वात्सल्य भाग 5 (अंतिम भाग)

आईचं प्रेम हे अतुलनीय असते मग ती कुणीही असो
वात्सल्य भाग 5 (अंतिम भाग)
विषय –कौटुंबिक कथा
राज्यस्तरीय कथामालिका करंडक
©सौ वृषाली प्रकाश खटे
पूर्वार्ध

किंजलच्या मनात माधुरी व बाळा विषयी असलेला संशय थोडा तरी कमी झाला होता….आता पुढे

आता माधुरी किंजलच्या रस्त्यानेही कधी दिसेनासी झाली. माधुरीला पाहून जवळपास वर्षे होत गेली.


भक्ती आता सहा वर्षाची झालेली होती. ती शाळेतही जाऊ लागली होती. किंजल ,प्रसाद ,भक्ती आणि आजी आजोबा असं त्यांचं पूर्ण भरलेलं कुटुंब आनंदात राहायला लागलं होतं . आणि एक दिवस अचानक माधुरी किंजलच्या दारात दुपारच्या वेळी आली.


माधुरीचा अवतार अगदीच बदललेला होता. शरीर हडकुळे झालेले होते. चेहऱ्यावर काळवटपणा आलेला होता . जणू ती वर्षानुवर्षापासून आजारी आहे असे दिसत होती. किंजलने तिला ओळखले नाही परंतु गेटमधून आत आल्याबरोबर किंजलला तिने आपली ओळख करून दिली. आणि म्हणाली --"ताई मी माधुरी... तुमच्याकडे बरेच वेळा वस्तू विकायला येत होती." हे म्हटल्याबरोबर माधुरीचा प्रसंग किंजलच्या मनात आला. आणि तिच्या अंगावर काटा आला.


किंजल -- " अग मग आज बरेच वर्षांनी आलीस.... कसं काय येणं केलंस...."


माधुरी-- "काही नाही सहज...."


किंजल --" पण आज तर तू काही सामानही विकायला आली नाहीस…. रिकाम्या हाताने आलीस... "माधुरी--" अहो आता तब्येत साथ देत नाही. वस्तू विक्री करायला जाणे होत नाही ...... मी ह्या मोठ्या शहरांमध्ये बरेच वर्षापासून राहते. यावर्षी आम्ही हे गाव सोडून दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये जाणार आहे.... म्हटलं तुमची एकदा जाता जाता भेट घेऊन जावी."


किंजलने तिला पाणी दिले आणि चहाही दिला . परंतु माधुरीला आज चहापाणी काहीच नको होतं. माधुरीला आज भक्तीला एक नजर पाहायचे होते .परंतु भक्ती दुपारी झोपलेली असल्यामुळे तिचा आवाज कुणालाही आला नाही. माधुरी मात्र तिचा आवाज येण्याची वाट पाहत तिथे किंजलशी गप्पा करत होती. चहा घेऊन झाल्यानंतर किंजलला वाटले की माधुरी निघून जाईल पण माधुरी तिथेच रिंगाळली. तिचा तो रेंगाळलेलापणा पाहून माधुरीच्या मनात मागील शंका परत उत्पन्न झाल्यात. माधुरी अजून अजून अधीर आणि आतुर आतुर होत असल्याचे तिला जाणवले. किंजलने मात्र तिला आता सरळच प्रश्न विचारला.


किंजल --" माधुरी खरं कारण सांग तुझं इथे येण्याचं "


माधुरी--" काही नाही हो ताई सहजच आली होती"


किंजल -- "सहज आली होती असं म्हणते पण तुझा चेहरा, तुझ्या मन काहीतरी वेगळंच सांगते. तुझ्या चेहऱ्यावरची अधीरता मला स्पष्ट जाणवत आहे.... माधुरी खरं बोल...."


