वीरपत्नी (भाग ४ था)

एका वीरपत्नीची हळवी कथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम

पहिली फेरी:- कथामालिका

कथेचे नाव:- वीरपत्नी ( भाग ४ था)

©® आर्या पाटील

"राजवीर.." म्हणत वसुधा ताईंनी त्याला जवळ घेतले.

त्याच्या या निरवानिरवीच्या शब्दांनी त्यांचा कंठ दाटून आला.

" आई, तुला खंबीर व्हावं लागेल." त्यांना शांत करत तो म्हणाला.

" बाळा मला खात्री आहे तु लवकरच सुखरूप घरी परत येशील." म्हणत त्यांनी स्वतःला खंबीर बनवले.

राजवीरनेही होकारार्थी मान हलवत त्यांना शांत केले.

दरम्यान सीमाभागात आतंकवादी कारवाया जरा जास्तच वाढल्या होत्या.सुट्टी संपायच्या आधीच त्याला देशसेवेत रुजू व्हावं लागलं.तो गेला पण विभाच्या जगण्याला नवं रूप देऊन. तिला मातृत्वाची चाहूल लागली आणि त्यांच्या जगण्याला नवा हुरूप आला.राजवीरचं बीज तिच्या गर्भात आकार घेऊ लागलं. त्यांच्या प्रेमाची सुंदर खूण जगण्याचा आधार बनली. राजवीरला जेव्हा ही गोड बातमी कळली तेव्हा आभाळाएवढा आनंद झाला त्याला. विभाचा चेहरा डोळ्यासमोरून सरत नव्हता. बाबा बनण्याचा आनंद त्याचं जगणं आणखी व्यापक करून गेला. सुखाचा सोहळा सजत असतांना मात्र काळाची काळी सावली पडली आणि सगळच संपलं.

सीमेवर कर्तव्य बजावत असतांना आतंकवाद्यांच्या एका भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले. शौर्याचा केशरी रंग लेवून राजवीर पंचत्वात विलीन झाला.विभा मात्र पूर्णपणे तुटली.राजवीरचं तिच्या आयुष्यात नसणं म्हणजे फक्त अंधार होता. त्या अंधारात गर्भातील बाळाची जबाबदारी घेऊन तिला पुढे जावेच लागणार होते. शहीद झालेल्या मुलाचं दुःख बाजूला सारत वसुधा ताई विभाच्या आई झाल्या. लेकाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्या विभाच्या या खडतर प्रवासात स्वतः समिधा बनल्या. स्वतः पुत्रशोकात बुडूनही तिला सावरणाऱ्या. विभाला या साऱ्यांतून बाहेर काढणं खूप कठिण होते पण त्यांनी संयमाने तिला सावरलं.तिच्या उदरात वाढत असलेली आपल्या लेकाची शेवटची निशाणी त्यांनी प्राणपणाने जपली. राजवीरच्या शौर्यगाथा सांगत त्यांनी बाळावर गर्भसंस्कारही केले. ते ऐकतांना जेव्हा विभा हळवी व्हायची तेव्हा आईच्या मायेने त्या तिला कुशीत घ्यायच्या. वैधव्याचा पांढरा रंग त्यांनी कधीच तिच्या भाळी रेखाटू दिला नाही. मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या आणि लाल कुंक हे तिच्या आयुष्यातून कधीच हद्दपार होऊ दिले नाही.

" नवरा गेलेली बाई विधवाच असते." कोणी तरी विद्रोह करत म्हणाले होते.

" माझी विभा विधवा नाही ती वीरपत्नी आहे. खरं तर समाज या वीरपत्नींच्या ऋणात आहे. सीमेवर जवान म्हणून कार्यरत असणाऱ्या, ज्यांच्या आयुष्याचा क्षणाचा भरोसा नसतो अश्या तरुणाशी विवाह करणाऱ्या त्या खरचं धाडसी आहेत .सुखी भविष्याची स्वप्ने न रंगवता आपलं भविष्य देशाच्या, भारतभूच्या हवाली करून मोकळं होतात. तिरंग्यात असलेला पांढरा रंग त्यांच्या वीरपतींच्या समर्पणाचा प्रतिक पण समाज मात्र वैधव्य म्हणून तो त्यांच्यावर लादतो. याउलट तोच समाज तिरंग्यात असलेला त्यांच्या पतींच्या धैर्याने सजलेला हिरवा रंग आणि त्यांच्या बलिदानाची गाथा सांगणारा ला रंग वीरपत्नींसाठी नाकारतो.खरचं या स्वार्थी समाजाची कीव करावीशी वाटते. माझ्या विभाच्या आयुष्यात मात्र मी हे असं होऊ देणार नाही." निर्धाराची चावी लावून त्यांनी समाजाचं तोंड कायमचं बंद केलं.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all