वीरमाता

A story of a soldier who sacrificed his life for his country and of his mother, who accepted this sacrifice with a brave heart!

'रघुकुल' सोसायटीच्या आवारात आज लोकांची गजबज होती, निमित्त होतं पंधरा ऑगस्टचं. स्वतंत्र भारताचं अमृत महोत्सवी वर्ष. एरवी कोणताही सण थाटामाटात साजरा करणारं 'रघुकुल' आजच्या एवढ्या खास दिवशी शांत बसणं शक्यच नव्हतं. गेल्या आठवडाभरापासून बिल्डिंगमधल्या सगळ्यांचीच तयारीसाठी धावपळ चालू होती. दरवर्षी ध्वजारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या खांबाला नवीन रंग देणं, तो फुलांच्या माळांनी सजवणं, बिल्डिंगमधल्या सगळ्यांना निमंत्रण देणं, चहा नाश्त्याची सोय ह्या सगळ्यात बिल्डिंगमधले थोरा-मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच सहभागी झाले होते. प्रत्येकाची कामं ठरलेली होती. सोसायटीमधल्या बायकांनी कधी नव्हे तो एकमताने बटाटे वडे आणि आलं-वेलची घातलेला गरमा गरम चहा असा मेनू ठरवला होता. त्यासाठी त्या सकाळी पाच वाजताच सोसायटीच्या वॉचमनच्या घराबाहेर जमल्या होत्या. त्याने मोठ्या मनाने त्याची खोली १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी दिली होती. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीने बिल्डिंगीच्या आवारातल्या झाडांवरची धूळ वाहून गेली होती. त्यांची हिरवीगार पानंही आजचा दिवस साजरा करण्यासाठी सज्ज होती. 

"तुम्हाला सांगतो मी आजकालच्या मुलांना काही राहिलं नाहीये ह्या दिवसाचं. स्वातंत्र्यासाठी लोकांनी काय बलिदान दिलंय हे ह्या मोबाईल आणि टी.व्ही च्या आहारी गेलेल्या पोरांना काय कळणार. आता हा अमोल बघा ना, इकडची कामं करायची सोडून त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलाय." देसाई काका जमलेल्या लोकांना सांगत होते. जगातल्या कोणत्याही वाईट गोष्टीसाठी नवीन पिढीचं मोबईल वापरणं कारणीभूत आहे असं त्यांचं ठाम मत होतं. 

"ओ काका, तुम्हाला झेंडा आणायला सांगितला होता ते तुम्ही विसरलात. त्याचीच व्यवस्था करतोय मी. १५ ऑगस्टच्या दिवशी एवढी मागणी असताना कसा मिळणार झेंडा. तुम्ही इकडे बसलाय गप्पा मारत. माझ्या सोशल मीडिया वरच्या फ्रेंड्सना विचारतोय कुठे मिळेल ते." त्यांच्या भोचक टोमण्याला अमोलने वैतागून उत्तर दिलं.

"आता वयोमानानुसार लक्षात नाही राहात. तू बघ मिळतोय का मी पण माझ्या ओळखीच्यांना विचारतो." देसाई सारवासारव करत म्हणाले.  तेवढ्यात त्यांची मुलगी वेदा तिकडे आली.

"अमोल दादा, मी बिल्डींमधल्या बाकीच्या लोकांना बोलावून आणते. त्या दोन - तीन महिन्यांपूर्वी आपल्याइकडे राहायला आलेल्या केळकर काकू कुठे दिसत नाहीत. त्यांना पण बोलावणं करते खाली यायचं." ती म्हणाली. 

"बघा, आता बोलावणी  करायला काय आपण सत्यनारायण घातलाय का घरात. सगळी बिल्डिंगमधली लोकं इथे जमली आहेत मग त्यांना आपणहून यायला काय झालंय?" देसाई काकांचा भोचकपणा अजून संपला नव्हता. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अमोल आणि वेदा तिकडून निघाले. 

"अमोल झेंड्याची व्यवस्था झाली का रे?" नुकत्याच फुलांची माळ घेऊन आलेल्या आशिषने विचारलं.

"नाही ना रे, सगळ्यांना विचारून झालंय, पण आपल्याला हवा तेवढा मोठा झेंडा एवढ्या शेवटच्या क्षणाला मिळणं जरा कठीणच आहे. बिल्डिंगमधल्या कोणाकडे असेल का? मी माईकवरून विचारतो एकदा सगळ्यांना." म्हणून अमोल स्टेजवर गेला. 

तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट नं. ३१ च्या दारावर श्रीमती. सुलेखा केळकर अशी पाटी लावली होती. वेदा त्या फ्लॅटच्या बंद दरवाज्यासमोर घुटमळत उभी होती. तेवढ्यात एका वयस्कर बाईंनी दार उघडलं. 

"नमस्कार काकू, मी वेदा देसाई. तुमच्या खालच्या मजल्यावर रहाते. तुम्हाला खाली बोलवायला आलेय. झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू करू आपण आता लवकरच." वेदा उत्साहाने म्हणाली. 

