वीरपत्नी (भाग १ ला)

एका वीरपत्नीची हळवी कथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

पहिली फेरी:- कथामालिका

कथेचे नाव:- वीरपत्नी ( भाग १ ला)

©® आर्या पाटील

"वसुधाला काहीच कसं वाटत नाही हे सगळं करतांना. काय म्हणावं या वागण्याला?" अनिता ताई जरा तिरसटपणेच म्हणाल्या.

" याला खंबीरपणा म्हणतात ताई.मला वसुधा ताईंचा खूप अभिमान वाटत आहे." म्हणतांना शेजारी बसलेल्या निता ताईंच्या डोळ्यांत वसुधा ताईंच कौतुक स्पष्ट दिसत होत.

तश्या अनिता ताई वरमल्या.

" खंबीर तर आहे वसुधा. माझ्याने नसता सहन झाला एवढा मोठा आघात.वसुधाने फक्त सहन केलं नाही तर नव्याने उभी राहिली.सुनेची नव्हे नव्हे लेकीची आई झाली." आता त्या ही कौतुक करत म्हणाल्या.

तोच वसुधा ताई बाहेर हॉल मध्ये येऊन पोहचल्या.

"आल्या का गं साऱ्याजणी ? मी कधीची वाट पाहत होते. आता लागा बरं कामाला. हा झोपाळा सजवायचा आहे फुलांनी." हातातील फुलांची टोपली निता ताईंकडे देत त्या हक्काने म्हणाल्या.

"तुम्ही काळजी नका करु काकी आम्ही आलो आहोत आता. फक्त कामं सांगा." रेवाही उत्साहाने म्हणाली.

" रेवा, तु विभाकडे जा पाहू. तिला छान तयार कर.आज डोहाळे जेवण आहे माझ्या लेकीचं. हिरव्यागर्द पैठणीत तिला गर्भारपण ल्यालेल्या धरेसारखी सजव." बोलता बोलता वसुधा ताईंच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

" काकी तुम्ही ठिक आहात ना ?" त्यांना हळवं झालेलं पाहून ती काळजीने म्हणाली.

" मी एकदम ठिक आहे. तु आत जा आणि विभाकडे लक्ष दे." म्हणत त्यांनी डोळ्यांतील पाणी टिपले.पुन्हा एकदा उत्साहाचा शेला पांघरुण त्या आपल्या सुनेच्या डोहाळे जेवणाच्या तयारीत मग्न झाल्या.

सोपवलेल्या जबाबदारीचं दडपण घेत रेवा विभाच्या खोलीत पोहचली.समोर पलंगावर हिरवी पैठणी, गजरे, डोहाळे जेवणाचे दागिने या साऱ्यांची तयारी वसुधा ताईंनी आधीच करून ठेवली होती. विभाला लवकर तयार व्हायला सांगून त्या रूमबाहेर पडल्या होता पण अजूनही विभा तयार नव्हती.

समोरच्या खिडकीत उभी असलेली ती शून्यात नजर लावून विचारमग्न होती.तिला पाठमोरी पाहून रेवाला भरून आले. डोळ्यांतील पाणी डोळ्यांतच टिपत तिने मनाला खंबीर केले.

" विभा, अजून तयार झाली नाहीस. बाहेर सगळे जमले आहेत." तिच्याजवळ जात रेवा म्हणाली.

रेवाला पाहतच विभा भावनिक झाली. रेवा जवळ येताच ती तिच्या कुशीत शिरली. भावनांनी कंठ दाटून आला आणि ती रडू लागली.

" ये वेडाबाई,आज एवढ्या मंगलदिनी कोण असं रडतं का ? शांत हो पाहू. गर्भार बाईने असे अश्रू ढाळू नयेत." ती समजावत म्हणाली.

" या अश्रूंसोबत आता आजीवन नातं जुळलं आहे." तिच्या कुशीतून बाहेर येत विभाने स्वतःला सावरलं.

" तुझ्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचा बहर घेऊन येणार आहे हा जीव. निदान त्याच्यासाठी तरी सावर स्वतःला." तिच्या डोक्यावरून हात फिरवत रेवाने समज दिली.

"आयुष्यात आता फक्त पानगळच उरली आहे. बहराचा ऋतु कायमचा संपला." म्हणत तिने नजर बाहेर रोखली.

" राजवीरच्या शेवटच्या निशाणीला पानगळीचं शीर्षक नको देऊस." म्हणत रेवाने तिला आपल्या दिशेने वळवलं.

राजवीरचं नाव ऐकताच विभा हळवी झाली. डोळ्यांतील अश्रूंना रोखणे आता शक्य नव्हते.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all