माधुरी--" हे ऐकून रडायला लागते. मला फक्त तुमच्या मुलीचा चेहरा पाहायचा आहे. "

किंजल --"माझ्या मुलीचा..... का?... उत्तर दे माधुरी.... का? "


माधुरी--" मी आता हे गाव सोडून जाणार आहे. म्हणून मला फक्त तुमच्या मुलीचा......" आणि एवढे म्हणून माधुरी ढसाढसा रडायला लागते.

तिचं ते रडणं ऐकून सासूबाई घराच्या बाहेर येतात. किंजल हातानेच त्यांना काही बोलू नका असे खुणावते. आणि म्हणते

किंजल-- " मला सत्य माहित आहे माधुरी . पण ते सत्य मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. काय आहे ते खरं खरं सांग माधुरी..... आज तरी खरं खरं सांग....."


माधुरी -- "ताई तुम्हालाही सत्य माहित आहे आणि मलाही सत्य माहित आहे. ....(थोडा वेळ शांत राहून) ते बाळ माझं आहे. मीच आपल्या दारात ते बाळ ठेऊन गेली होती."


हे ऐकताच किंजल आणि सासुबाई यांचा धीर सुटतो. दोघीजणी जमिनीवर गांगारुन खाली बसतात.


किंजल --" हो मला तेव्हाच जाणवले होते.... त्या गोधडीतला तो तुकडा बघून मला जाणवले की हे बाळ तुझच असाव.... कारण ती साडी मलाही खूप प्रिय होती ..... तीच साडी मी तुला दिली होती ..... तो तुकडा गोधडीला लावलेला पाहून माझ्या मनामध्ये खूप वेळा शंका आली की हे बाळ तूच माझ्या अंगणात ठेवलेलं आहे ....पण मग तू का लपविलस आणि का हे बाळ माझ्या अंगणात ठेवलं .....आज माझ्या प्रश्नांची तू उत्तरे दे माधुरी."माधुरी--" हो ताई मी आज आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच इथे आलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मी आपल्या दाराशी येत आहे आणि मुलीला एक नजर पाहण्यासाठी आतुरत आहे. परंतु माझं दुर्दैव असं की मी जेव्हा जेव्हा इथे आली तेव्हा मला मुलगी दिसली नाही..... मला तुमची मुलगी दिसत नाही म्हणून आज शेवटी हिंमत करून आत मध्ये येण्याचा निर्णय घेतला ....कारण आम्ही उद्या या गावातून दुसऱ्या गावासाठी निघणार आहे ...मला आजचा दिवस शेवटचा होता..... आज जर मी तुमच्या मुलीला पाहालं नसतं तर माझा येथून पाय निघाला नसता. मी दुसऱ्या गावात तर जातच आहे. त्या गावातून परत इथे येणं शक्य होईल की नाही हे मला माहिती नाही ....आणि माझी तब्येत आता एवढी खालावली आहे की त्या गावात मी जिवंत राहील की नाही... हे सुद्धा मला माहीत नाही. त्यामुळे मी आजचा हा धाडसी निर्णय घेतलेला आहे.
मी आपल्याला कुठेही त्या बाळावर हक्क सांगण्यासाठी इथे आली नाही. मला फक्त त्या बाळाचा एकदा चेहरा पाहायचा आहे. एकदा फक्त चेहरा पाहून आशीर्वाद द्यायचा आहे. "


किंजल--" हो पण आधी तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दे मला...."

माधुरी-- " मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते . तुम्हाला माझ्यावर शंका आली हे मलाही जाणवलं होतं. कारण मी जेव्हा बाळ इथे ठेवून गेली तेव्हा मी लपून लपून रोज तुमच्या दारातून येऊन जात होती. तुमच्यावर नजर ठेवल्यासारखी मी वागत होती. आपण माझ्या बाळ दत्तक घ्यालच याची मला पूर्ण खात्री होती म्हणूनच मी ते बाळ आपल्या दारात ठेवलं होतं. अन्यत्र कोठेही ठेवले नाही कारण आपल्याला बाळ नाही हे मी दोन-चार वर्षात अनुभवलेलं होतं. तुमचा मायाळू स्वभाव हाही मी अनुभवलेला होता. त्यामुळे आपणच माझ्या मुलीसाठी उत्तम पालक आहात हे जाणून ते बाळ मी आपल्या दारात ठेवलं होतं. तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी शंका निर्माण झाली हे मला जाणवलं . एक दिवस आपण माझ्या मागं मागं माझ्या घरापर्यंत आल्या होत्या हे सुद्धा मला माझ्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींनी सांगितलं.

