Feb 22, 2024
प्रेम

वेड्या मना एक प्रेमकथा भाग 1

Read Later
वेड्या मना एक प्रेमकथा भाग 1

अमर ऑफिसमधून आल्या आल्या रेडिओ चालू करतो आणि तसाच बेडवर आडवा होतो. रेडिओमधून “नमस्कार मंडळी, मी सिमरन घेऊन आली आहे तुमचा आवडता शो ज्याच नाव आहे “वेड्या मना”. पहिल्यांदा सर्वांना शुभ संध्याकाळ, या रम्य संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि माणसांची वर्दळ खूप चाललेली असते. प्राणी, पक्षी आणि माणसे आपल्या घराच्या ओढीने लगबगीने आपल्या घरी जात आहेत. संध्याकाळचे हे रम्य आणि रोमँटीक वातावरण अगदीच छान वाटतं आहे. तर या रोमँटीक वातावरणात आपण एक छान गाणं ऐकूया...

वेड्या सांग ना
खुणावती का खुना
माझे मला आले हसू
प्रेमात फसणे नाही रे .......

“अरे अमर असा काय पडलायस. आधी फ्रेश हो मग गाणी ऐकत बस. आल्या आल्या रेडिओ चालूच.” अमरची आई म्हणाली.

“अगं आई थांब ना जरा. माझ्या आवडीचा शो लागला आहे. मला हे खूप आवडतं माहीत आहे ना तुला.” अमर.

“हो आणि त्यातली सिमरन पण आवडते हे ही माहित आहे बरं का?” अमरची आई.

“आई असू दे की ग.”अमर.

“अरे असू देच की मग मी काही बोलले का तुला? फक्त आवर आणि मग ऐकत बस म्हणत आहे.” अमरची आई.

“थोडा वेळ ग आई. आज उशीर झाला ऑफिस मधून यायला म्हणून.” अमर.

“बर ऐक. तुला एक सांगायचं आहे.” अमरची आई.

“काय?” अमर.

“अरे मामा तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन आला होता. मुलगी छान आहे.” अमरची आई म्हणाली.

“काय ग आई मला आत्ताच लग्न करायचे नाही. तू मामाला काय सांगितलेस?” अमर.

“अरे योग्य वयात लग्न केलेले चांगले. वय झाल्यावर पोरी कोण देणार तुला?” अमरची आई.

“आई मी फक्त थोडाच वेळ मागतोय ग.” अमर.

“बरं पण थोडाच वेळ ह.” अमरची आई.

“हो ग” अमर.

“बरं आवर आता. नाहीतर त्या पोरीच्या नादात तसाच बसशील. मी जेवण बनवते.” अमरची आई म्हणाली.

“येस माय डियर मदर. जशी तुमची आज्ञा.” अमर.

“बस नौटंकी. चल आता.” अमरची आई.

अमर फ्रेश होऊन जेवण वगैरे आवरून झोपला. रात्री त्याच्या स्वप्नात सिमरन आली. ती खूप सुंदर दिसत होती. हा तिच्याकडेच पाहत होता. ती याच्या जवळ आणि तिने त्याच्या गालावर एक किस दिला. तो हवेतच तरंगू लागला. मग तिची वेळ झाली. (हो हो अगदी त्या सिमरन आणि राजकुमारच्या कथेसारखच) तो तिला थांब थांब म्हणतच जागा होतो आणि पाहतो तर काय? ते स्वप्न होते. तो मनात म्हणतो “ह्या सिमरनने तर मला वेडच लावले आहे. माझे मन माझे राहिलेच नाही. एकदा हिला भेटायलाच हवे.” मग तो झोपी जातो.

सकाळी सगळं आवरून तो ऑफिसला जायची तयारी करत असतो पण त्याच्या मनात फक्त सिमरनचेच विचार असतात. तिला कसे आणि कधी भेटायचं याचाच तो विचार करत असतो. मग आवरून ऑफिसला जात असतो. ऑफिसला जात असताना एका ठिकाणी एक इव्हेंट चालू असतो. तेथे फार काही गर्दी नसते पण बर्यापैकी लोक असतात. तेव्हा त्या गर्दीतून त्याला एक आवाज ऐकू येतो.

तो मनात “अरे हा सिमरनचा आवाज आहे का? अरे हो हा तिचाच आवाज आहे. म्हणजे येथे सिमरन असणार. मला तिला पहायच आहे.” असे म्हणून तो गाडी तिकडे वळवतो.गाडी पार्क करून तो आत जातो. पण तेवढ्यात कार्यक्रम संपतो आणि स्टेजवर पाच सहा लेडीज असतात. तो मनात “आता ह्यातली कुठली सिमरन हे कसं ओळखायचं?” असा विचार करत असताना कार्यक्रम संपल्यामुळे सगळे जायला निघाले. मग हा पण ऑफिसला उशीर होईल म्हणून निघाला.


