पंढरपूर वारी बद्दल एक सुखद अनुभव...
मी जेमतेम पंधरा - सोळा वर्षाची असेल. मला अजूनही आठवतं, वारी सुरू झाली की गावातील बरेच लोकं वारीसाठी निघत असत. दहा-पंधरा असे करत -करत चांगले 50- 60 लोकांचा एक ग्रुप वारीला जायला निघायचा. त्यामध्ये तरुण- तरुणी, वयस्कर व चार-पाच लहान मुले ही असायची.
त्या ग्रुपमधील एका आजीचं आमच्या घरी येणं-जाणं असायचं. त्यामुळे पंढरपूरच्या वारीबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडूनच मला कळायच्या.
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही त्या वारीला जाणार होत्या. सध्या त्या थकलेल्या दिसत होत्या. त्यांचं अंदाजे 60 - 65 वयाच्या असतील. गेल्या दोन वर्षात वारीला न जाता आल्याने त्या व्यथित होत्या पण ह्या वर्षी वारीला जाण्याच्या विचारानेच त्या खूप उत्साही दिसत होत्या. एखाद्या तरुणीला लाजवेल असा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
उद्या त्या वारीसाठी निघणार होत्या , त्यामुळे आदल्या दिवशी मला त्या आवर्जून भेटायला आल्या. मी ही त्यांना आठवणीने सगळ्या गोष्टी घेतल्या का म्हणून त्यांच्यापेक्षा मोठी असल्यासारखी आवर्जून बजावत होती. त्या ही माझ्या सांगण्याला मान देत होत्या.
"हो ग बाई , सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. विठुरायाच्या दारात काही ही कमी पडत नाही ", आजी म्हणाल्या.
तरी मी न राहवून त्यांना इतक्या उत्साहाबद्दल विचारलंच.
त्या बोलू लागल्या, " मी तुझ्या एवढीच असल्यापासून आजोबाबरोबर मागे लागून वारीला जायला निघाली. पहिल्यांदा त्यांनी आढेवेढे घेतले पण माझ्या हटापुढे त्यांना हार मानावी लागली. आम्ही दहा-बाराच लोकं होतो . आमच्या गावापासून पंढरपूर जवळ होतं , त्यामुळे दोन दिवसात आम्ही पोहोचायचो ".
त्या मध्ये - मध्ये दम घेऊन बोलत राहिल्या.
" आजी , तुम्हांला बोलताना ही आता तर दम लागतो मग चालताना किती दमून जाल " , मी म्हणाले.
त्या माझ्याकडे बघून हसल्या व पुढे बोलू लागल्या , " अगं , माहेरी जाताना कधी कोणाला दम लागतो का ? वया मानाप्रमाणे माझे आई -वडील तर देवा घरी निघून गेले तेव्हापासून मला विठू माऊलीच माझे मायबाप आहे. जेव्हापासून मी वारीला जात आहे तेव्हापासून मला कशाचीही कमी नाही बघ. देवाने, पहिल्यापेक्षा नेहमी जास्तच दिले माझ्या पदरात. गेल्या दोन वर्षात गेले नाही तर गुडघ्याचे दुखणे वर आले होते पण जसे मी देवाला अळवले की यावर्षी मी नक्की येईन तसे माझे गुडघ्याचे दुखणे कुठल्या कुठे गायब झाले बघ " , असे म्हणून त्या घरी निघू लागल्या.
तसं मला आठवलं की त्यांनी गुडघ्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेतला होता व त्यावर औषधेही घेतली होती. पण त्यांचा भोळा भाव विठ्ठलावरच होता. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही झालं की त्याचे सगळे श्रेय विठ्ठलालाच देऊन टाकायच्या.
" आजी , तुम्ही नीट जा . चालता नाही आलं तर कोणत्या तरी गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास करा " , मी म्हणाले.
त्यांनी मागे वळून फक्त स्मितहास्य केले व हात वर करून त्या निघून गेल्या.
त्या गेला तशी माझी तंद्री लागली होती.
त्यांच्यापेक्षा आता त्यांच्या वारीची काळजी जास्त मलाच लागली होती.
\" ह्या आजी , आता वारीला कशा जाणार \" ? हाच विचार करत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या आजी मला भेटायला आल्या व आनंदाने सांगत होत्या की, " माझ्या नातवाने चार चाकी गाडी घेतली आहे व तो पहिल्यांदाच आम्हां सगळ्या वारकऱ्यांना घेऊन पंढरीच्या वारीला येणार आहे . बघ, तुला म्हणलं होतं ना सगळी काळजी ही आई -बापालाच असते " .
हे ऐकून तर मला नवलच वाटले.
खरंच! सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात व तो विठ्ठलच पूर्ण करतो. तो नेहमी आपल्या सोबत असतो हा दृढ विश्वास सगळ्याच भक्तांमध्ये दिसतो . त्यामुळे प्रत्येक जण तिकडे धाव घेतो.
लहानपणापासून आजीच्या गोष्टी ऐकून मला ही वारीचे वेध लागायचे. अजूनही लागतात.