Feb 24, 2024
वैचारिक

वेग

Read Later
वेग
वेग.....
" अरे जरा हळू गाडी चालव ना.. गाढवा मी पडेन ना.." स्वाती विराजवर ओरडत होती.. तिचे ओरडणे ऐकून तो मुद्दाम जोरात गाडी चालवत होता..पूर्ण वेळ स्वाती जीव मुठीत घेऊन बसली होती.. घरी पोचल्यावर तिने आधी विराजचे कान धरले आणि तिच्या नवर्‍याला निनादला हाक मारली.. "काय झाले ओरडायला? आलीस ना खरेदी करून?
" या तुझ्या मुलाला समजव आधी.. किती वेगात बाईक चालवतो.. जाताना हळू नेली.. आणि येताना.. बापरे.. एका हातात सामान आणि दुसर्‍या हातात जीव घेऊन बसले होते मी.." तिचे बोलणे ऐकून दोघेही हसायला लागले.." आई ८० च्या स्पीडने चालवत होतो मी.. तो काही जास्त आहे का? आणि प्लीज आता कान सोडशील का ? नाहीतर माझा लंबकर्ण व्हायचा. आणि तू अनऑफिशियली ज्या नावाने बोलवतेस ते माझे ऑफिशियल नाव व्हायचे.."
"बोलण्यात तू कोणाला ऐकणार आहेस का?" स्वातीचा राग थोडा कमी झाला आहे हे पाहून निनादने विराजला खूण केली ते पाहून विराज तिथून सटकला.. यावर स्वाती काही बोलणार त्या आधी निनादने सुरुवात केली.."स्वाती चिडू नकोस ग सतत.. अग पण तो खरेच खूप चांगली गाडी चालवतो.. मी पण बसलो आहे त्याच्यासोबत.. आणि हो तो माझाही मुलगा आहे आणि मला त्याची काळजी आहे.." स्वातीला खूप काही बोलायचे होते.. पण मग " तुम्ही बापलेक मिळून गोंधळ घाला, मला काही सांगायला येऊ नका," असे पुटपुटत ती तिथून निघून गेली.. ती गेलेली पाहताच बाहेर लपलेला विराज आत आला.." बाबा , आई खूपच चिडली का?"
" तू तरी ती सोबत असताना कशाला एवढ्या फास्ट गाडी चालवलीस?"
" बाबा, मला फक्त तिला दाखवून द्यायचे होते कि या स्पीडने गाडी चालवली कि काही होत नाही.. सॉरी.."
" सॉरी,मला नको. तिला बोल.. ती चिडली आहे.."
" आई, प्लीज माफ कर ना.. मी परत नाही एवढ्या वेगात गाडी चालवणार.."
" काय फायदा? आता सॉरी बोलशील. आणि खाली जाऊन परत तशीच गाडी चालवशील.."
" नाही आई.. प्रॉमीस.. नाही फास्ट चालवणार.."


स्वाती, निनाद आणि विराज एक मध्यमवर्गीय त्रिकोणी कुटुंब.. निनादचा एक छोटासा व्यवसाय होता. त्यातून ते खाऊनपिऊन सुखी होते.. स्वातीला मात्र लहान मुलांची फार आवड, त्यामुळे तिने मात्र विराजच्या जन्मानंतर स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घेतले. विराजच्या जन्मावेळी झालेल्या काही गुंतागुंतीमुळे तिला परत बाळ होऊ शकले नाही.. त्यामुळेच विराज हा तिच्यासाठी सर्वस्व होता.. तिने विराजला वेळ देता यावा यासाठी आपली नोकरी सोडली. तो शाळेत जायला लागल्यावर तिने निनादला त्याच्या कामात मदत करायला सुरुवात केली पण ते ही विराजच्या वेळा सांभाळून.. आणि विराज.. तो तर एक खूपच चांगला मुलगा होता.. आईबाबांवर भरपूर प्रेम, निस्वार्थी स्वभाव, त्यामुळे भरपूर मित्रमैत्रिणी, शाळेत, कॉलेजात सर्वांचा लाडका.. त्याचा फक्त एकच विक पॉइंट होता.. तो म्हणजे वेग.. त्याला लहानपणापासूनच गाड्या वेगाने चालवायला आवडायच्या.. त्यामुळे सायकलवरून अनेकदा पडलाही होता.. पण ते वेड कमी होण्याऐवजी वाढले होते.. कॉलेजला जायला लागल्यावर त्याने हट्टाने एक जुनी बाईक घ्यायला लावली होती.. जी निनादने त्याला घेऊनही दिली होती.. ती चालवत तो सगळीकडे फिरत असायचा.. आता त्याला हवी होती नवीकोरी स्वतःची बाईक त्याच्या अठराव्या वाढदिवसाला. त्याचे इतर काहीही हट्ट नसल्याने निनादने त्याला प्रॉमीस केले होते.. अर्थातच स्वातीला न सांगता.. कारण स्वातीचा विराजच्या गाडी चालवण्यालाच विरोध होता.. ते तिघेही यावेळेसच्या विराजच्या वाढदिवसासाठी खूप उत्साही होते.. कारण प्रत्येकालाच तो दिवस विशेष पद्धतीने साजरा करायचा होता..

