, एक गोष्ट स्पष्टच बोलू..?"

"बोल की, कदाचित त्यात देखील तुझेच भले असेल."

"आपण जावूयात का ओ पुन्हा घरी? म्हणजे मान्य आहे मला की मी खूप मोठी चूक केली आहे पण मी तयार आहे माझी चूक सुधारायला."

"सीमा, सगळं इतकं सोप्पं आहे का ग? मनात आलो वेगळं झालो आता पुन्हा मनात आलं की पुन्हा एक व्हायचं? तुला पटत असेल हे पण मला नाही योग्य वाटत. तिकडे गेल्यावर पुन्हा तुला वाटले आणि पुन्हा तू म्हणालीस की वेगळे राहत होतो तेच बरं होतं. तर मग तेव्हा मी काय करायचं? आता जर घरी गेलो तर ते कायमचं. बघ मान्य असेल तर मी तयार आहे नाहीतर जे सुरू आहे तेच राहू दे."

"आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा नाही होणार ओ. आताच्या या परिस्थितीने खूप काही शिकवलंय मला. संपूर्ण जीवनाचा धडा शिकले आहे मी त्यातून. त्यामुळे  थोडा तरी विश्वास ठेवा ओ माझ्यावर."

"बरं यावेळी ठेवतो विश्वास तुझ्यावर पण आता लगेच नाही जावू शकणार आपण घरी. एकाच वर्षात मुलांच्या शाळा किती वेळा बदलणार आपण.? त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण तरी होवू दे आधी. त्यानंतर विचार करु. चालेल?"

पुढे मग मुलांच्या परीक्षा संपल्या आणि सीमा व सुरेश पुन्हा एकदा घरी परत आले.

घरच्यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केले. कारण वेगळं राहण्यात खरं सुख आहे की एकत्र राहण्यात?हे आता सीमाला देखील कळून चुकले  होते.

सासूबाईंना मात्र या गोष्टींची आधीच कल्पना होती. म्हणून तर त्यांनी सुरेशला त्यावेळी बायकोचे ऐकण्याचा सल्ला दिला होता. शेवटी मोठ्या माणसांचे अनुभव दांडगे असतात.

शेवटी शून्यातून सर्व उभे करताना काय त्रास होतो याची जाणीव नसल्यामुळे काहीवेळा चुकीचे निर्णय घेतलेही जातात. पण त्याच एका निर्णयातून सीमाला आता मोठा धडा मिळाला होता. 

एकत्र कुटुंब पद्धतीत "काम" आणि "खर्च" या मुख्य दोन गोष्टीवरून नेहमी वाद होत असतात. पण एकत्र असताना हातचे राखून वागणारे लोक वेगळे झाल्यावर मात्र दोन्ही गोष्टींचा अजिबात विचार करत नाहीत.

जर एकीने काही गोष्टी केल्या तर असाध्यही मग साध्य व्हायला वेळ लागणार नाही. परंतु काही लोकांना एकट्याने जगण्यात जी मजा वाटते ती एकीने जगण्यात वाटत नाही. आणि हाच प्रगतीतील मोठा अडसर ठरतो.

शेवटी याबाबतीत प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळाही असू शकतो. परंतु आताच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धतीचे तोटे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात; हे सत्यही नाकारता येणार नाही. फक्त एकमेकांना समजूत घेतले की मग जगणे कसे सोप्पे होवून जाते. पण अनेकदा ह्याच गोष्टीचा अभाव जाणवतो नि लोक विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

समाप्त.

सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. चुकून जर काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

धन्यवाद

©® कविता वायकर



 

🎭 Series Post

View all