"अगं बाई, हो का. मी नक्की आले असते गं पण माझी तब्येत जरा बरी नाहीये." त्या अडखळत बोलल्या. त्यांचा चेहरा जरा ओढलेला वाटत होता. 

"बघा काकू जमलं तर थोडावेळ येऊन जा. तेवढीच तुमची ओळख होईल सगळ्यांशी. आम्ही सगळे धम्म्माल करतो एकत्र असलो की. हवं तर झेंडावंदन झालं की या परत वर. तुम्हाला पण बरं वाटेल." वेदा दारातूनच त्यांच्या घरावर नजर फिरवत म्हणाली. ती पहिल्यांदाच त्यांचं घर बघत होती. ह्या बिल्डिंगमध्ये राहायला येऊन तीन महिने होऊन गेले तरी त्यांची फार कोणाशी ओळख झाली नव्हती. त्यामुळे बिल्डिंगमधल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात कुतूहल होतं. त्या काही बोलणार तेवढ्यात अमोलची माईकवरची कर्कश्य घोषणा ऐकून दोघींनी कानावर हात ठेवला.

"हा अमोलदादा पण ना. माईक वापरायची एक संधी सोडत नाही. असो मी निघते. आम्हाला अजून झेंड्याची व्यवस्था करायची आहे. माझ्या बाबांनी घोळ घातला सगळा. लोकांना झेंडावंदनाला बोलावलंय आणि झेंडाच नाहीये अजून आमच्याकडे. पण काकू तुम्ही जमलं तर नक्की या हां, आम्हाला सगळ्यांना छान वाटेल."  म्हणून वेदा घाईघाईत तिकडून निघाली. 

बिल्डिंगच्या गेटजवळ उभा राहून अमोल त्याच्या मित्राला शिव्या घालत होता. "अरे रताळ्या, तुला झेंडा आणायला सांगितलं तर तू एवढा वेळ लावून हा हातात धरायचा झेंडा घेऊन आलास? हा झेंडा मी त्या खांबावर कसा लावणार?" अमोल वैतागला होता.

"अरे झेंडा झेंडा असतो. देशभक्ती मनात असली पाहिजे." त्याचा मित्र ओशाळून म्हणाला.

"हे तू मला नको सांगुस हां. साल्या शाळेतल्या प्रत्येक १५ ऑगस्टला सगळं होऊन गेल्यावर सामोसे खायला पोहोचायचास तू आणि मी सगळ्यात पहिले हजर असायचो. राहू दे तू, बघतो मी काय करायचं. वाटलं होतं मस्त आमच्या सोसायटीमध्ये आपला तिरंगा दिमाखाने फडकेल, आम्ही सगळे राष्ट्रगीत म्हणून त्याला सलाम ठोकू. पण आता काही ते जमेल असं वाटत नाही." अमोल हिरमुसला होऊन म्हणाला. त्याचा मित्र दहावेळा सॉरी म्हणून तिकडून निघाला.  

अमोल मागे फिरला तेव्हा समोर सुलेखाकाकू उभ्या होत्या. "अमोल शिरके तूच का? मगाशी तुझी घोषणा ऐकली. केवढा मोठ्यांदा ओरडलास रे. माईक घेतला नसतास तरी चाललं असतं" त्या म्हणाल्या.

"हो मीच अमोल, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे?" अमोल सध्या कोणतेही टोमणे ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. 

"तुमच्या झेंड्याची व्यवस्था अजून झालेली दिसत नाहीये." त्याच्या हातातल्या छोट्या झेंड्याकडे बघत त्या म्हणाल्या. मी हे घेऊन आलेय. आजच्या दिवसासाठी तुम्ही हा वापरू शकता." म्हणून त्यांनी एक गडद निळ्या रंगाची जाड कापडाची एक चपटी बॅग त्याच्या हातात दिली. त्यावर गोल्डन अक्षरात 'मेजर. विजय केळकर, इंडियन आर्मी' लिहिलं होतं. अमोल गोंधळून आलटून पालटून त्याच्या हातातल्या बॅगेकडे आणि सुलेखाकाकूंकडे पहात होता. 

"माझ्या मुलाचं आहे हे." त्या त्याची नजर चुकवत म्हणाल्या.

"तुमचा मुलगा आर्मीमध्ये आहे?" अमोलने कुतूहलाने विचारलं. 

"होता. हा झेंडा त्याच्या सामानाबरोबर परत मिळाला मला. तुम्ही हवं तर आजच्या दिवसासाठी वापरू शकता. विजयलाही आवडलं असतं हेच. येते मी." डोळ्यात आलेलं पाणी लपवत त्या म्हणाल्या. 

"काकू एक मिनिट. तुमची हरकत नसेल तर तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल? स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे तर सगळेच आहेत इकडे पण त्याची जबाबदारी घेणाऱ्या एका वीराची गोष्ट ऐकायला आवडेल आम्हाला." अमोल त्यांना थांबवत म्हणाला.

"नाही रे, मला नाही जमणार हे. मी फक्त हे द्यायला आले होते." म्हणून त्या तिकडून जायला निघाल्या. 

"प्लिज काकू, विजय दादासाठी? त्याने आणि त्याच्यासारख्या हजारो तरुणांनी दिलेल्या बलिदानाचा तुमच्यापेक्षा जवळचा साक्षीदार कोण असणार?" अमोल त्यांना समजवायचा प्रयत्न करत होता. पण सुलेखाकाकू तिकडून निघून गेल्या आणि त्यांच्या मागोमाग नाईलाजाने अमोलही.

अर्ध्या तासाने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावर्षीचं झेंडा वंदन देसाई काकांच्या हस्ते होणार होतं. अमोलने त्यांना स्टेजवर बोलावण्यासाठी माईक हातात घेतला आणि तेवढ्यात त्याची नजर समोर नुकत्याच येऊन बसलेल्या सुलेखाकाकूंकडे गेली, त्यांनी त्याला मानेनंच संमत्ती दिली तसा अमोलचा चेहरा खुलला. 

"आपल्या भारत देशाच्या ह्या पंच्याहत्तराव्या स्वतंत्रदिनाच्या कार्यक्रमात मी अमोल शिरके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी गेले काही दिवस केलेल्या कष्टांमुळे शक्य झालेल्या आजच्या ह्या सोहळ्याची सुरवात आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आपल्या देशाचा इतिहास, त्यासाठी लोकांनी दिलेलं बलिदान हे आपण पुस्तकांतून वाचलं आहेच पण आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी हे सगळं खूप जवळून पाहिलं आहे. देशप्रेमाची एक आगळी वेगळी सत्यकथा आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. पण त्याआधी वेळ आहे राष्ट्रगीताची आणि ध्वजारोहणाची. त्यासाठी मी आपल्या सोसायटीमधल्या श्रीमती. सुलेखा केळकर, ज्यांच्यामुळे हा सोहळा शक्य झाला, त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो." अमोलच्या बोलण्याने सोसायटीमधले सगळेच आश्चर्यचकित होऊन सुलेखाकाकूंकडे बघत होते. शेवटच्या क्षणाला कार्यक्रमात झालेला बदल अमोल व्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हता. स्टेजवर जाण्यासाठी उठलेले देसाई खोटं हसत परत आपल्या जागेवर बसले. 

सुलेखा काकू उठून स्टेजवर आल्या. त्यांनी समोरच्या लोकांकडे बघून हसून नमस्कार केला. "अमोल, हे काय? ह्या का करणार आहेत ध्वजारोहण? आम्ही इतकी वर्ष इकडे राहिलो, सगळ्यांना अडीनडीला मदत केली आणि तू असा कोणालाही न विचारता तुला वाट्टेल त्यांना हा मान देणार आहेस का?" देसाईकाका वैतागून म्हणाले. बाकीच्यांचीही कुजबुज चालू झालेली. 

"अमोल राहू दे अरे, त्यांना करू दे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी काल परवा आलेय इकडे, ते इतकी वर्ष राहतायत. हा मान त्यांचाच असला पाहिजे." म्हणून सुलेखा काकू तिकडून जायला निघाल्या. 

"एक मिनिट. काकू तुम्ही थांबा. देसाईकाका, मी काहीतरी कारण असल्याशिवाय असं का करेन. तुम्ही जरा माझ्या निर्णयावर विश्वास ठेवा. आधीच खूप उशीर झाला आहे, आपण झेंडावंदन करू आणि तुम्हाला सगळं लवकरच कळेल. थोडा धीर धरा." म्हणून अमोलने झेंड्याची दोरी सुलेखाकाकूंच्या हातात  दिली. त्याच्या बोलण्याने समोर बसलेल्यांमध्ये चालू असलेली कुजबुज थांबली. सगळे उठून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता सुलेखाकाकूंनी ध्वजवंदन केलं आणि राष्ट्रगीत सुरु झालं. समोर उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर देशासाठी जाज्वल्य अभिमान दिसत होता. काहींच्या डोळ्यांत पाणीही आलं होतं. आपल्या राष्ट्रगीताची महतीच अशी आहे की ते ऐकताना एका सच्च्या भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे न रहाणं अशक्यच आहे. राष्ट्रगीत झाल्यावर सगळे आपल्या खुर्च्यांवर बसले आणि अमोलने सुलेखाकाकूंसाठी एक खुर्ची स्टेजवर आणून ठेवली. त्यासमोर एका स्टुलावर पाण्याचा ग्लासही ठेवला आणि तो बाजूला जाऊन उभा राहिला. त्या अवघडून खुर्चीवर बसल्या. 