किंजल-- "म्हणजे तू हे बाळ इथे ठेवल्याचं तुझ्या मैत्रिणींना पण माहित आहे?"

माधुरी--" हो ताई त्यांना सुद्धा याची कल्पना आहे . माझ्या दोन जीवाच्या मैत्रिणी आहेत ज्यांना सांगूनच हे कार्य मी केलेले आहे. आपण त्या दिवशी माझ्या घरी आल्या होत्या ते त्यांनीच मला सांगितलं. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला फसवणे सहज शक्य नाही. त्यामुळे मी इकडे येण्याचे पण टाळत होती. पण एक दिवस येण्याचा, बाळाला बघण्याचा मोह मला आवरला नाही आणि तेथेच मी चूक केल्याचं मला जाणवले. आपण त्या दिवशी परत माझ्या घरी याल अशा मला वाटलंच होतं. त्या दिवशी म्हणूनच मी माझ्या मैत्रिणीचं मूल कडेवर घेऊन दिवसभर फिरत राहिली. त्या बाळाला बघून आपलं मन शांत होईल असे मला वाटले . त्या बाळाला घेऊन फिरण्याचे नाटक मी केले आणि त्या नाटकांमध्ये मी यशस्वी पण झाले. आणि तुमच्या मनातला तो प्रश्न निघून गेला."किंजल--" पण तू हे बाळ का टाकून दिलेस ?"
माधुरी याचेही उत्तर दे"