"काय हे देवा आधी माहीत असत तर किमान लवकर तर आलो असतो. निदान लांबून तर पाहिले असते की ती कशी दिसते. तस तर मी तिच्या आवाजानेच तिच्या प्रेमात पडलो आहे. सौंदर्य काही मॅटर करत नाही. पण एक आस लागून राहिली आहे. भेटण्याची आतुरता लागून राहिली आहे. मला तिकडे जायला वेळ नाही. एकदा जायलाच हवे." अमर मनात विचार करत ऑफिसला जातो.


ऑफिसमध्ये सुध्दा तो सिमरनचाच विचार करत होता आणि “कार्यक्रमात सिमरन येणार हे आपल्याला कस समजलं नाही.” याचा विचार करत असतानाच समोर दिशा येते.


“हॅलो अमर, गुड मॉर्निंग.” दिशा.

“गुड माॅर्निंग” अमर.

“अरे असा काय रे तू. काय झालंय तुला” दिशा.

“ए दिशा तुला माहित आहे. मी तुला एकदा म्हणालो होतो बघ. मला ती रेडीओच्या “वेड्या मना” शो वाली सिमरन खूप आवडते.” अमर.

“बरं मग तिचं काय?” दिशा.

“अगं ती आज एका कार्यक्रमात आली होती. ती माईकवर बोलताना मी ऐकले आणि मी तिकडे गेलो.” अमर.

“वा मग काय भेटली एकदाची मजनूची लैला.” दिशा.

“नाही ग मी तिथे जाई पर्यंत कार्यक्रम संपला. मला ती दिसली सुध्दा नाही.” अमर.


“अरे भेटेल रे ती. काळजी करू नकोस. अरे मग तू रेडिओ स्टेशनला जाऊन का नाही भेटत तिला?” दिशा.

“कधी जाणार रोज ऑफिस. जायलाच इतका उशीर होतो आणि त्यात ते रेडीओ स्टेशन किती लांब आहे. कधी जाणार?” अमर.

“बापरे अगदी प्रेमवीर झालायस रे. इतका प्रेमात बुडाला आहेस तिच्या. बरं मी एक शंका म्हणून विचारते. समज नुसता समज ह जर ती सिमरन एक चाळीस वर्षाची बाई असेल तर?” असेम्हणत दिशा जोरजोरात हसू लागते.

“ए गप्प बस ह. काही पण बोलू नकोस.” म्हणून अमर तिच्यावर चिडतो.

इतक्यात त्यांचे बाॅस येतात. “काय चाललय इतका का आवाज आहे ऑफिसमध्ये? हे ऑफिस आहे इथे फक्त कामच करायचं.” बाॅस ओरडतात. दोघेही बाॅसला साॅरी म्हणतात.

मग बाॅस अमरला बोलतात, “मिस्टर अमर आज संध्याकाळी तुम्हाला एका मिटींगसाठी जायचं आहे."


"काय? संध्याकाळी" अमर.


"हो काही प्रोब्लेम आहे का?" सर.


"काही नाही सर" अमर.


"ओके तुम्ही जो प्रोजेक्ट करत आहात त्यावरच ही मिटींग आहे. त्यामुळे तुम्हाला काही अवघड नाही. मला खात्री आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन द्याल. जर मिटींग सक्सेस झाली तर तुमचं प्रमोशन नक्की. सो ऑल द बेस्ट. मी तुम्हाला पत्ता मेसेज करतो.” सर.


“ओके सर, थँक्यू सो मच.” अमर.

मग अमर प्रेझेंटेशनच्या तयारीला लागतो. फायनली त्याच प्रेझेंटेशन तयार होत आणि तो मिटींगसाठी जातो. त्या कालावधीत त्याच्या मनात सिमरनचा एकदाही विचार येत नाही. मिटींग अगदी व्यवस्थित पार पडते. मिटींग संपायला थोडा वेळ लागतो. मग मिटींग संपल्यावर तो बाहेर येतो बाहेर अंधार पडलेला असतो. तो घड्याळ बघतो आणि मनात “छे आज सिमरनचा शो ऐकायला मिळाला नाही.”मिटींग झाल्यावर सरांना रिपोर्ट करतो. "सर मिटींग झाली आणि ते तुम्हाला फोन करून काय ते सांगतो म्हणाले आहेत."


त्याने समोर पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला “अरे हे तर रेडीओ स्टेशन आहे आणि सिमरनचा शो इथूनच होतो. आता संपत आलाय म्हणजे ती आज मला नक्की भेटणार. यसऽऽऽ मला काय करू तेच सुचेना. अरे अमर काय करू काय चल लवकर नाहीतर जाईल ती.” असे म्हणून तो रेडीओ स्टेशनकडे जातो. जातो म्हणजे काय अगदी धावत पळत जातो कारण त्याला सिमरन जे भेटायचे होते.

तो मनात विचार करत असतो “कशी असेल ती? भेटल्यावर काय बोलू मी तिच्याशी? ती माझ्याशी बोलेल का?” असे एक नाही अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले. शेवटी तो त्या शोच्या केबिनपाशी आला.

आता खरंच त्याला सिमरन भेटते की नाही आणि भेटली तरी ती कशी असेल? हे आपण पुढच्या लेखात पाहू.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//