"नमस्कार, मी सुलेखा केळकर. काही महिन्यांपूर्वी इकडे राहायला आले. आजच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही मला सहभागी करून घेतलत आणि एवढा मोठा मान दिलात तो बघून मी कृतकृत्य झाले. आज सकाळपासून तुम्हा सगळ्यांची चाललेली धावपळ बघून समाधान वाटलं. शनिवार रविवारला लागून आलेली सुट्टी असतानाही कुठे फिरायला न जाता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे इथं उपस्थित आहे हे बघून छान वाटलं. नाहीतर आजकाल ह्या दिवसाचा महत्व थोडं कमी होत चाललय असं वाटतं . पण माझ्यासाठी मात्र हा दिवस खूप खास आहे आणि कायम राहील. कारण हा तिरंगा माझ्या मुलाचं पहिलं प्रेम आहे." बोलताना मध्येच थांबून त्यांनी समोरच्या माणसांकडे बघितलं. सगळेच त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होते. आपल्या सुरकुतलेल्या हातांनी त्यांनी त्यांच्या मऊसूत गुलाबी रंगाच्या कॉटनच्या साडीचा पदर खांद्यावरून स्वतःभोवती  ओढून घेतला. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने हवेत गारवा आला होता. थरथरत्या हातांनी समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास त्यांनी उचलला आणि त्या पाण्याबरोबरच गळ्यात दाटून आलेला आवंढाही गिळला. पण मग कसल्याश्या निर्धाराने त्यांनी डोळ्यात आलेलं पाणी आत ढकललं आणि पुढे बोलायला सुरवात केली.

"माझा मुलगा, मेजर. विजय केळकर, इंडियन आर्मी. तो दहा वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला भारतीय सैन्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम होतं. सकाळी सहाला शाळेतलं ध्वजवंदन संपवून धावत घरी येऊन दूरदर्शनवर वर प्रत्येक वर्षी दाखवल्या जाणाऱ्या लाल किल्ल्यावरच्या ध्वज वंदनाचा कार्यक्रम तो सुरवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. त्या कार्यक्रमांत भारताच्या तिन्ही सैन्य दलांना पाहताना त्याच्या डोळ्यात दिसणारा अभिमान बघूनच आम्हाला तो पुढे आयुष्यात काय करणार आहे याचा अंदाज आला होता. पण तरीही जेव्हा कॉलेजनंतर त्याने इंडियन आर्मी जॉईन करायची इच्छा बोलून दाखवली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. 'सैनिक जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात' असं प्रत्येक आईला वाटतं. स्वतःच्या काळजापेक्षा ज्याला जपलं तो शत्रूच्या समोर निधड्या छातीने उभा राहणार ह्या विचाराने कोणत्या आईच्या पोटात गोळा येणार नाही. त्या प्रेमाच्या भरातच मी त्याला विनवण्या केल्या, दुसरं काहीतरी शिकण्याचा आग्रह केला. मुलाच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या आईची माया होती ती, बाकी काही नाही. पण त्याचं मात्र ठरलं होतं. एकच आयुष्य होतं ते देशासाठी द्यायला एका पायावर तयार होता तो. ह्या भाबड्या आईला समजावणं त्याच्यासाठी खूपच सोप्पं होतं. मला म्हणायचा, 'मुलं लहान असताना त्यांचं रक्षण करणं जसं आईचं कर्तव्य असतं तसंच मोठं झाल्यावर त्या आईचं रक्षण करणं मुलांची जबाबदारी असते. आणि फक्त जन्मदात्या आईचं नाही तर या भारतमातेचं पण. तूच मला शिकवलंस ना अधिकार गाजवायचा असेल तर आधी जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. मग आता तूच मला ही जबाबदारी पूर्ण करण्यापासून थांबवणार आहेस का?'.

शेवटी त्याच्या हट्टापुढे मला नमतं घ्यावं लागलं. तो पण जणू काही माझ्याच परवानगीचीच वाट बघत होता. पुढच्या काही महिन्यांतच त्याने एन.डी.ए. ची परीक्षा पास केली आणि पंजाब रेजिमेंटमधून त्याला ट्रेनी म्हणून जॉईन व्हायचं पत्र आलं, त्यावर तीन महिन्यानंतरची तारीख होती.  माझ्या मनाची तयारी करण्यासाठी तेवढे पुरे होते असं वाटलं मला, पण ते चुकीचं होतं. नेमका अश्या प्रसंगी काळ इतका भरभर पुढे धावतो की तीन महिनेही तीन तासांसारखे निघून जातात. पण त्या दिवसांमध्ये माझ्या विजयने त्याचा जास्तीत  जास्त वेळ माझ्याबरोबर घालवला. तो लहान असतानाच त्याचे वडील गेले त्यामुळे आम्ही दोघंच होतो एकमेकांना. माझं अख्ख आयुष्य विजयभोवतीच होतं, त्याची त्याला पूर्ण कल्पना होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला तो लागायचा. फोन, लॅपटॉप वगैरे मला वापरता येत नव्हतं, पण निघायच्या आधीच्या त्या तीन महिन्यात सगळं शिकवलं त्याने मला.

'मी तिकडे गेल्यावर तुला हे सगळं वापरता आलं पाहिजे नाहीतर आपलं बोलणं कसं होणार?'  म्हणून माझ्या मागेच लागायचा तो. बरं त्याचंही माझ्यावाचून अडत होतंच. पठ्ठ्याने एवढी मोठी परीक्षा पास केली पण अजूनही जेवण बनवताना तेलात मोहरी टाक म्हंटलं की हा जिरे टाकायचा. 'विजू, कसं होणार रे तुझं माझ्याशिवाय' असं मी म्हंटलं की त्याचं उत्तर तयार असायचं. मला जवळ घेऊन तो म्हणायचा , 'माझ्या हातचं जेवण खाऊनच शत्रू गारद होईल मग युद्धाची वगैरे गरजच नाही . आणि मध्ये मध्ये येईन की मी सुट्टी घेऊन तुझ्या हातचं जेवायला.' " सुलेखाकाकू आठवून स्वतःशीच हसल्या.

"विजय निघून गेला आणि घरात एकदम पोकळी निर्माण झाली. कितीवेळा त्याचं अस्तित्व जाणवावं म्हणून मी त्याच्या खोलीत जाऊन बसायचे. कितीही बिझी असला तरी दिवसाला एक फोन करायचा तो मला. आणि त्या कॉलच्या प्रतीक्षेत माझा अख्खा दिवस जायचा. हे त्याला कळलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. 'आई, तू असं दिवसभर माझ्या कॉलची वाट बघत बसलेलं नाही आवडणार हां मला. तुला बागकाम करायला आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतं, मग ते सगळं सोडून देणार आहेस का आता? ते काही नाही, उद्यापासून पुन्हा तू तुझ्या सगळ्या कामांना सुरवात कर.' त्याचा शब्द कसा खाली पडू देणार, म्हणून मी बाकीच्या गोष्टींमध्ये माझं मन रामवायला सुरवात केली. हळूहळू त्याच्या घरात नसण्याची सवय होत होती. काळ पुढे सरकत होता, चांगला असो वा वाईट, तो त्याच्या वेगाने पुढे जातच राहतो. वीस महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये विजू दोनतीनदाच आठवडाभराच्या सुट्टीवर घरी आला. त्याचं ट्रेनिंग संपून तो लेफ्टनंट म्हणून जॉईन झाला तेव्हा मी त्याला भेटायला गेले होते. आर्मी ऑफिसरच्या गणवेशात त्याला बघून माझे डोळे अभिमानाने भरून आले. मुलांचं स्वप्न पूर्ण  होताना बघण्यासारखं दुसरं सुख  नसतं आईसाठी. मला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे कठोरभाव जाऊन नेहेमीचं मिश्किल हसू आलं. आनंदाने त्याने माझ्याजवळ येऊन त्याची कॅप माझ्या डोक्यावर ठेवली आणि मला सॅल्यूट करतम्हणाला, 'लेफ्टनंट. विजय केळकर, ऑन युअर ड्युटी मॅम'. आणि आम्ही दोघंही हसलो. त्याच्या एका मित्राने हा क्षण कॅमेरामध्ये टिपला. तो फोटो पुढची अनेक वर्ष माझी एकुलती एक सोबत होता." सुलेखाकाकू बोलायच्या थांबल्या. जणूकाही घडलेल्या गोष्टी, सरलेला काळ पुन्हा एकदा त्यांच्या समोरून पुढे सरकत होता. बिल्डिंगमधले सगळेच पुढे काय झालं हे जाणून घ्यायला उत्सुक होते. 

