सोशल मीडियावर लिहिणे हे काही माझ्यासाठी नवीन नाही पण अवघ्या काही महिन्यांपूर्वीच ईरा या ब्लॉगिंग साईटवर मी लिहायला सुरूवात केली आणि हळू हळू तिथेही मी रमत गेले. मला स्पर्धेत भाग घ्यायला नेहमीच आवडते आणि त्यात ईरावरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ या स्पर्धेची घोषणा झाली आणि आपण ही भाग घ्यावा असे मला वाटले. अर्थात नवीन असल्यामुळे या स्पर्धेविषयी फार काही माहित नव्हते त्यामुळे संजना मॅडमना थोडेफार विचारले आणि त्यांनी जी माहिती दिली त्यामुळे या स्पर्धेविषयी एक कुतूहल होते. या स्पर्धेत भाग घेतल्यापासूनच भिती होती थोडीशी कारण पहिल्यांदाच अशा सांघिक स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यामुळे कुठला ग्रुप मिळेल, तिथले लेखक मला त्यांच्यामध्ये सामील करून घेतील ना असे खूप प्रश्न मनात होते पण माझं नशीब या स्पर्धेच्या बाबतीत खूप चं लकी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण माझ्या सुदैवाने मला ग्रुप नंबर २ सारखा अफलातून ग्रुप मिळाला.सुरुवातीला या ग्रुपमध्ये बोलताना किंवा व्यक्त होताना मी थोडी घाबरायचे पण आता या ग्रुपमध्ये मी अगदी मुरांब्यातील साखरेइतकी विरघळून गेली आहे आणि विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये मी लहान असल्यामुळे सगळेच खूप लाड करतात आणि मला नेहमीच प्रोत्साहन देत राहतात. या ग्रुपमध्ये मला माझ्यापेक्षा वयाने मोठ्या अशा खूप मैत्रीणी मिळाल्या. खरंतर मैत्रीपेक्षा ही या सगळ्या हक्काच्या अशा मोठ्या बहीणी प्रमाणेच माझ्यावर प्रेम करतात. या ग्रुपमुळेच मला मिळालेली माझी मोठी बहीण प्रज्ञा ताई.
प्रज्ञा ताई सारख्या मनमिळाऊ आणि स्वच्छंदी स्वभावाच्या व्यक्ती आजकाल खूप क्वचित पाहायला मिळतात. मला प्रज्ञा ताईचे विशेष कौतुक वाटते कारण आजपर्यंत मी तिला कोणाविषयी ही वाईट बोलताना किंवा ग्रुपमध्ये ही एखाद्या व्यक्तीवर राग धरताना कधीच पाहिले नाही. ती नेहमीच शांत असते आणि ग्रुपवर ही जेव्हा बोलते तेव्हा त्या मेसेज मधून प्रोत्साहन आणि कोतुकाचेच शब्द जास्त असतात.
लहानपणी सतत होत जाणार्या वडिलांच्या बदलीमुळे नव्या ठिकाणी गेल्यावर तिथे पुन्हा नवीन मित्रमैत्रिणी आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय त्या वयातच लागल्यामुळे तिच्यात हा मनमिळाऊ स्वभाव परिस्थितीनुरूप उपजतच आला आहे असे मला वाटते.प्रज्ञा ताई तशी शालेय वयापासूनच अगदी हुशार. अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर गोष्टीत ही हिरीरीने सहभाग घ्यायची ती. नववी म्हणजे तसा शालेय जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा कारण या वर्षातच दहावीचा अर्धा पाया भक्कम होतो अशी समज आहे परंतु नववी सारख्या महत्त्वाच्या वर्षी चित्रकलेच्या इंटरमिजीएट सारख्या परिक्षेत भाग घेतला ताईने. दिवसभर शाळा, त्यानंतर ट्युशन्स अभ्यास हे सगळे सांभाळून ताईने चित्रकलेचा क्लास पूर्ण केला. कधी कधी रात्री कोणीही सोबत नसायचे पण अशा परिस्थितीत ही जिद्द न सोडता ताईने चित्रकलेची परिक्षा दिली मला वाटते तेव्हापासूनच एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीची जिद्द तिच्यामध्ये आली असावी. सुट्ट्यांमध्ये जेव्हा आजी आजोबांकडे हमखास जाणे व्हायचे तेव्हा आजी आजोबांकडून जी संस्कारांची शिदोरी मिळाली ती ताईने आजवर जपली आहे आणि तिच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ते संस्कार दिसून येतात प्रत्येक वेळी.