" हॅपी बर्थ डे विराज.." 
" थॅंक यू आई, बाबा.."
" आज तुझ्या सगळ्या मित्रांना आपल्या घरी बोलाव.."
" कशासाठी आई?"
" कशासाठी म्हणजे? आज तुझ्या वाढदिवसासाठी घरी सगळेजण येणार आहेत.. तुझ्या मित्रांचे काही नाटक नको.. म्हणून त्यांनाही घरीच बोलव.."
विराजने नाराजीनेच मान हलवली.. खरेतर त्याला नवीन बाईक घेऊन लॉंग ड्राइव्हला जायचे होते.. पण नंतर कधीतरी हा विचार करून तो गप्प बसला.. निनादने खिशातून चावी काढून विराजच्या हाती देत म्हटले.. "तुझे गिफ्ट तुझी खाली वाट पहात आहे." आता स्वातीच्या कपाळावर आठ्या आणि विराजच्या चेहर्‍यावर हसू होते..  
      संध्याकाळी दणक्यात बर्थडे पार्टी झाली.. पण पूर्ण पार्टीभर विराजचे लक्ष त्या बाईककडे होते.. स्वातीने हा बाहेर जाऊ नये म्हणून गाडीची चावीही लपवून ठेवली होती.. सगळे नातेवाईक गेले.. आणि विराजची मित्रांना गाडी दाखवायची धावपळ सुरू झाली. पण चावी मिळेना म्हणून मग त्याची चिडचिड व्हायला लागली.. निनादला कल्पना होती..
" स्वाती चावी दे.."
" कसली चावी? "
" कमॉन स्वाती.. अग तो अठरा वर्षांचा झाला आहे.. त्याला त्याच्या मित्रांना गाडी दाखवायची आहे.. नको ना आडमुठेपणा करू."
" पण त्याला सांगना आज नको जाऊस.. माझा जीव घाबरा होतोय.."
" आई, अग मी फक्त नाक्यापर्यंत जाणार आणि येणार. आई जाऊ दे ना.. आज माझा वाढदिवस आहे.." निनादने हाताने ईशारा केला.. स्वातीने गुपचूप चावी काढून दिली.. "ऐक ना बाळा, आज नको ना जाऊस.."
" आई, आत्ता जातो आणि एक तासात येतो.. बाय...."

असे सांगून निघालेला विराज स्वतःच्या पावलांनी घरी आलाच नाही. बाहेर पडल्यावर सर्व मित्रांनी सेलिब्रेशन म्हणून बियर घेतली. आणि गाड्यांची रेस लावली.. अंधारात, थोड्याशा नशेत विराजला खालचा खड्डा दिसलाच नाही.. गाडी नवीन आणि वेगात असल्यामुळे त्याला ती कंट्रोल करता आली नाही.. विराज जोरात गाडीवरून फेकला गेला.. आणि जागेवरच त्याचा जीव गेला.. विराजचे मित्र खूप घाबरले होते.. कसेतरी त्यांनी निनादला हि बातमी सांगितली. ते ऐकून निनादच्या हातापायातले बळच गेले.. कोणत्या तोंडाने हि बातमी स्वातीला सांगू हे त्याला कळेना. ती झोपली नव्हतीच.. 
" कोणाचा फोन होता?"
" विराजच्या मित्रांचा.."
" का? काय झाले?"
" काही नाही.. एक छोटासा अपघात झाला आहे.. मी पटकन जाऊन येतो."
" कोणाचा अपघात झाला आहे? मी पण येते तुझ्यासोबत.."
" स्वाती.. प्लीज ऐक ना.. मी येतो म्हटले ना.."
निनाद घरातून निघाला खरा.. पण काय करावे ते त्याला कळेना.. त्याने स्वतःच्या भावाला फोन केला.. पण त्याला बोलताच येईना.. कशीबशी त्याने ती बातमी त्याला दिली.. त्याचा भाऊ ताबडतोब तिथे आला.. आणि मग भावाच्या मदतीने तो विराजला घरी घेऊन आला.. बरेचसे नातेवाईक अचानक जमलेले पाहून स्वातीला काय झाले असावे याचा अंदाज आला. जेव्हा निनाद आला तेव्हा ती फक्त एकच वाक्य पुटपुटत होती..
" तुला सांगत होते, गाडी नेऊ नकोस."
इतरांच्या रडण्यापेक्षा तिचे पुटपुटणे जास्त भेसूर वाटत होते.. स्वाती त्या धक्क्यातून बाहेर येऊच शकली नाही. रात्र रात्र ती विराजची वाट पहात बसायची.. शेवटी झोप येण्यासाठी म्हणून दिलेल्या गोळ्यांची अख्खी बाटली रिकामी करून तिने आयुष्य संपवले.. आणि निनाद.. आपली एक परवानगी आपल्या आयुष्याचे मातेरे कशी करू शकते याचा सतत विचार करत असतो.. आता एका स्वयंसेवी संघटनेसोबत मिळून तो रस्त्यावरचे खड्डे भरत असतो.. एक हसतेखेळते कुटुंब बघता बघता उद्ध्वस्त होऊन गेले.....


हि कथा सत्य घटनेवर आधारित आहे.. आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा या गोष्टी वाचतो, पाहतो.. माझ्याच ओळखीच्या दोघा तिघांबरोबर हे झाले आहे.. रस्त्यावरच्या खड्ड्यांनी आणि बाईकच्या वेगाने अनेक तरूण मुलांचा बळी घेतला आहे. कुठेतरी हे थांबावे असे मनापासून वाटते.. असे म्हणतात जाणारा जातो, पण मागे राहणारा भोगतो.. मृत्यु हा कधीही वाईटच असतो.. पण जेव्हा तो तरूण मुलांचा होतो तेव्हा त्यांचे आईवडील आयुष्यभर जिवंतपणीच मरणयातना भोगत असतात.. वेगावर नियंत्रण ठेवा.. घरी सगळेच आपली वाट पहात असतात..


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.. 
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//