"त्याच्या लेफ्टनंट होण्याचा आनंद तर होताच पण काळजीही होती. ट्रेनी असताना त्याचं पोस्टिंग हाय रिस्क मोहिमांमध्ये होत नव्हतं, पण आता तो सलग काही दिवस गायब असायचा. त्याचा फोन आला नाही तर माझं जेवण घशाखाली नाही उतरायचं. त्याचा फोटो समोर ठेऊन मी सतत मनात त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करत बसायचे. मग एक दिवस अचानक त्याचा कॉल यायचा आणि माझा जीव भांड्यात पडायचा. सुट्टीवर घरी यायचा तेव्हा त्याच्या हातांवर, चेहऱ्यावर भरून आलेल्या जखमांचे व्रण दिसायचे, ते बघून माझा प्राण कंठात यायचा. काय काय सहन करावं लागत असेल माझ्या लेकाला ह्या विचाराने झोप लागायची नाही. तो डोळ्यांसमोर असताना, त्याला पोटभर जेवताना, शांत झोपताना बघून मनाला दिलासा मिळायचा पण काही दिवसातच त्याची सुट्टी संपून तो त्याच्या सेवेवर रुजू व्हायला निघून जाईल आणि पुन्हा मला कधी भेटेल ह्या कल्पनेने जीव तुटायचा. त्याने मात्र जीवाची पर्वा न करता स्वतःला देशाच्या रक्षणासाठी वाहून घेतलं होतं. सुट्टीवर असतानाही त्याचं लक्ष सीमेवरच असायचं. त्याच्या ह्या परिश्रमांमुळेच तो काही वर्षांतच मेजर झाला. माझ्यासमोर तो त्याच्या कामाबद्दल काहीही बोलणं टाळायचा. मला काळजी वाटू नये हाच त्याचा उद्देश असायचा, पण त्यालाही मनमोकळेपणाने बोलता येईल असं कोणीतरी त्याच्या आयुष्यात असावं असं मला वाटायचं. त्याचं वयही तिशीकडे झुकत होतं. अशातच एकदा तो सुट्टीवर घरी आला असताना मी त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला, 'विजू आता लग्नाचं बघायचं का? माझ्या हातचं जेऊन कंटाळा येत असेल तुला. छानशी बायको आणूया तुझ्यासाठी म्हणजे ती आजकालचे काय ते पास्ता वगैरे असतं ते करून खायला घालेल तुला. किती दिवस माझ्या हातचा आमटी भात खाणार आहेस?' मी म्हटलं त्याला.

पण त्याचे लग्नाबद्दलचे  विचार ठाम  होते, 'आई, मी लग्न करायला तयार आहे पण मी असा महिनोंमहिने बाहेर असताना कोणती मुलगी तयार होणार लग्नासाठी. आणि अगदीच कोणी तयार झाली तरी ती पण घरी तुझ्यासारखीच माझी काळजी करत बसून राहणार. कशाला उगाच कोणाच्या आयुष्याचा खोळंबा करायचा. आता तुझ्या बाबतीत नाईलाज आहे माझा. आई आहेस म्हंटल्यावर मी काहीही सांगितलं तरी तू मी समोर नसताना माझी काळजी करत बसणारंच. पण अजून कोणाला कशाला उगाच त्रास माझ्यामुळे. हां आता तुला माझ्यासाठी आमटीभात बनवायचा कंटाळ आला असेल तर तसं सांग.' तो मला चिडवत म्हणायचा. त्या दिवसानंतर पुन्हा मी त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढलाच नाही. कटू असलं तरी तो बोलला ते सत्यच होतं." सुलेखाकाकूंनी पदराने डोळे पुसले. 

"त्यावेळी सुट्टीवर घरी आला असतानाच त्याला तातडीने परत बोलावून घ्यायला फोन आला. त्याच दिवशी रात्रीच्या ट्रेनने तो निघाला. एका दिवसात काश्मिर जवळच्या एका बेसवर त्याला रिपोर्ट करायचं होतं. दरवेळीप्रमाणेच  त्याला आमच्या घराच्या गेटमधून बाहेर जाताना बघून माझं मन धास्तावलं. काही पाऊलं चालल्यावर तो मध्येच थांबला आणि त्याने मागे वळून बघितलं. 'आई तू लावलेल्या रातराणीचा वास काय मस्त येतोय गं, पुढच्या वेळी मी येईन तेव्हा एक रोप माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. आणि हो यावेळी लवकरच येईन हां, खूप वाट नाही बघायला लावणार तुला.' तो हसून म्हणाला. त्याचा तो चेहरा का कोणास ठाऊक माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. तो निघून गेला आणि मी पुन्हा एकदा रिकाम्या घरात येऊन बसले. काही दिवसांतच १५ ऑगस्ट होता. त्यावर्षी भारताला स्वतंत्र होऊन ६० वर्ष झाली. सकाळी लवकर उठून मी कामं आवरत असतानाच विजूचा फोन आला. 'आई, आजची १५ ऑगस्टची परेड आठवणीने बघ हां. तुझ्या करता एक सरप्राईज आहे. आता ठेवतो फोन जरा घाईत आहे.' म्हणून त्याने फोन ठेऊन दिला. मी गडबडीने जाऊन टी.व्ही. लावला आणि नेमकी तेवढ्यात घरची वीज गेली. काही मिनिटं वाट बघून मी आमच्या आसपासच्या सगळ्यांकडे जाऊन विचारून आले पण कोणाकडेच लाईट नव्हते. शेवटी मी विजूला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. त्यादिवशी मी रात्री उशिरा पर्यंत त्याच्या फोनची वाट बघत होते आणि वाट बघतानाच माझा डोळा लागला. सकाळी उठले तेव्हा विजूचा मेसेज आला होता, 'खूप महत्वाच्या कामासाठी जावं लागतंय आल्यावर एक दोन दिवसात फोन करतो. कालचा  कार्यक्रम  बघितलास  का?' काय बघायला सांगत होता विजू मला? आता तो आल्यावरच कळेल मला. पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती." सुलेखाकाकूंनी आलेला हुंदका आवरला.