माधुरी --" ताई मी बाळ टाकून नाही दिलं तर एका सुरक्षित हातात दिलं…..ताई तुम्हाला आमचे जीवन काय आहे हे माहीत नाही. आज इथे पाल टाकायचे…. उद्या तिथे पाल टाकायचे आणि जगायचं. दोन वेळेचं अन्न मिळालं तेवढेच सुख मानायचं. आमच्याकडच्या जीवनाला कुठलंच महत्त्व नाही. एका किड्यामुंगीप्रमाणे आम्ही जीवन जगतो. आमच्याकडे सर्व माणसांचे जीवन असेच राहते. पण त्यातही पुरुष जातीचे जीवन थोडफार बरं राहतं आणि स्त्री जातीचं जीवन मात्र विचारू नका.... आम्हाला लेकरं होतात आणि ती पण डझनानी होतात... ना त्यांच्या अंगावर कपडा मिळते ना चिंधी मिळते.... ती लेकरं बिना कपड्याची, बिना चपलांची.... अनवाणी आयुष्य जगतात.त्यात चौदाव्या, पंधराव्या वर्षी मुलींचे लग्न करून टाकले जातात. परत त्यांची लेकरं... पिढ्यानपिढ्या हे चक्र चालत आहे... पुरुषांच्या जातीला बिना कपड्याचा फिरणं काही वाटत नाही परंतु स्त्री जातीच फार नागळरूप तिथे आम्हाला दिसतं.... आमच्या झोपड्यांमध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत त्या मुली वयात येईपर्यंत बिना कपड्याच्या फिरतात. वयात यायला लागली की मग तिला अंगावर चिंधी मिळते . वयात आली रे आली की तिला उजळून टाकण्याच्या गोष्टी केल्या जातात. उजळून टाकल्यानंतर संसार असा उघड्यावरचा..... पुरुष मंडळी दारू पिणार. कुठेही, कशाही प्रकारे संसार सुख मिळवणार...तिला इज्जत नाही .....तिला लाज नाही... तिला लज्जा नाही... लई बेकार स्थिती हाय बघा आमची ताई.... तुम्हाला आम्ही सांगू बी शकत नाही .झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये आडोसा करून आमचा संसार चालतो. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये लेकरं निजलेले असतात. त्यात दारू पिणाऱ्या नवरा ,दारू पिणारे ,भांडणारे शेजारी अशा अवस्थांमध्ये बाईचं रूप मला नको होतं.
मला तुमच्यासारखी स्त्री बघून खूप आनंद वाटायचा. तुमच्याकडे बाईला कसा मान दिला जातो . आमच्याकडे बाई म्हणजे नवऱ्याने जिला पायाशी ठेवावं , काठीने झोडपावं असे जनावर आहे. रोज असं काठीने झोडपण आणि तिच्या इज्जतीचे लक्तरे काढणे योग्य वाटते का बघा…. सांगा ताई.... त्यामुळे मला असं वाटायचं की मला मुलगी होऊ नये..... मला मुलं झाले तर ती तशीच जगतील परंतु जर मुलगी जर झाली तर तिचे असे लक्तरे निघालेले मला बघणार नाही..... पण मला मुलगी झाली……खूप दुःख झालं...वाईट वाटलं पण मी तिला येथे ठेवणार नाही हे मनाने लगेच पक्के केलं. आणि माझ्या दोन मैत्रिणीच्या मदतीने तिला आपल्याकडे पोचविले .त्यांनी कोणती गोधळी घेतली , काय केले मला माहित नव्हते . माझं मूल जन्मतः मेले असं घरी सांगितल्यावर कुणी मला विचारलं ही नाही की ती प्रेत तू कुठे फेकले?.... कुठे टाकलं..... काय झालं मला ...माझ्या नवऱ्याला त्याचं काहीही घेणं देणं नव्हतं... मी किती पोरांना जन्म देतेय.... कधी जन्म देते याचेही त्याला काही घेणं देणं नव्हतं ....त्याला फक्त रात्रीचं सुख हवं आणि दिवसाचा पैसा हवा ....याच्या व्यतिरिक्त आमच्या समाजामध्ये स्त्री जातीचा कुठलंही अस्तित्व नाही ...आणि म्हणूनच मी ती मुलगी आपल्या स्वाधीन केली. मला आज तिच्यावर कुठलाही हक्क सांगायचा नाही. तुम्हीच तिचे आईबाप आहात .मी तिची कुणीही नाही . आज मात्र जीवाची शाश्वती राहिली नाही म्हणून फक्त तिला एकदा पाहून जावसं वाटलं ..."


तिचं ते रडणं पाहून किंजल आणि सासूबाई दोघींच्याही डोळ्यात अश्रू वहायला लागलेत. सासूबाईंनी किंजल आणि माधुरी दोघींनाही पाणी दिले. त्यांनी घरातून भक्तीला उठवून बाहेर आणले. भक्ती किंजल कडे बघून म्हणाली

भक्ती--" मम्मा मला का उठवले ? झोपेतून मला अजून झोपायचं आहे."किंजल--" अच्छा तुला झोपायचे आहे . ये मग माझ्या मांडीवर.... बाहेर ये ...."

तशी भक्ती बाहेर येते तिला बघून माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य येते. माधुरी तिला पाच मिनिट बघतच राहते. त्यावेळी भक्ती किंजल ला विचारतेभक्ती --"मम्मा ह्या कोण?"

भक्ती माधुरीला पाहून प्रश्न विचारते.किंजल -- "अगं ही तुझी मासी.... म्हणजे माँ जैसी... तुझ्या आईच्या सारखी अशी तुझी माधुरी मासी."


मासी हा शब्द एकूण माधुरीच्या डोळ्यांमध्ये अजून आनंदाचे अश्रू वहायला लागतात. माधुरी भक्तीला पाहून मनाने सद्गत होऊन घरातून आनंदाने निघून जाते आणि किंजल यशोदा बनून आपल्या भक्तीला आत घेऊन जाते.


धन्यवाद

© सौ वृषाली प्रकाश खटे
पातूर जि अकोला 9404375920

🎭 Series Post

View all