वीरपत्नी (भाग ५ वा)

एका वीरपत्नीची हळवी कथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

पहिली फेरी:- कथामालिका

कथेचे नाव:- वीरपत्नी ( भाग ५ वा)

©® आर्या पाटील

पण अजूनही विभा यातून बाहेर पडत नव्हती किंबहुना बाहेर पडणे शक्यही नव्हते.तिच्या डोहाळे जेवणाचा घातलेला घाट तिला जराही मान्य नव्हता पण वसुधा ताईंना दुखवण्याची हिंमत मात्र होत नव्हती.

थोड्याच वेळात वसुधा ताई रुममध्ये आल्या.फोटोंचा अल्बम चाळत असलेल्या विभाच्या डोक्यावरून हात फिरवीत त्यांनी तिला भावनिक आधार दिला. त्यांना समोर पाहताच विभा हळवी झाली. त्यांना मिठी मारत अश्रूंना मोकळं करती झाली.

" आधी शांत हो बाळा.राजवीरला नाही आवडणार तुला असं रडतांना पाहून." तिला शांत करत त्या म्हणाल्या.

" आई, का गेला तो मला असं एकटीला सोडून आणि ते ही जेव्हा मला त्याची सगळ्यात जास्त गरज होती." ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.

" विभा, आपल्या राजवीरला वीरमरण आले आहे. त्याची सर्वात जास्त गरज आपल्या भारतमातेला होती. देशरक्षणार्थ त्याला प्राप्त झालेलं मरण म्हणजे वीरगती आहे त्यामुळे या वीरगतीचं पावित्र्य आपल्याला राखावं लागेल." आता मात्र त्या निर्धाराने म्हणाल्या.

तसे विभाने डोळे टिपले. राजवीरच्या शौर्याचा अभिमान आता स्पष्टपणे तिच्या डोळ्यांत जाणवत होता.

" आपल्या वीरची गोड आठवण वाढते आहे तुझ्या गर्भात. या बाळाच्या रुपात आपला राजवीर पुन्हा आपल्यात परतणार आहे. त्याचं स्वागत नको का करायला ? विभा, बाळा राजवीरसाठी तरी या दुःखातून सावर.स्वतःला जप." तिच्या डोक्यावर हात फिरवत त्या म्हणाल्या.

विभाने होकारार्थी मान हलवली.

" तयार हो. बाहेर बायका जमल्या आहेत. राजवीरच्या स्वागतासाठी हे डोहाळे जेवण आहे असे समज." म्हणत त्यांनी हिरवी पैठणी तिच्या हातात दिली.

" पण.. आई,एका विधवेने हे असं नववधूसारखं सजणं या समाजाला नाही पटणार. राजवीरसोबत माझा नटण्याचा अधिकारही गेला." पैठणी पाहत ती म्हणाली.

" विभा, तु विधवा नसून वीरपत्नी आहेस. पुन्हा विधवा म्हणून स्वतःला उद्देशू नकोस. ही आभूषणे म्हणजे राजवीरच्या अस्तित्वाची निशाणी आहेत बरोबर ना ? मग हे अस्तित्व तु रोजच तर जगते आहेस. राजवीरनंतर आमची मुलगी बनून त्याचं कर्तव्य पार पाडते आहेस. आईपणासोबतच येणाऱ्या जीवाचा बाबाही तु होणार आहेस. राजवीरची सगळी कर्तव्य पार पाडणाऱ्या तुझ्यात अजूनही राजवीर जिवंत आहे मग तुला सजण्याचा अधिकार का नाही ? समाजाचा नको तुझ्या राजवीरचा विचार कर. त्याला नाही आवडणार वैधव्याचा पांढरा रंग तुझ्या जीवनात सजलेला. बाळा, तयार हो आणि बाहेर ये मी वाट पाहते." तिच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या आणि बाहेर पडल्या.

त्यांचा प्रत्येक शब्द तिला जगण्याचं बळ देऊन गेला. 

ती तयार झाली अगदी तशीच जशी राजवीरला आवडायची. हिरवी पैठणी, गच्च बांगड्या, फुलांचे दागिने लेवून.आरश्यात स्वतःचं रुप न्याहाळतांना पुन्हा एकदा गर्भात बाळाची हालचाल जाणवली जणू ते ही आपल्या आईच्या सजण्याचं स्वागत करत होते.

टेबलावरील राजवीरचा फोटो घेऊन ती रूमबाहेर आली. तिला असं येतांना पाहून तिथल्या सगळ्याच बायकांना गहिवरून आले. राजवीर जणू विभाला घेऊन येत आहे असेच काहीसे वसुधा ताईंना वाटत होते. डोळ्यांच्या कडा त्याच्या आठवणींनी भरून आल्या पण पुढचाच क्षणी त्यांनी डोळ्यांतील पाणी टिपले. समोर येत विभाला हात दिला.तिला झोपाळ्यावर बसवत तिचे औक्षण केले. डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा होता. विभाची ओटी भरत वसुधा ताईंनी आणि सोबतच सगळयाच बायकांनी विभाला आशीर्वाद दिले. बदलाची एक नवी प्रभा तिच्या आयुष्यरूपी क्षितिजावर सजत होती.तो फक्त एक सोहळा नव्हता तर नवी सुरवात होती विभाच्या पालकत्वाच्या प्रवासाची ज्यात वसुधा ताई दिपस्तंभाप्रमाणे तिच्या सोबत उभ्या राहिल्या.

समाप्त

©® आर्या पाटील

(देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या वीरपुत्रांना आणि त्यांच्या वीरपत्नींना मानाचा मुजरा.)

🎭 Series Post

View all