वीरपत्नी (भाग २ रा)

एका वीरपत्नीची हळवी कथा

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

पहिली फेरी:- कथामालिका

कथेचे नाव:- वीरपत्नी ( भाग २ रा)

©® आर्या पाटील

" राजवीर, माझा राजवीर." म्हणत ती रडू लागली.

" विभा रडू नकोस. त्याचा त्रास राजवीरच्या आत्म्याला होत असेल. त्याच्यासाठी तरी शांत हो.तु वीरपत्नी आहेस सीमेवर शहीद झालेल्या एका वीरपुत्राची. तुझ्या डोळ्यांत अश्रू शोभत नाहीत." रेवा खंबीरपणे म्हणाली.

" पण मी एक माणूसही आहेच ना.आईंएवढी खंबीरता नाही माझ्यात." ती रडक्या स्वरात म्हणाली.

" मग निदान त्यांच्या सुखासाठी तयार हो." म्हणत रेवाने तिची समज काढली.

" नाही होणार गं हे माझ्याने. रेवा तु जा प्लिज मी तुला विनंती करते." म्हणत तिने हात जोडले.

" पण.." रेवा पुढचं काही बोलणार तोच तिला तिने अडवले.

" मला खूप त्रास होतोय प्लिज तु जा." तिने पुन्हा आर्जव केली.

रेवाचा नाइलाज झाला. जरी शेजारीण असली तरी विभा तिची खूप जवळची मैत्रीण होती. आपल्या मैत्रीणीला कोणताही त्रास नको म्हणून ती रूमबाहेर पडली.

ती बाहेर जाताच कपाटात ठेवलेला राजवीरच्या फोटोंचा अल्बम बाहेर काढून विभाने तो उराशी कवटाळला.

' मी खूप एकटी आहे वीर.मला,आपल्या बाळाला तुझी गरज आहे. जेव्हा मला आई होण्याचं दडपण आलं होतं तेव्हा तु खंबीर साथ दिली होतीस आणि आता बाबाचं कर्तव्यही माझ्या खांद्यावर टाकून तु निघून गेलास. तुझं कर्तव्य नेहमीच आमच्याआधी होतं पण तरीही आमच्या आयुष्यात तु अग्रस्थानी होतास.जन्माला येण्याआधीच बाबाची सावली हरवलेल्या आपल्या बाळाचा काय दोष ?" साश्रू नयनांनी ती राजवीरशी संवाद साधती झाली.

त्या संवादा सरशी तिला गर्भातील बाळाने हालचाल केल्याचे जाणवले. तशी ती शांत झाली.उदरावर हात ठेवत तिने जणू त्या बाळाला आश्वासक सोबतीची जाणीव करून दिली.

तिने पुन्हा एकदा राजवीरचा फोटो अल्बम उघडला. बालपणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचे सगळेच फोटो वसुधा ताईंनी या अल्बम मध्ये जपले होते.

राजवीर त्यांचा एकुलता एक मुलगा.पिढीजात देशसेवेचा वसा लाभलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. राजवीरचे वडिलही सैन्यात होते.वडिलांच्या शौर्यगाथा ऐकत राजवीर मोठा झाला त्यामुळे आपसुकच रक्तात भिनलेली राष्ट्रभक्ती त्याने कर्तव्य म्हणून निवडली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना त्याच्या आयुष्यात विभा आली. मैत्रीपासून सुरु झालेला त्यांच्या नात्याचा प्रवास कधी प्रेमाच्या स्टेशनवर येऊन पोहचला हे त्यांनाही कळलं नाही.देशसेवेच्या या कर्तव्यात विभा त्याची हिंमत बनली.सैन्यदलाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून जेव्हा राजवीर घरी आला तेव्हा त्याच्या वडिलांना आभाळाएवढा अभिमान वाटला पण आईचं काळीज असलेल्या वसुधा ताई भावनिक झाल्या.

" आई तु तर माझी प्रेरणा आहेस आणि आज तुझ्याच डोळ्यांत पाणी." वसुधा ताईंचे डोळे पुसत राजवीर म्हणाला.

" पण प्रत्येक आईसाठी आपलं लेकरू एक हळवा कोपरा असतो. लेकाच्या काळजीने आई भावनिक होतेच." त्याच्या कुशीत शिरत त्या म्हणाल्या.

" तु फक्त आई नाहीस तर एक वीरपत्नी आहेस आणि तु म्हणतेस त्याप्रमाणे या हळवेपणावर खंबीरतेचा शेला पांघरायची कसब फक्त एका वीरपत्नीकडेच असते ना." त्यानेही त्यांच्याच भाषेत समजावले.

" तुझी आई आहेच खंबीर.मी सीमेवर असतांना तिने एकहाती संसार सांभाळला.आताही ती खंबीरच आहे. हो ना वसुधा ?" राजवीरचे बाबा वसुधा ताईंना विचारते झाले.

तसे त्यांनी स्वतःला सावरले. होकारार्थी मान हलवत पुन्हा एकदा खंबीरतेचा शेला पांघरला.

पाहता पाहता त्यांचा सहवासाचा सुखद कालावधी संपला आणि राजवीरची पहिली पोस्टिंग झाली. जम्मू काश्मीरच्या अतिसंवेदनशील सीमाभागात मिळालेली 

पोस्टिंग त्याने कर्तव्य म्हणून स्विकारली.

आदल्या दिवशी संध्याकाळी नदी किनाऱ्यावर त्याला निरोप देण्यासाठी आलेली विभा भावनिक झाली.त्याला गच्च मिठीत घेत त्याच्या कपाळावर स्पर्शखुण उमटवली.तिला सावरत त्याने लवकरच परत येण्याचा शब्द दिला.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all