"मग पुढे काय झालं? विजूदादा आला का घरी?" पुढच्या रांगेत बसलेल्या वेदाने विचारलं. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरही तोच प्रश्न होता. 

"आला ना. पण.." सुलेखाकाकू मध्येच थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्या बघून समोर उपस्थित लोकांच्या काळजाचाही ठोका चुकला.

"सतरा ऑगस्टचा दिवस उजाडला. मी उठून अंगणात आले तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या अंगावर काटाच आला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने माझ्या बागेतली सगळी झाडं पार कोलमडून गेलेली. कोकणातल्या लाल मातीचे ओघळ त्यांच्या बरोबर मी इतकी वर्ष प्रेमाने वाढवलेली झाडंही वाहून नेत होते. माझं लक्ष रातराणीच्या झाडाकडे  गेलं, त्याचा मोहर पूर्ण गळून पडला होता. 'विजूचं आवडतं झाड.' मनाशी काहीतरी विचार करून मी धावत जाऊन कात्रीने त्याच्या उरलेल्या एकुलत्या एका फांदीचं कलम जवळच्या कुंडीत लावून ती मी आत घेऊन आले. तेवढ्यात मला दारात गाडी थांबल्याचा आवाज आला. 'विजु?' मी आनंदाने जवळजवळ ओरडलेच. मुलाची चाहूल आईला लागतेच ना. माझ्या पायांना जमेल तेवढ्या वेगाने मी बाहेर धावत आले. पण समोर माझा विजु नव्हता. मिलिटरी युनिफॉर्ममध्ये असलेल्या एका तिशीतल्या मुलाने मला सॅल्यूट केला आणि माझ्या मनाला कसलंही आकलन व्हायच्या आधीच माझ्या शरीराने धीर सोडला. माझे हात-पाय कापायला लागले. जवळच्या दरवाजाच्या चौकटीने मला आधार दिला.

'मॅम, मी लेफ्टनंट समीर गोयल. १५ ऑगस्टच्या रात्री भारत पाकिस्तान बॉर्डरवर झालेल्या चकमकीत मेजर. विजय केळकर ह्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी इंडियन आर्मी त्यांची सदैव ऋणी राहील.' समोर उभा असलेला माणूस बोलत होता पण त्याचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतच नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी माझा विजू घरी आला, शेवटचा. तो म्हणाला होता ना, यावेळी लवकर परत येईन. तो आला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. पण त्याची पर्वा न करता हजारो माणसं आमच्या घराबाहेर जमली होती. त्याच्याबरोबरीने ह्या देशासाठी लढणारे अनेक आर्मी ऑफिशिअल्स आज त्याच्याबरोबर शेवटची मोहीम पूर्ण करायला आले होते. आपल्या मुलाची वाट बघत असणाऱ्या ह्या म्हाताऱ्या आईची समजूत घालायची मोहीम. कदाचित हे त्यांच्यासाठी शत्रूशी लढण्यापेक्षा कठीण होतं. कारण कुठेतरी त्यांना माझ्यात त्यांची आई दिसत होती. तिच्या मुलासाठी झुरणारी. त्या रात्री शासकीय इतमामात माझ्या विजूचे अंत्यसंस्कार झाले. त्याच्या चितेला अग्नी देताना मी त्याच्यासाठी जपून ठेवलेली रातराणीची शेवटची फांदी त्यावर ठेवली. 'विजू, तू जिकडे कुठे असशील तिकडे ह्या रातराणीचा सुंगंध कायम दरवळत राहील. तुझ्या आईचा हा शेवटचा आशिर्वाद समज बाळा. आणि मी येईपर्यंत स्वतःची काळजी घे.' म्हणून मी माझ्या विजूला शेवटचा निरोप दिला." सुलेखाकाकू बोलायच्या थांबल्या. आता त्यांच्या डोळ्यात फक्त अभिमान होता, त्यांच्या विजूसाठी. पण लोकांचे डोळे मात्र पाणावले होते. त्यांचे अस्फुट हुंदके सुलेखाकाकूंच्या कानावर पडत होते. स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या अमोलच्या डोळ्यातही पाणी होतं. तिकडच्या शांततेत वाऱ्यावर फडकणाऱ्या तिरंग्याचा आवाजही ऐकू येत होता.

"दुसऱ्या दिवशी त्यांनी विजूचं सामान मला आणून दिलं. त्या सामानातल्या निळ्या रंगाच्या बॅगेवर लिहिलेल्या त्याच्या नावावरून हळुवार हात फिरवून मी ती उघडली. त्याच्या देशभक्तीचं आणि मातृभक्तीचं प्रतीक त्यात होतं. तो लेफ्टनंट झाला त्या दिवशी काढलेला आमचा फोटो आणि.. हा तिरंगा." त्यांच्यावर फडकणाऱ्या तिरंग्याकडे बघत त्या म्हणाल्या. 

"विजूला जाऊन आज पंधरा वर्ष झाली, पण आजही तो दिवस माझ्या मनात तितकाच ताजा आहे. तो गेला आणि माझ्यासाठी आजच्या दिवसाचा अर्थच बदलला. कितीवेळा असं वाटतं की पंधरा वर्षांपूर्वी झालेली ती घटना विसरून माझ्या विजूची शेवटची आठवण म्हणून त्याचा हसरा चेहरा लक्षात ठेवावा. पण इतक्या वर्षात अजूनही मला ते शक्य झालेलं नाही. आज तुमच्यामुळे मला ह्या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि हा झेंडा फडकवायचा मान मला मिळाला, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. विजू गेल्यापासून आजपर्यंत मी कोणासमोरच हे सगळं बोललेले नाही. पण आज तुमच्यासमोर त्याचं आयुष्य उलगडताना मीही ते पुन्हा जगले. स्वातंत्र्य अनुभवत असताना बरेचदा त्यासाठी मोजली गेलेली किंमत आपल्याला दिसत नाही. आणि कदाचित त्यामुळेच त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. १५ ऑगस्टला खांद्यावर घेऊन मिरवला जाणारा तिरंगा दुसऱ्याच दिवशी पायदळी तुडवला जातो. त्या तिरंग्यासाठी अनेक तरुणांनी त्यांचं आयुष्य वेचलं आहे, कितीतरी मातांनी त्यांच्या मुलांचं बलिदान थरथरत्या हातांनी स्वीकारलं आहे, कितीतरी स्त्रियांनी त्यांचं सौभाग्य गमावलं आहे आणि ह्या भारतमातेने तिच्या हजारो वीरपुत्रांसाठी अगणित अश्रू ढाळले आहेत हे जेव्हा आपल्यातल्या प्रत्येकाला कळेल तेव्हा हा तिरंगा आपल्या सगळ्यांची आण बाण आणि शान बनून कायम झळकत राहील." सुलेखकाकू बोलायच्या थांबल्या. दुपार होत आलेली तरी कोणाला तहान-भुकेचं भान राहिलं नव्हतं. काहीवेळ कोणीच काही बोललं नाही.

"म्हणजे विजूला तुम्हाला काय सरप्राईज द्यायचं होतं हे कळायच्या आधीच तो.." देसाईकाकांचं वाक्य अर्धवट राहिलं. सुलेखा काकूंच्या मौनातूनच त्यांना त्यांचं उत्तर मिळालं. तेवढयात अमोलला काहीतरी आठवलं म्हणून तो घाईघाईने तिकडून गेला आणि पाच मिनिटांत परत आला. सुलेखकाकू स्टेजवरून उतरणार तेव्हढ्यात अमोलने त्यांना थांबवलं.  

"थांबा. मी सगळ्यांना जागेवरच बसून राहायची विनंती करतो. विजूदादाच्या जाण्याने आजच्या दिवसाचा अर्थच तुमच्यासाठी बदलला असं तुम्ही म्हणालात ना सुलेखाकाकू. पण विजूदादाने मात्र ह्या दिवसाची एक सुंदर आठवण तुमच्यासाठी तो जायच्या आधीच जपून ठेवली होती. फक्त तुमच्या पर्यंत ती पोहोचली नाही एवढंच." अमोलचे शब्द ऐकून सुलेखाकाकूंचे पाय थबकले. त्यांनी गोंधळून अमोलकडे बघितलं. सोसायटीमधल्या बाकीच्या पोरांनी येऊन पटापट स्टेजवर प्रोजेक्टर लावला. अमोलने त्याचा फोन कनेक्ट करून व्हिडीओ सुरु केला. पंधरा वर्षांपूर्वीच्या भारताच्या साठाव्या स्वतंत्रदिनाचा, लाल किल्ल्यावर सुरु असलेल्या ध्वजवंदनाचा व्हिडीओ होता तो. सगळ्यांचे डोळे त्या व्हिडीओ वर खिळले होते. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या तिरंग्यासमोर चालू असलेल्या परेडचं नेतृत्व करत होता.. मेजर. विजय केळकर. जो कार्यक्रम बघत तो लहानाचा मोठा झाला, ज्याने त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली त्या तिरंग्यासमोर आज तो आर्मी युनिफॉर्ममध्ये सॅल्यूट करून उभा होता.. डोळ्यात तोच अभिमान, चेहऱ्यावर तेच तेज आणि ओठांवर तेच हसू. "विजू!! लोकं शंभर वर्ष जगूनही त्यांच्या जगण्याचा अर्थ शोधत राहतात पण तू मात्र एवढं कमी आयुष्य जगूनही अमर झालास रे. आज ह्या आईचं स्वप्न पूर्ण झालं, तिच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं!" सुलेखकाकू म्हणाल्या. समोर चालू असलेला व्हिडीओ विजूच्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावला तेव्हा बसलेल्या सगळ्याच लोकांनी उठून सलाम केला, त्या वीराला आणि त्याच्या वीरमतेला!

समाप्त!