माझी जेव्हा ताईशी ओळख झाली तेव्हा ताईबद्दल एवढे सगळे माहित नव्हते पण जेव्हा मी ताईबद्दल हे सगळे ऐकले तेव्हा थक्क झाले मी हे ऐकून. ताईचे लग्न झाले आहे आणि संसार व मुलाचा अभ्यास वगैरे सगळे काही सांभाळून ती ज्या पद्धतीने तिच्या लिखाणाची आवड जपत आहे, ते खरच वाखाणण्याजोगे आहे. ताईला इंग्रजी, मराठी आणि हिंदी बरोबरीने गुजराती भाषा ही अस्खलित लिहिता बोलता येते.
कॉलेजमध्ये असताना ताईच्या लेखन प्रवासाला खर्या सुरूवात झाली होती. कॉलेजमध्ये कम्युनिकेशन अँड मीडिया विषयामुळे कधीतरी लेखाअगोदर स्वतःच्या चारोळी लिहिण्याची सवय लागली आणि तिथूनच ताई मधील लेखिकेचा जन्म झाला. परंतु ताई मधील खरी लेखिका उदयोन्मुख झाली ती कोरोनाच्या काळात. फेसबुकवर ईरा पेज वाचता वाचता आपण ही लिहायला हवं ही भावना ताईच्या मनात कुठेतरी उपजत गेली. सुरुवातीला छोट्या छोट्या कविता स्पर्धेत ताईने भाग घेतला आणि त्यानंतर 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' 'या लेखन स्पर्धेपासून ताईचा लेखिकेचा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत अविरत चालू आहे. ताईने ईरावर अनेक कथा, चारोळी वगैरे लिहिल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या प्रवासात ताईच्या रूपात एक मोठी बहीण आणि गोड मैत्रीण मला मिळाली. या स्पर्धेसाठी तिने लिहिलेली 'ये जो देश है मेरा' ही कथा मला प्रकर्षाने खूप आवडली आणि तिच्यामधील उत्कृष्ट लेखिकेचे दर्शन ही या कथेतून मला झाले. देशाबद्दलची ओढ आणि प्रेम याविषयी ही कथा आहे. शिवाय चॅट संवाद व्हिडिओ या फेरीत ही ताईचा सासू सुनेविषयी चा व्हिडिओ अगदी टॉपला आहे. मला वाटते वेगवेगळे विषय अगदी सहजतेने हाताळणे हे तिचे वैशिष्ट्यच आहे पण या सगळ्यात मला भुरळ घालतो तो ताईचा नम्र स्वभाव. आजपर्यंत मी ताईला पोस्ट करताना किंवा फेरीच्या संबंधीत ज्या काही अडचणी आल्या त्याबद्दल विचारत गेले आणि प्रत्येक वेळी ताईने अगदी शांतपणे मला समजावून सांगितले. मी पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा एकदा ही ती चिडली नाही किंवा रागावली नाही, तिच्या संयमी स्वभावाने मी प्रचंड भारावून गेले आहे.
प्रज्ञा ताईची आणखी एक खासियत म्हणजे तिला सतत नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि आज ही ती ज्या पद्धतीने तिच्या मधल्या विद्यार्थिनीला जपत नवनव्या गोष्टी शिकते ते खरच कौतुकास्पद आहे. ताई एक उत्तम लेखिका आहे. एक लेखिका म्हणून तिची वीणा या नावाने ईरा वर स्वतंत्र अशी ओळख आहे. यासोबत ती एक उत्तम गृहिणी आहे आणि तिला स्वयंपाकाची आवड आहे प्रचंड. दाक्षिणात्य पदार्थ तिला विशेष आवडतात. वेळ मिळेल तेव्हा ताई तिची फिरायची आवड ही जपत असते. या स्पर्धेच्या रूपाने मला ताई भेटली आणि मला खरोखर तिचे खूप कौतुक वाटते. आपले हे बहीणींचे नाते असेच अविरत रहावे आणि आपल्या नात्यातील प्रेम असेच वाढत रहावे हीच मनीची सदिच्छा आहे. बाकी ताई मधील लेखिका कायम अशीच फुलत रहावी आणि तिची लेखणी नेहमीच बहरत रहावी अशी मी मनोमन प्रार्थना करेल तिच्यासाठी. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी एक लहान बहीण आणि मैत्रीण म्हणून माझ्या शुभेच्छा कायम तिच्याबरोबर असतील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा